ताज्या घडामोडी

करिअर निवडायचं … ? थोडं थांबा !

Spread the love

आवडीच्या क्षेत्रात काम केले ,तर काम हीच आवड होऊन जाते .आज बारावीचा निकाल लागला . नेहमीप्रमाणे उत्तीर्ण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक होत आहे .लवकरच दहावीचाही निकाल लागणार आहे . जे विद्यार्थी नापास झालेत तसेच ज्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले त्यांचे कौतुक सोडाच , पण त्यांना धीर देतानांही फारसं कोणी दिसत नाही . गुणवंतांच्या कौतुकासोबतच स्पर्धेत मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांनाही आधार देणे या काळात गरजेचे असते .या विद्यार्थ्यांना आपण समजून घेऊया . एखादी परीक्षा ही जीवनातील शेवटची परीक्षा नसते , हे सत्य स्वीकारून गेलेल्या संधी पेक्षा येणाऱ्या संधीचं स्वागत करूया .
दहावी -बारावीचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांनाचीही खरी कसोटी लागते ,ती करिअर निवडीची .करीयर निवडणे , हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा . आज स्पर्धेच्या युगात करिअरचे विविधांगी क्षेत्रे खुली झाली आहेत .ज्ञान आणि कौशल्य यांची सांगड घालून आवड आणि अभिरुची विचारात घेतली म्हणजे करियर निवडीचा मार्ग सुकर होतो .
प्रत्येक विद्यार्थ्यांची आवड आणि अभिरुची भिन्न असते .बऱ्याचदा पालकांकडून आग्रह केला जातो ,कि आपल्या मुला-मुलींनी आपण सांगू त्याच क्षेत्रात करिअर करावे . मात्र पाल्यांवर अशा प्रकारच्या अपेक्षांचे ओझे लादले जाणे योग्य नाही . आपल्या मुला-मुलींच्या उपजत क्षमता , त्यांच्या आवडी -निवडी करियर निवडताना विचारात घेणे, अत्यंत महत्त्वाचे आहे .
*करियर निवडताना विचारात घ्यायचे काही महत्त्वाचे घटक -*

*आवड आणि अभिरुची*
अभिरुची म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपला असलेला नैसर्गिक कल . आपल्याला नेमकं काय आवडतं ? त्यानुसार जर आपण करिअर निवडलं ,तर नक्कीच त्यात विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो . जॉब सॅटीसफॅक्शन अर्थात कार्यानंद ही करियर निवडीतील अत्यंत महत्वाची गोष्ट केवळ आवड आणि अभिरुची मुळे प्राप्त होते . अन्यथा जॉब मिळूनही समाधान मिळत नसेल तर नैराश्य येऊन जीवनातील आनंद हिरवल्या जातो .

*क्षमता -*
करियर निवडताना आपल्या विविध क्षमतांचा आपण विचार करायला हवा . नेमके आपण निवडत असलेल्या करिअरसाठी आवश्यक असणाऱ्या शारीरिक-मानसिक – बौद्धिक क्षमता आपल्याकडे आहेत का ? आपण त्या क्षमता विकसित करू शकणार आहोत का ? या प्रश्नांची स्वतः च उत्तरं शोधणे महत्त्वाचे ठरते .करियरच्या अनुषंगाने आपल्यातील विविध क्षमतांचा विचार केला ,तर आपली अमूल्य वेळ , पैसा , मेहनत व्यर्थ जाणार नाही .

*आत्मविश्वास -*
मला नेमकं कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे , त्याबद्दल आपल्याला प्रचंड आत्मविश्वास असायला हवा . प्रचंड आत्मविश्‍वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर आपण कोणतीही गोष्ट प्रत्यक्षात साकार करू शकतो .आत्मविश्वासाच्या बळावर योग्य करिअरची निवड करून आपण त्यात यशस्वी होऊ शकतो .

*स्वतःची ओळख -*
स्वतःची ओळख स्वतःला असणे हे करियर निवडीतील एक महत्त्वाचे तत्त्व आहे .मी कोण आहे ? मला काय करायचे आहे ? मला तेच का करायचे आहे ? मी ते कसे करणार आहे ? मी ते करू शकेल का ? या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण आपल्या स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा .स्वतःची ओळख आपल्याला नक्कीच योग्य करिअर पर्यंत पोहोचवू शकते .आपल्या व्यक्तिमत्त्वातील शक्तीस्थळे आणि उणीवा म्हणजेच कमतरता आपल्याला समजल्या पाहिजेत .त्यांचा आपण मोठ्या मनाने स्वीकार करायला हवा .यातून आपल्याला योग्य करिअर निवडता येते .

*स्वयंप्रेरणा आणि मार्गदर्शन*
यश प्राप्तीच्या मार्गातील स्वयंप्रेरणा हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे . स्वयंप्रेरित विद्यार्थी योग्य मार्गदर्शनाने यशोशिखर गाठू शकतात . योग्य वेळी मिळालेले योग्य मार्गदर्शन योग्य करिअर पर्यंत घेऊन जाते . पालक -शिक्षक – तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन स्वयंप्रेरणेने विद्यार्थ्यांनी आपले करियर निवडल्यास हमखास त्यात यश मिळू शकते .
*वास्तवाची जाण*
*कर्तव्याचे भान*
*वर्तमानाचे आव्हान*
आज स्पर्धेच्या युगात विविध संधी विद्यार्थ्यांना खुणावत आहेत . या संधीचे सोने करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वास्तवाची जाण आणि कर्तव्याचे भान राखल्यास वर्तमानाचे आव्हान समर्थपणे पेलता येऊ शकते . करियर निवडल्यानंतर त्यासाठी झोकून देऊन काम करणे ,महत्वाचे ठरते . ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे म्हणतात , ” भान ठेवून नियोजन करा आणि बेभान होऊन ते तडीस न्या .” आज घेतलेला एक निर्णय संपूर्ण जीवनाला कलाटणी देणारा आहे . त्यामुळे स्वतः मधील नैसर्गिक आवडीचा शोध घेऊन त्यानुसार करिअर निवडल्यास नक्कीच आपण यशाच्या उच्च शिखरावर पोहोचू शकू .सर्व विद्यार्थी , पालक आणि शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन !

✍️शंकर रंगनाथ भामेरे
प्रयोगशील शिक्षक
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय पहूर , ता . जामनेर
srbhamere1983@gmail.com

📱9898315012

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!