ताज्या घडामोडी

अमरहिंद, प्रबोधन, शिवनेरी, श्री समर्थ व महात्मा गांधीची विजयी सलामी

Spread the love

अमरहिंद चषक पुरुष-महिला निमंत्रित जोडजिल्हा खो खो स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई, २० मार्च (क्री. प्र.), महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व मुंबई खो-खो संघटनेच्या सहकार्याने अमरहिंद मंडळाने पुरुष महिला निमंत्रित जोडजिल्हा (मुंबई व मुंबई उपनगर) खो खो स्पर्धा २२ मार्च २०२२ पर्यंत मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त कै. रमेश वरळीकर क्रीडानगरी, अमरहिंद मंडळ, अमर वाडी, गोखले रोड, दादर (प.) मुंबई येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू प्रकाश राहटे याच्या हस्ते पार पडले. यावेळी कमलाकर कोळी, दीपक पडते, अरुण देशपांडे, प्रफुल्ल पाटील, जतिन टाकळे, पांडुरंग परब, राणे यांच्याबरोबर खो-खो संघटनेचे व अमरहिंद मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईच्या शिवनेरी सेवा मंडळाने यजमान अमरहिंद मंडळाचा चुरशीच्या खेळात १३-१२ असा ४० सेकंद राखून एक गुणाने पराभव केला. या सामन्यात शिवनेरीच्या शिवानी गुप्ता (२:००, २:४० मि. संरक्षण व १ बळी), दर्शना सकपाळ व प्रगती ढाणे (प्रत्येकी २:०० मि. संरक्षण), अक्षया गावडे (१:५०, नाबाद १:३० मि. संरक्षण), मयूरी लोटणकर (१:५० मि. संरक्षण व ४ बळी) व प्रतीक्षा महाजन (४ बळी) यांनी केलेल्या बहारदार खेळीने चुरशीच्या सामन्यात विजय मिळवून दिला. तर यजमान अमरहिंदच्या रिध्दी कबीर (१:१०, २:१० मि. संरक्षण व ७ बळी), मधुरा पेडणेकर (१:१०, २:०० मि. संरक्षण), तन्वी उपळकर (२:१० मि. संरक्षण व १ बळी) व संजना कुडव (२:०० मि. संरक्षण व १ बळी) यांनी जोरदार लढत दिली मात्र त्या यजमानांना परभवापासून वाचवू शकल्या नाहीत.

पुरुषांच्या पहिल्या सामन्यात श्री समर्थ व्या. मंदिरने विजय क्लबवर १०-०९ असा एक डाव १ गुणाने विजय मिळवला. या सामन्यात प्रतीक होडावडेकर (३:३० मि. संरक्षण), वेदांत देसाई (नाबाद २:५० मि. संरक्षण व ३ गडी) व अनंत चव्हाण (नाबाद १:००, २:२० मि. संरक्षण व १ गडी) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला तर विजयाच्या आदेश सूर्यवंशी (१:३० मि. संरक्षण व १ गडी), प्रणय प्रधान (१:२० मि. संरक्षण व २ गडी) यांनी जोरदार लढत दिली मात्र ते आपल्या संघाला मोठ्या परभवापासून वाचवू शकले नाहीत.

पुरुषांच्या दुसर्‍या सामन्यात उपनगरच्या प्रबोधन क्रीडा भवनने मुंबईच्या वैभव स्पो. क्लबचा १३-०८ असा एक डाव ५ गुणांनी पराभव केला. या सामन्यात प्रबोधनच्या शांताराम परब (२:३० मि. संरक्षण व ३ गडी), सिध्देश थोरात (२:२० मि. संरक्षण व १ गडी), अजय राऊत (२:१० मि. संरक्षण व २ गडी) यांनी केलेल्या खेळाच्या जोरावर सहज विजय मिळवला तर पराभूत हार्दिक मोहिते व राहुल नेवरेकर यांनी चांगला खेळ केला.

पुरुषांच्या तिसर्‍या सामन्यात यजमान अमरहिंद मंडळाने उपनगरच्या ओम युवा स्पो. क्लबवर १५-१४ असा ७:१० मि. राखून एक गुणाने दणदणीत विजय साकारला. या सामन्यात अमरहिंदच्या सिध्देश चोरगे, प्रसाद राडीये व निरव पाटील, गणेश साहू व अजय मित्र यांनी जोरदार खेळी केली. तर महिलांच्या दुसर्‍या सामान्यात उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. क्लबने मुंबईच्या श्री समर्थ व्या. मंदिरचा १६-०८ असा एक डाव ८ गुणांनी धुव्वा उडवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!