ताज्या घडामोडी

अथांग ज्ञानाचे महासागर–डॉ.बाबासाहेब आंबेडकर.!

Spread the love

शब्दांकन:-शिवश्री.प्रा.सतिष उखर्डे- टेंभूर्णीकर

जगात महामानवाला महामानवाच्याच रूपात जन्म घ्यावा लागतो म्हणूनच, पुढे तो आपल्या गुणसंपन्न व्यक्तित्वाने आणि महान कर्तुत्वाने महामानव सिद्ध होतो. जगाच्या अशा नियमानुसार १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील ‘महू’ येथे पिता रामजी आणि माता भिमाई यांच्या पोटी चौदावे अपत्य म्हणून महामानवाच्या रूपात विश्वरत्न,बोधीसत्व,भारतरत्न, अथांग ज्ञानाचा महासागर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आणि भारत देशाचा उद्धार झाला. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन,व्यक्तित्व आणि कर्तृत्व भारत राष्ट्राच्या अखिल जगाच्या आणि विश्वात्मक मानवतेच्या कल्याणकारी इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिले जावे अशा महान योग्यतेचे आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण क्षेत्रात प्राप्त केलेल्या पदव्या म्हणजेच त्यांचा “अपूर्व पराक्रमच!” त्यांच्या दैदिप्यमान पुरुषार्थाचा आदर गौरव आणि सन्मान वाढविणाऱ्या बीए,एम ए, पीएचडी,एम एस्सी, डी एस्सी, बार ॲट-लॉ,एल एल डी,आणि डिलीट या त्यांच्या थोर-थोर पदव्या जणू मनमोहक सौंदर्य खुलवित राहणाऱ्या सोन्याच्या रत्नजडित अलंकाराप्रमाणेच आहे,असं म्हणतात की, “माणूस मोत्याच्या हाराने नव्हे तर,घामाच्या धारांनी जास्त शोभून दिसतो.”
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्तम जिज्ञासू वाचक व ग्रंथसंग्राहक होते, विविध भाषेवर उत्तम प्रभुत्व होते. महार जातीमुळे अनेकदा शालेय जीवनापासून अपमानित झालेले होते, वर्णव्यवस्थेचे, जातीयतेचे अमानुष चटके त्यांनी सहन केले होते,पुढील आयुष्यात त्यांनी प्राध्यापकाची नोकरी काही काळ केली,परंतु पुढे आपल्या लोकांसाठी न्यायालयाचे न्यायाधीश पद नाकारलं आणि दीनदलित दुबळ्या लोकांची सेवा करून ज्ञानावर आधारित समाजाची निर्मिती करून जातिभेद, धर्मभेद,पंथभेद,उच्च-नीच भेद नाहीसे करून एक चांगला समाज उभा केला. मूकनायक,जनता,बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रांमधुन,पाक्षिकांमधून समाजाचे प्रबोधन केले. २० जुलै १९२४ ला “बहिष्कृत हितकारणी सभा” स्थापन करून त्याद्वारे शिक्षणप्रसार, वाचनालये,वसतिगृहे इत्यादी कामे सुरू केली. २० मार्च १९२७ ला महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, आणि तळे सर्वांना पाणी पिण्यासाठी खुले केले. बदलापूर (मुंबई ) येथे छत्रपती शिवरायांच्या जयंती उत्सवाचे अध्यक्षपद भूषविले. समता समाज संघाची स्थापना केली, रोटीबंदी-बेटीबंदी तोडण्याचे कार्य निश्चित करून समाजसेवेचे आणि लोकजागृतीचे काम करत असताना ५ऑगस्ट १९२८ रोजी त्यांची मुंबई प्रांतिक समितीवर निवड झाली. ३ मार्च १९३० ला “नाशिकच्या काळाराम मंदिर” प्रवेशाचा सत्याग्रह केला व मंदिर सर्वांसाठी खुले केले.
अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाचा राजकीय हक्क दिला जावा यासाठी ते अखेरपर्यंत लढले.”ऍनीहिलेशन ऑफ कास्ट”(जातीचा संपूर्ण नाश) हा ग्रंथ लिहिला.स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. “ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” हा नवीन पक्ष स्थापन केला. हिंदू आणि मुस्लीम विभाजनावर “थॉटस् ऑन पाकिस्तान”नावाचा ग्रंथ लिहिला. ते जुलै १९४२ मध्ये हिंदुस्थानच्या व्हाइसरॉयच्या मध्यवर्ती मंत्रिमंडळात मजूर खात्याचे व बांधकाम खात्याचे मंत्री झाले,त्यातून त्यांची कामगिरी यशस्वी आणि लोकप्रिय होत राहिली. “हिंदू कोड बिल”त्यांनी तयार केलं.पुढे पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई येथे तर सिद्धार्थ महाविद्यालय आणि मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाचे “संविधान”(राज्यघटना) तयार केली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ते भारत राष्ट्राला अर्पण केले. न्याय, स्वातंत्र्य, समता,बंधुता या तत्त्वांवर राज्यघटना तयार करण्याचं महत्त्वाचं काम बाबासाहेबांनी केलं.अस्पृश्यांचा उद्धार व्हावा म्हणून त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला आपला हिंदू धर्म त्यागून नागपूर येथे “बौद्ध धर्माची” दीक्षा घेतली.
गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही,त्यासाठी शिका, संघटित व्हा,संघर्ष करा हा तुमच्या-आमच्या जीवनाचा मूलमंत्र देऊन आमच्या सुखी संपन्न जीवनासाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट केले,घाम गाळला, रक्ताचं पाणी केलं!! अरे झगडले,झुंजले,झिजले बाबासाहेब,बाबासाहेबांचा देह झिजला म्हणून तुमचा आमचा देव सजला! “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे पिणार
तो गुरगुरणार!”शेतकऱ्यांना,कामकऱ्यांना, कष्टकर्‍यांना बाबासाहेबांनी झोपेतून जागे केले,स्वतःच्या हक्काची,ताकदीची जाणीव करुन दिली आणि राना- रानातून,वना-वनातून, डोंगरदऱ्यातून हातात लेखणी घेऊन हा समाज बाहेर पडला. बाबासाहेबांचे कर्तृत्व, नेतृत्व,वक्तृत्व,दातृत्व हिमालयाच्या उंचीचे आहे, सह्याद्रीसारखे बलाढ्य आणि बुलंद आहे. त्यांनी कुठल्याही जाती-धर्माला विरोध केला नाही. उलट त्या काळातील खुळचट प्रथा-परंपरामधून समाजाची सुटका केली.
‘हातात’ शस्त्र नसले तरी चालेल,’अंगात’ रक्त नसले तरी पण चालेल, पण “डोक्यात” मात्र बाबासाहेबांचेच विचार मात्र कायम असणे गरजेचे आहे, अशाप्रकारे संघर्षमय जीवन जगून तुम्हा-आम्हा-सगळ्या भारतीय जनतेला अंधकारातून-प्रकाशाकड़े नेणाऱ्या या संघर्षाच्या महामेरूला,महामानवाला त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम…!त्यांच्या विचारांना अभिवादन!!! एवढचं….!
———–#शब्दांकन#——–
—-शिवश्री.सतिष उखर्डे
( प्रसिद्ध व्याख्याते तथा इतिहास अभ्यासक 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!