ताज्या घडामोडी

लायन्स क्लब आयोजित कुमार-मुली व व्यावसायिक जिल्हाअजिंक्यपद खो खो स्पर्धा

Spread the love

व्यवसायिक महिला स्पर्धेत रचना नोटरीने मारली बाजी तर पुरुष गटात पश्चिम रेल्वेला अजिंक्यपद

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

दि.२३ मे (क्री. प्र.) लायन्स क्लब ऑफ माहीम आणि लायन्स क्लब मुंबई एलिट या दोन्ही संस्थांतर्फे घेण्यात आलेल्या मुंबई जिल्हा कुमार मुली आणि व्यवसायिक अजिंक्यपद स्पर्धेच्या आजच्या दिवशी महिला व्यवसायिक स्पर्धेची अंतिम फेरी झाली ज्यात उत्तम लढतीत रचना नोटरीने बाजी मारली. याप्रसंगी लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३१ए१ चे २ रे उप गव्हर्नर विराफ मिस्त्री तसेच माजी मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन लायन संतोष शेट्टी यांच्या हस्ते बक्षीस समारंभ करण्यात आला.

आज झालेल्या व्यावसायिक महिला गटाच्या अंतिम सामन्यात रचना नोटरी वर्क्सने मुंबई पोलीसांचा ७-६ (मध्यंतर ५-२) असा १ गुण व ५:३० मिनिटे राखून पराभव केला. रचना नोटरी तर्फे संजना कुडवने ५:१०, १:४० मिनिटे संरक्षण केले. सेजल यादवने नाबाद २, २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ खेळाडू बाद केले. प्रतिक्षा महाजन व मधुरा पेडणेकरने प्रत्येकी आक्रमणात २ खेळाडू बाद केले. मुंबई पोलीसतर्फे शुभांगी जाधवने नाबाद १:१०, २ मिनिटे संरक्षण केले. मयुरी लोटणकरने १:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ खेळाडू बाद केला. प्रणाली कवडेने आक्रमणात २ खेळाडू बाद केले.

व्यवसायिक पुरुष गटात पश्चिम रेल्वेला अजिंक्यपद

व्यावसायिक पुरुष गटात पश्चिम रेल्वेने आपल्या पारंपारिक प्रतिस्पर्धी मध्ये रेल्वेवर बाजी मारताना जिल्हा अजिंक्यपदाला गवसणी घातली. मध्यंतराला घेतलेली एका गुणाची आघाडी तसेच उत्तम आक्रमण या जीवावर पश्चिम रेल्वेने विजयश्री मिळवली.

पुरूष गटाच्या अंतिम सामन्यात पश्चिम रेल्वेने मध्य रेल्वेचा १२-११ (मध्यंतर ७-६) असा १ गुण व १:१० मिनिटे राखून पराभव केला. प्रसाद राडीयेने २, १:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. मनोज पवारने २, २:१० मिनिटे संरक्षण केले. दिपक मानेने आक्रमणात ४ गडी बाद केले. तर मध्य रेल्वेतर्फे दिपेश मोरेने १:३०, २ मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. मिलिंद चावरेकरने आक्रमणात ४ गडी बाद केले.

आजचे पारितोषिक वितरण माजी शेरीफ व लायन्सचे फर्स्ट व्हाइस गवर्नर डॉ. जगन्नाथ हेगडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ माहीमचे अध्यक्ष ॲड. अरुण देशमुख लायन्स क्लब ऑफ मुंबई एलिटचे मोहन वायदंडे तसेच दोन्ही संस्थांचे विविध लायन्स हे जातीने उपस्थित होते. मुंबई खो खो संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पहिल्याच वर्षी महिलांचे व्यवसायिक गटाचे विजेतेपद मिळवताना रचना नोटरी वर्क्सने मुंबई पोलीसांचा ७-६ (मध्यंतर ५-२) असा १ गुण व ५:३० मिनिटे राखून पराभव केला व मुंबई जिल्हा अजिंक्यपदावर नाव कोरले. पुरुष व महिला व्यावसायिक गटांचे या प्रसंगी बक्षीस वितरण करण्यात आले.

सर्वोत्कृष्ट आक्रमक :- मिलिंद चावरेकर (मध्य रेल्वे), मयुरी लोटणकर (मुंबई पोलिस)

सर्वोत्कृष्ट संरक्षक :- मनोज पवार (पश्चिम रेल्वे), संजना कुडव (रचना नोटरी)

अष्टपैलू :- प्रसाद राडिये (पश्चिम रेल्वे), सेजल यादव (रचना नोटरी)

फोटो:- पश्चिम रेल्वे (पुरुष) संघसोबत प्रशिक्षक गंगाधर राणे व व्यवस्थापक भोईर व रचना नोटरी वर्क्स (महिला) संघसोबत प्रशिक्षक ॲड. अरुण देशमुख

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!