क्रीडा व मनोरंजन

आंतर हॉस्पिटल क्रिकेट: सेव्हन हिल्स हॉस्पिटलची विजयी सलामी  

Spread the love

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंट सहकार्याने मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे आणि कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या गौरवार्थ आयोजित आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये सेव्हन हिल्स हॉस्पिटलने सलामीचा साखळी सामना जिंकला. सेव्हन हिल्स हॉस्पिटलने सुशांत गुरवच्या आक्रमक फलंदाजीमुळे कस्तुरबा हॉस्पिटलचा ५ गडी राखून पराभव केला. माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, माजी क्रिकेटपटू व प्रशिक्षक दीपक पाटील, ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे संचालक ओमकार मालडीकर, एमबी युनियनचे सेक्रेटरी धर्मेश नाडकर्णी, पारसी जिमखान्याचे फिरोज कार्तक यांच्या प्रमुख उपस्थितीत सुशांत गुरवला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

क्रॉस मैदान येथील एमबी युनियन खेळपट्टीवर सेव्हन हिल्स हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून कस्तुरबा हॉस्पिटल संघाला प्रथम फलंदाजी दिली. डॉ. परमेश्वर मुंडे, अंकुश जाधव आदी प्रमुख फलंदाज लवकर बाद झाल्यामुळे कस्तुरबा हॉस्पिटलची १२ व्या षटकाला ८ बाद ४२ धावा अशी बिकट अवस्था कृपाल पटेल (३ धावांत ३ बळी), विशाल सावंत (२३ धावांत २ बळी), सैफअली शेख (१८ धावांत २ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीने केली. तळाचे फलंदाज मंगेश आगे (१६ चेंडूत नाबाद ३७ धावा), महेश सनगर (२८ चेंडूत २१ धावा) व सुनील शिंदे (१३ चेंडूत १४ धावा) यांनी कस्तुरबा हॉस्पिटल संघाला सर्वबाद १०३ धावा असा शतकी पल्ला गाठून दिला. सुशांत गुरव (३२ चेंडूत नाबाद ३५ धावा), अमोल तोरस्कर (२८ चेंडूत २० धावा), डॉ. इब्राहीम शेख (१२ चेंडूत १२ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे सेव्हन हिल्स हॉस्पिटलने १६ व्या षटकाला ५ बाद १०४ धावसंख्या रचून विजय संपादन केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!