क्रीडा व मनोरंजन

आंतर हॉस्पिटल क्रिकेट: केडीएचा लीलावतीवर विजय

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई, कोकिळाबेन धीरूभाई अंबानी-केडीए हॉस्पिटलने बलाढ्य लीलावती हॉस्पिटल संघावर २३ धावांनी विजय मिळवून माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे व क्रीडा संघटक गोविंदराव मोहिते गौरवार्थ आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेमधील पहिल्या साखळी सामन्यात दोन गुण वसूल केले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंट सहकार्याने सुरु झालेल्या स्पर्धेत चौकार व षटकारांची आतषबाजी करीत प्रतिक घरत व अलकेत तांडेल यांनी फटकाविलेल्या  अर्धशतकामुळे केडीए हॉस्पिटलचा विजय सुकर झाला.  अष्टपैलू प्रतिक घरतला सामनावीर पुरस्कार देऊन क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, धर्मेश स्वामी, देवेंद्र भांसे, मनोहर पाटेकर व संयोजक शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी क्रॉस मैदानात गौरविले.

लायन डॉ. जगन्नाथराव हेगडे, क्रिकेटपटू व प्रशिक्षक दीपक पाटील, ओम्नीचे संचालक ओमकार मालडीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेला नाणेफेकीचा कौल केडीए हॉस्पिटलने जिंकला. अष्टपैलू प्रतिक घरत (३६ चेंडूत ५१ धावा, ३ षटकार व ४ चौकार) व अलकेत तांडेल ( ४२ चेंडूत ५६ धावा, १ षटकार व ५ चौकार) यांच्या आक्रमक अर्धशतकी फलंदाजीमुळे केडीए हॉस्पिटलने मर्यादित २० षटकामध्ये ७ बाद १३९ धावांचे आव्हान लीलावती हॉस्पिटल विरुद्ध उभे केले. अंकित साळसकर, मनोहर पाटेकर, जगदीश कोठारे, प्रवीण पांचाळ यांनी विकेट घेणारी गोलंदाजी केली.

लीलावती हॉस्पिटलने विजयी लक्ष्याचा उत्तम पाठलाग करीत असतांना खेळपट्टीवर सेट झालेला प्रमुख फलंदाज धर्मेश स्वामीची (२७ चेंडूत २० धावा) विकेट धावचीतने गमावली आणि लीलावती हॉस्पिटलचा डाव ४ बाद ८१ धावसंख्येवरून १९.४ षटकामध्ये ११६ धावांत गडगडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!