प्रसाद, अमेय, गणेश, जुईलीचे घवघवीत यश
क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर
मुंबई : फिडेतर्फे महाराष्ट्रातील प्रसाद घाटे, अमेय चव्हाण, गणेश भिलारे, जुईली कुलकर्णी या चौघांना ‘फिडे इन्स्ट्रक्टर’ हा किताब देण्यात आला आहे. ऑल इंडिया चेस फेडरेशनने बंगळुरू येथे फिडे ट्रेनर सेमिनारचे आयोजन केले होते. त्यामधून प्रत्येक राज्यातील ४ पुरुष आणि १ महिला प्रशिक्षक यांची निवड करण्यात आली होती. मग सेमिनार आणि परिक्षेतील कामगिरी या आधारे या चौघांना हा किताब मिळाला. हे चौघेही चांगले खेळाडू आहेत. आता त्यांना ‘फिडे इन्स्ट्रक्टर’ हा किताब मिळाल्यामुळे भविष्यात युवा खेळाडूंना अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करता येईल. तसेच प्रशिक्षण देण्याची मोठी संधी देखील या चौघांना मिळेल. या अगोदर महाराष्ट्रातील धनेश श्रीखंडे, प्रसाद देशमुख, नितीन वर्दे, राजाबाबू यांना देखील हा किताब मिळाला होता.