ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संख्याशास्त्रज्ञ फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा १२ मे हा जन्म दिन विशेष. फ्लॉरेन्स नाइटिंगेल : द लेडी विथ ‘डेटा’ ! .

Spread the love

अग्रगण्य परिचारिका आणि आधुनिक रुग्ण परिचर्या (शुश्रूषा) शास्त्राच्या संस्थापिका, लेखिका तसेच समाजसुधारणेसाठी सांख्यिकी शास्त्राचा वापर करणाऱ्या संख्याशास्त्रज्ञ फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा १२ मे हा जन्म दिन. संख्याशास्त्राची कोणतीही पदवी पदरी नसताना १८५९ मध्ये त्या रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून निवडून आल्या. अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनने देखील त्यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले. रशियाविरुद्धच्या क्रीमिया येथील युदधावेळी त्यांनी हातात मेणबत्ती (कंदील) घेऊन रात्र-रात्र जागून जखमी सैनिकांची सेवा केल्याने त्यांना ‘लेडी विथ दि लैंप’ ची उपाधी मिळाली होती. तथापी, लोककल्याणासाठी सांख्यिकीय माहितीचा वापर करणाऱ्या आणि वैद्यकीय संख्याशास्त्राच्या संस्थापिका मानल्या गेलेल्या नाइटिंगेल यांना ‘लेडी विथ दि डेटा’ म्हंटले तर गैर ठरणार नाही. त्यांचा जन्मदिन जगभरात ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या बहुआयामी कार्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न*

*फ्लॉरेन्स नाइटिंगेल : द लेडी विथ ‘डेटा’ !*

किंवा

*फ्लॉरेन्स नाइटिंगेल : द लेडी विथ ‘लॅम्प’ !*

फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म इटलीतील फ्लॉरेन्स येथे १२ मे १८२० रोजी एका समृद्ध आणि उच्चवर्गीय ब्रिटिश परिवारात झाला. त्यांचे शिक्षण घरीच झाले. त्यांच्या वडिलांनी त्यांना ग्रीक, लॅटिन,फ्रेंच, जर्मन,व इटालियन या भाषाशिवाय इतिहास, तत्वज्ञान व गणित हे विषय शिकविले. नाइटिंगेल यांना लहानपणापपासूनच गणितात गती होती. पुढे आयुष्यभर त्यांनी विविध भाषांचा अभ्यास चालू ठेवला. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या. तथापि, रुग्णालयात जाऊन रुग्णपरिचर्या शिकावी या त्यांच्या इच्छेला तीव्र विरोध झाला व संसदेच्या कामकाजाचे वृतांत अभ्यासावेत,असे सुचविण्यात आले. मात्र पुढील तीन वर्षात त्या सार्वजनिक आरोग्य व रुग्णालये या विषयातील तज्ञ म्हणून गणल्या जाऊ लागल्या. १८५० साली जर्मनीमधील कैसरव्हर्ट येथील एका संस्थेत दाखल झाल्या आणि त्यांनी रुग्ण परिचर्या विषयक संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला. १८५३ मध्ये लंडनच्या इन्स्टिटयूशन फॉर द केअर ऑफ सिक जंटलविमेन इन डिस्ट्रेसड सरकमस्टन्सेस या छोट्या रुग्णालयात त्या अधिक्षक म्हणून रुजू झाल्या.
क्रिमिया येथील कार्य- १८५४ मध्ये ब्रिटन, फ्रान्स, सार्डेनिया, तुर्कस्तान या देशांबरोबर रशियाचे क्रिमिया येथे युद्ध सुरू झाले. त्यावेळी ब्रिटिश मंत्रिमंडळातील युद्ध सचिव सिडनी हर्बर्ट यांनी नाइटिंगेल यांच्या कार्याचे महत्व लक्षात घेऊन त्यांना युदधभूमीकडे जण्याविषयी सुचविले. तेथे त्यांच्यावर तुर्कस्तानातील सर्व सैनिकी रूग्णालयातील रुग्णपरिचर्या विषयक व्यवस्थेची सोपवलेली जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली. तेव्हा तुर्कस्तानला जखमींची सेवा करण्यासाठी ३८ स्त्रियांचे एक पथक पाठविले होते. यावेळी डॉक्टर सैनिकांना तपासून गेल्यानंतर रात्रीच्या अंधारात मेंणबत्तीच्या प्रकाशात त्या जखमी सैनिकांची सेवा करीत असत. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना ‘लेडी विद द लैंप’ या उपाधी ने सम्मानित करण्यात आले. मात्र युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची सेवा करताना झालेल्या संसर्गाने त्यांना गाठले. १८५५ साली उस्कूदार रुग्णालयात पटकी व प्रलापक सन्निपात ज्वर (टायफस ज्वर) यांची उद्भवलेली मोठी साथ त्यांनी अथक प्रयत्नांiनी आटोक्यात आणली. ब्रिटिश सैनिकांचे आरोग्य, निवारा व अन्न यात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी अविरत परिश्रम घेतले. याबाबतीत परदेशी शासन यंत्रणा देखील त्यांचा सल्ला घेत असत. ब्रिटिश जनतेने उभा केलेल्या नाइटिंगेल निधीतून सेंट टॉमस रुग्णालयात नाइटिंगेल स्कूल फॉर नर्सेस ही स्त्रियांना रुग्णपरिचर्या विषयक शिक्षण देणारी जगातील पहिली संस्था स्थापन झाली.
संख्याशास्त्रातील योगदान- नाइटिंगेल यांना संख्याशास्त्राची गोडी होती. विविध प्रकारची आकडेवारी गोळा करून त्यातून निष्कर्ष काढण्यात त्यांना लहानपणापासूनच रस होता. तथापी, तेव्हा ब्रिटनमध्ये महिलांना महाविद्यालयात प्रवेश दिला जात नसे. मात्र त्यांनी स्वतःच अभ्यास करून संख्याशास्त्रात प्राविण्य मिळविले आणि त्याचा त्यांनी आपल्या कार्यात उपयोग करून घेतला व लोककल्याण साधले. म्हणूनच त्यांना वैद्यकीय संख्याशास्त्राच्या संस्थापिका मानले जाते. आकडेवारीचे आलेखांच्या माध्यमातून दृश्य सादरीकरण करणे, हे त्याकाळात फारसे प्रचलित नव्हते. विल्यम प्लेफेअर यांनी विकसित केलेल्या पाय आकृती सारख्या आलेखांचा त्यांनी परिणामकारकपणे वापर केला. नाइटिंगेल यांचे संख्याशास्त्रातील सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे, त्यांनी विकसित केलेली ध्रुवीय क्षेत्र आकृती. या प्रकारच्या आलेखास ‘नाइटिंगेल रोझ प्लॉट’ असेही म्हटले जाते. ही रेखाकृती आधुनिक वृत्तीय आयतकृतीचे (सरक्यूलर हिस्टोग्राम) किंवा पाय डायग्राम चे पूर्वरूप आहे. हिस्टोग्राम हे वंटण फलनाचे (डिस्ट्रिब्यूशन फंक्शन) आयताकृतीद्वारे केलेले निदर्शन आहे. निरीक्षित मूल्यांची ज्या अंतरालामध्ये (इंटरव्हल) विभागणी केलेली असते, ते अंतराल आयताच्या रुंदीने तर प्रत्येक अंतरालात घडणाऱ्या निरीक्षणांची संख्या आयताच्या ऊंची ने दर्शविली जाते. आशा रेखाकृतींच्या संकलनाला त्यांनी ‘कॉक्सकोम्ब’ हे नाव दिले होते. पारंपरिक शाब्दिक संख्याशास्त्री अहवाल समजू न शकणाऱ्या अधिकारी आणि सांसदासाठी त्यांनी या ‘कॉक्सकोम्ब’ चा व्यापक उपयोग केला. त्यांच्या सन्मानार्थ या आलेखाला ‘नाइटिंगेल कॉक्सकोम्ब’ म्हंटले जाते. स्वतः काम करीत असलेल्या लष्करी रुग्णालयातील दर महिन्यातील मृत्यूंची संख्या व कारणे यांचे सादरीकरण करण्यासाठी त्यांनी या आकृतीचा उपयोग केला. एरवी आकडेवारीच्या जंजाळामुळे संसद सदस्य आणि सरकारी अधिकारी यांच्याकडून असे अहवाल दुर्लक्षित राहात असत. तथापि, नाइटिंगेल यांनी केलेल्या प्रभावशाली दृश्य सादरीकरणामुळे सैनिकांसाठीच्या वैद्यकीय सुविधा किती अपुऱ्या आहेत याची जाणीव होऊन या वैद्यकीय सुविधांचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न सुरु झाले. फ्रान्सिस् गाल्टन आणि कार्ल पिअर्सन या संख्याशास्त्रज्ञांना प्रभावित करून उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये ‘उपयोजित संख्याशास्त्र’ हा नवा शब्दप्रयोग त्यांनी अंमलात आणला. त्यानंतर १९११ मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथे उपयोजित संख्याशास्त्र विभाग सुरू करण्यात आला.
नाइटिंगेल यांनी लेखनही केले असून त्यांचा ‘नोटस ऑन नर्सिंग’ (१८६०) हा नावाजलेला ग्रंथ आहे. तर ‘नोटस ऑन मॅटर्स अफेकटींग द हेल्थ, एफिशियन्सी अँड हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ दी ब्रिटिश आर्मी’ हा त्यांचा मोठा ग्रंथ १८५८ साली प्रसिद्ध झाला आहे. १८८३ साली राणी व्हिक्टोरिया ने त्यांना रॉयल रेड क्रॉस पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय, १९०७ मध्ये त्यांना ब्रिटिश सरकारकडून ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा किताब बहाल करण्यात आला. असा किताब मिळविणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रूग्णसेवा केल्यामुळेच परिचर्याशास्त्राला नवीन दिशा मिळाली. त्यांच्या आधी आजारी जखमींच्या उपचारावर फारसे लक्ष दिले जात नसे, परंतु नाइटिंगेल यांनी हे चित्र पार बदलून टाकले. १३ ऑगस्ट १९१० रोजी, वयाच्या ९० व्या वर्षी त्यांचे लंडन येथे निधन झाले. त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन !
*प्रा. विजय कोष्टी, सहयोगी प्राध्यापक,* *सांख्यिकी विभाग* *पी.व्ही.पी. कॉलेज कवठे महांकाळ* *(जि.सांगली) ९४२३८२९११७*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!