ताज्या घडामोडी

प्रा. डॉ. जयवंतराव इंगळे यांना जायंटस् सहेली या इस्लामपूर येथील आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Spread the love

 प्रा. डॉ. जयवंतराव इंगळे यांना जायंटस् सहेली या इस्लामपूर येथील आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. नवनिर्मिती, संशोधन, प्रबोधन या स्तरावर कार्य करणाऱ्या शिक्षकांना या वेळी पुरस्कार जाहीर करण्यात आले असून त्या पुरस्कारासाठी प्रा. डॉ. जयवंतराव इंगळे यांची निवड करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सामाजिक परिवर्तनात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. शिक्षक हे शैक्षणिक गुणवत्ता प्रस्थापित करत असतात. परिणामी त्यातून निर्णय घेणारी गुणवान पिढी समाजाला नवी दिशा देत असते. संशोधनात्मक काम करणारे शिक्षक हे आधुनिक भारताचे आधारस्तंभ असतात. म्हणून या वर्षी शैक्षणिक व्यवस्थेत प्रेरक आणि समाज उपयोगी कार्य करणाऱ्या शिक्षकांना सन २०२२ करिता आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सहेली ग्रुपने शिक्षकांच्या नवनिर्मिती, संशोधन व प्रबोधन कार्याचा गौरव करण्याचा निर्धार केला असून त्या पुरस्कारासाठी प्रा. डॉ. जयवंतराव इंगळे यांची निवड केली आहे.

प्रा. डॉ. इंगळे हे ट्रिपल पोस्ट ग्रॅज्युएट असून त्यांचे शिक्षण एम.ए., एम.फील, पीएच.डी., एम.ए. सब्जेक्ट कम्युनिकेशन, एम. ए. एज्युकेशनल कम्युनिकेशन पर्यंत झाले आहे. इस्लामपूर येथील महात्मा फुले विद्यालयात आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात त्यांचे संपूर्ण शिक्षण झाले आहे. सध्या ते रयत शिक्षण संस्थेच्या हुपरी येथील चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे महाविद्यालयात प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख या पदावर काम करीत आहेत. त्यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, ठाणे, रायगड इ. जिल्ह्यात नोकरी केली आहे. ते युनिव्हर्सिटी रँकर असून नॅशनल मेरिट स्कॉलर आहेत. ते शिवाजी विद्यापीठाचे मान्यताप्राप्त पदव्युत्तर शिक्षक असून ते पीएच. डी. चे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी मिळविली असून एका विद्यार्थ्याने एम. फील. पदवी मिळवली आहे. चार विद्यार्थी त्यांच्याकडे पीएच. डी. करत आहेत. सकाळ, पुढारी, लोकमत, महासत्ता, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात त्यांचे सुमारे ३० आर्थिक व सामाजिक लेख प्रसिध्द झाले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अर्थशास्त्र विषयाच्या विविध रिसर्च जर्नल्स आणि कॉन्फरन्स प्रोसिडिंग्जमध्ये त्यांचे सुमारे १०० शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. त्यांचे सहा संशोधन ग्रंथ प्रसिध्द झाले आहेत. विद्यापीठ, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील १३० परिषदांना ते उपस्थित राहिले असून ५० शोधनिबंध त्यांनी सादर केले आहेत. त्यांनी लिहिलेल्या लेख, शोधनिबंध आणि संशोधन ग्रंथांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील ३० पारितोषिके मिळाली आहेत. ही पारितोषिके मा. शरदचंद्रजी पवार, मा. मॉन्टेकसिंग अहलुवालिया, ना. सुषमा स्वराज, विविध कुलगुरु यांच्या हस्ते मिळाली आहेत. मोखाडा, विटा येथील महाविद्यालयांचा ‘बेस्ट रिडर अॅवार्ड’ त्यांना मिळाला आहे. राष्ट्रीय पातळीवरील आदर्श शिक्षक पुरस्कार आणि राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार त्यांना पुणे येथे मिळाले आहेत. आर्थिक, सामाजिक विषयावर विविध ठिकाणी त्यांनी १०० पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. यू ट्यूबवर विविध विषयावर त्यांची भाषणे आहेत. महात्मा गांधी यांच्या विचार व जीवन कार्यावर त्यांनी महाविद्यालयात १०० पेक्षा अधिक भाषणे दिली असून यू ट्यूबवर गांधी या विषयावर त्यांची सध्या ५० भाषणे आहेत. डॉ. इंगळे आदिवासी समाजाचे अभ्यासक असून ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात त्यांनी अनेक वर्षे नोकरी केली असून आदिवासींच्या पाड्यावर फिरुन कुपोषण, बालमृत्यू या विषयावर विविध विद्यापीठांना त्यांनी संशोधन प्रकल्प सादर केले आहेत. आदिवासींच्या प्रश्नावर त्यांनी एम. फील., पीएच.डी. केली आहे. आदिवासींच्या प्रश्नावर लिहिलेल्या दोन संशोधन ग्रंथांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार’ त्यांना दोनवेळा मिळाला आहे. आदिवासी समाजावरील त्यांच्या ग्रंथांना दहा पारितोषिके मिळाली आहेत. आदिवासींच्या प्रश्नांवर सुमारे १००० पानांचा प्रबंध त्यांनी शिवाजी विद्यापीठाला सादर करुन पीएच. डी. प्राप्त केली आहे. आदिवासींच्या प्रश्नांवर त्यांचे आणखी काही संशोधन ग्रंथ प्रसिध्दीच्या मार्गावर आहेत. त्यांनी आदिवासी भागात स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबीर, अंधश्रध्दा निर्मूलन, आदिवासी महिला शिबीर, विहिर स्वच्छता कार्यक्रम, आदिवासी प्रबोधन इत्यादी स्वरुपात समाजकार्यही केले आहे. सेंद्रिय शेतीवर त्यांनी पुस्तक लिहिले असून सेंद्रिय शेतील प्रबोधन मंडळामार्फत ते सेंद्रिय तथा नैसर्गिक शेतीचा प्रचार व प्रसार करत आहेत. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदार संघातून आमदारकीची निवडणूक लढवली होती. ते शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या ‘शिवार्थ’ या रिसर्च जर्नलचे प्रमुख संपादक आहेत. शिवाजी विद्यापीठाने नुकतीच त्यांना ‘प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स’ या पदावर पदोन्नती दिली आहे. प्रा. डॉ. इंगळे यांच्या अर्थशास्त्र आणि आदिवासी या विषयातील संशोधन कार्याची आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन इस्लामपूर येथील जायंटस् सहेली यांनी या वर्षीच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी डॉ. इंगळे यांची निवड केल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. साहित्यीक, समीक्षक प्रा. प्रदीप पाटील, मा. भूषण शहा इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले असून ‘जायंटस् सहेली’ च्या अध्यक्षा चारुशिला फल्ले, कार्यवाह प्रिया बोंगाळे, खजिनदार विद्या पाटील यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!