क्रीडा व मनोरंजन

५८ वी पुरुष-महिला राज्य अंजिक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा

Spread the love

पुणे, मुंबई, ठाणे, सांगली, उस्मानाबादसह रत्नागिरीची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

क्रीडा प्रतिनिधी: बाळ तोरसकर

हिंगोली, ६ नोव्हें. (क्री. प्र.)- आज दुसर्‍या दिवशीच्या सकाळच्या सत्रात साखळी सामन्यात महिला गटात सांगलीने नाशिकचा चुरशीच्या सामन्यात पराभव केला. तर पुणे, मुंबई, ठाणे, उपनगर, उस्मानाबाद, रत्नागिरी या संघांनी विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने हिंगोली जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली तालुका खो-खो असोसिएशन आयोजित ५८ वी पुरुष व महिला राज्य अंजिक्यपद व निवडचाचणी खो-खो स्पर्धा रामलिला मैदानात सुरू आहे.

दुसर्‍या दिवशीच्या सकाळच्या सत्रात महिला गटातील सांगली विरुध्द नाशिक हा सामना वगळता अन्य बहूतांश सामने एकतर्फी झाले. महिला गटामध्ये मुंबईने लातूरचा ११-६ असा एक डाव ५ गुणांनी पराभव केला. मुंबईतर्फे संजना कुडव (३.१० मि. संरक्षण व ४ गुण), श्रेया नाईक (३.३० मि. संरक्षण), मयुरी लोटणकर (२.२० मि. संरक्षण), रिध्दी कबीर (२.३० मि. संरक्षण व ३ गुण) असा खेळ केला. तर लातूरतर्फे वैभवी शिंदे (१.२० मि. संरक्षण) चमकली.

दुसर्‍या सामन्यात ठाण्याने धुळ्याचा १ डाव ८ गुणांनी (१५-७) असा पराभव केला. विजयी संघातर्फे साधना गायकवाड (२.५० मि. संरक्षण), शितल भोर (२.४० मि. संरक्षण व १ गुण), कल्याणी कनक (५ गुण), कविता चाणेकर (४ गुण) चांगला खेळ केला. तर धुळ्यातर्फे मानसी पाटील (१, १.२० मि. संरक्षण) व्यतिरिक्त अन्य कोणालाही चांगला खेळ करता आला नाही.

अन्य सामन्यात महिला गटात रत्नागिरीने पालघरचा १ डाव १० गुणांनी (१६-६), मुंबई उपनगरने औरंगाबादचा १ डाव ४ गुणांनी (११-७), मुंबईने सातार्‍याचा १ गुण आणि ८ मिनिटे राखून (११-१०), सोलापूरने अहमदनगरचा १ डाव ५ गुणांनी (१२-७), पुण्याने रायगडचा १ डाव १२ (१८-६) औरंगाबादने सिंधुदुर्गचा ४ गुणांनी (११-७) असा पराभव करत उपउपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

पुरुष गटात मुंबई उपनगरने रत्नागिरीचा एक डाव ११ गुणांनी पराभव केला. उपनगरतर्फे ओमकार सोनावणे (२.३० मि. संरक्षण), ॠषिकेश मुर्चावडे (२.३० मि. संरक्षण व १ गुण), अनिकेत पोटे (१.४० मि. संरक्षण व ३ गुण) असा तर रत्नागिरीतर्फे निखिल सनगले (१ मि. संरक्षण) चांगला खेळ केला.

औरंगाबादने जळगावचा १४-१२ असा १ डाव २ गुणांनी पराभव केला. औरंगाबादतर्फे अस्मित गावीत (२ मि. संरक्षण), आकाशा खोजे (२.१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी तर जळगावतर्फे स्वप्नील चौधरीने (२.१० मि. संरक्षण) चमकदार कामगिरी केली.

अन्य सामन्यात नंदुरबारने लातूरचा १ डाव १ गुण (१०-९), ठाण्याने सिंधुदुर्गचा १ डाव १२ गुणांनी (२१-९), अहमदनगरने नंदुरबारचा १ डाव २ गुणांनी (११-९), पालघरने नांदेडचा १० गुणांनी (१९-९), सांगलीने सातार्‍याचा १ डाव ५ गुणांनी (१६-११) यांनी उपउपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने वाटचाल केली.

दरम्यान, शनिवारी (ता. ५) सायंकाळी उशिरा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी खो-खो अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार, माजी खासदार अ‍ॅड. शिवाजी माने, आमदार तानाजी मुंटकुळे, आमदार संतोष बांगर, खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा, खजिनदार अॅड. अरुण देशमुख यांच्यासह अन्य हिंगोली जिल्ह्यातील अन्य मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!