ताज्या घडामोडी

पी.व्ही.पी. महाविद्यालयात भित्तिपत्र उद्घाटन आणि अतिथि व्याख्यान

Spread the love

कवठेमहांकाळ : प्रतिनिधी

(दि. ०९) येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील, महाविद्यालयामध्ये संख्याशास्त्र विभागाच्या वतीने प्रोफेसर सी. आर. राव यांच्या जन्मदिनानिमित्त भित्तिपत्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध संख्याशास्त्रज्ञाच्या कार्याची ओळख करुन देणारी तसेच संख्याशास्त्रावरील भित्तिपत्राचे प्रदर्शन केले होते. सदर भित्तिपत्राचे उद्घाटन आणि परीक्षण शहाजीराजे महाविद्यालय खटाव चे प्र. प्राचार्य अरविंद येलपले आणि संख्याशास्त्र विभागाचे प्रा. राजेंद्र खराडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रा. येलपले यांनी विविध विषयावरील भित्तिपत्रे तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. साईराज पाटील याचे बी.एस्सी. संख्याशास्त्र केल्यानंतर पुढील शिक्षणाच्या संधीची माहिती देणारे भित्तिपत्र उल्लेखनीय असल्याचे मत व्यक्त केले. यानंतर प्रा. खराडे यांनी आपल्या अतिथी व्याख्यानात संख्याशास्त्र विषयाची व्याप्ती आणि विविध क्षेत्रातील वाढते महत्व स्पष्ट करून संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरीच्या प्रचंड संधी असल्याचे सांगितले. तर प्राचार्य येलपले यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल जास्त असल्याचे सांगून मूलभूत विज्ञानाकडे विद्यार्थी फारसे वळत नाहीत असे सांगितले. विद्यार्थ्यांना विज्ञाना मधील पदवीनंतर अनेक अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्यांना मिळत असणाऱ्या सुविधांचा योग्य वापर करून आपले भवितव्य उज्वल करावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. एम.के. पाटील यांनी भित्ति पत्र निर्मितीचे महत्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासू वृत्तीचे कौतुक केले. तसेच सध्याचे दशक हे संख्याशास्त्राचे असून विद्यार्थ्यांनी संख्याशास्त्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यास त्यांना चांगल्या नोकरीच्या संधी सहज मिळतील असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रा. विजय कोष्टी यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.गणेश सातपुते यांनी केले. प्रा.शीतल पाटील, प्रा.प्राजक्ता पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सचिव सुदर्शन शिंदे आणि प्र. प्राचार्य डॉ. एम.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिथि व्याख्यान आणि भित्तिपत्र प्रकाशन सोहळा यशस्वीपणे संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!