क्रीडा व मनोरंजन

पुरुषांमध्ये नगरचे मुंबई शहर ला दे धक्का, अहमदनगरचे पहिले जेतेपद!! तर महिलांत पुणे सलग चौथ्यांदा अजिंक्य!!!

Spread the love

मुंबई शहरच्या दोन्ही संघांना उपविजेतेपद!

सायली केरीपाळेने एका चढाईत बोनससह ४ गडी टिपत सामना फिरविला.

६९ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा”

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

भिवंडी दि. ४ :-  पुण्याच्या महिलांनी सलग चौथ्यांदा, तर अहमदनगरच्या पुरुषांनी पहिल्यांदाच “६९व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत” जेतेपद मिळविले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने ठाणे जिल्हा कबड्डी असो.च्या यजमान पदाखाली हिंदवी युवा प्रतिष्ठान व वेताळ मंडळ यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

काल्हेर-भिवंडीतील बंदऱ्या मारुती क्रीडांगणावर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात अहमदनगरने मुंबई शहरचा “सुवर्ण चढाईच्या” डावात ३२-३१ असा पराभव करीत पहिल्यांदाच “श्रीकृष्ण करंडकावर” आपले नाव कोरले. इस्लामपूर-सांगली येथे १९९९ – २००० या मोसमात झालेल्या स्पर्धेत अर्जुन पुरस्कार पंकज शिरसाटच्या नेतृत्वाखाली नगरने अंतिम फेरीत धडक दिली होती. पण यजमान सांगलीकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. नगरने सुरुवात धडाकेबाज केली.पण मुंबईने सावध पवित्रा घेत सामन्यावर पकड घेतली. पूर्वार्धात १४-०८अशी मुंबईकडे आघाडी होती. उत्तरार्धात सामन्यातील चुरस आणखीच वाढत गेली. शेवटची ५मिनिटे पुकारली तेव्हा २३-२२अशी नगरकडे आघाडी होती. पुन्हा मुंबईने ३गुणांची आघाडी घेतली. पण शेवटच्या क्षणी नगरने २५-२५अशी बरोबरी साधली. त्यामुळे ५-५ चढायांचा डाव खेळविण्यात आला. यात देखील ३१-३१ (६-६) अशी बरोबरी झाली. शेवटी सामन्याचा निकाल लावण्यासाठी सामन्याच्या नियमानुसार “सुवर्ण चढाईचा” डाव खेळविण्यात आला. त्यानुसार पुन्हा नाणेफेक करण्यात येऊन ती नगरने जिंकली. नगरच्या शंकर गदई यांने ती चढाई केली व बोनस गुण घेत नगरला पहिल्यांदा विजेतेपदाचा मान मिळवून दिला. शंकर गदई हा कॅन्सरच्या रोगावर मात करून मैदान गाजवीत आहे. शंकरला चढाईत देवीदास जगताप, तर पकडीत राहुल धनवडे, संभाजी वाबळे, आदित्य शिंदे यांची उत्कृष्ट साथ लाभली. मुंबई शहरकडून अक्षय सोनी, सिद्धेश पिंगळे, हर्ष लाड, विजय दिवेकर यांनी चढाई-पकडीचा चतुरस्त्र खेळ करीत सामन्यातील चुरस कायम राखत विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण मुंबईच्या पराभवाने त्यांच्या आशा धुळीस मिळविल्या.  या विजयाबद्दल अहमदनगरचा अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू पंकज शिरसाट याला विचारले असता. तो म्हणाला, “माझे अपूर्ण राहिलेले विजयाचे स्वप्न शंकर गदईच्या नेतृत्वाखालील संघाने पूर्ण केले. याबद्दल त्याचे व त्याच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. विशेषकरून शंकराने आजारावर मात करून जी प्रगती केली आहे त्याचे खास अभिनंदन. या संघाच्या प्रगतीत  सातत्य राखण्यासाठी व ती उंचविण्यासाठी मी यापुढे माझ्यापरीने सर्व ते सहकार्य करेन.”

महिलांच्या अंतिम सामन्यात पुण्याने मुंबई शहरचे कडवे आव्हान २८-२४ असे परतवून लावत सलग चौथ्यांदा “पार्वतीबाई सांडव चषकावर” आपले नाव कोरले. तर मुंबई शहरला सलग तिसऱ्यादा उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. मुंबईने आक्रमक सुरुवात करीत आघाडी घेतली होती. पण पुण्याने देखील तोडीसतोड उत्तर देत पूर्वार्धात १२-१० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात मुंबईने पुन्हा आक्रमणाची धार वाढवीत खेळाची सूत्रे आपल्याकडे घेतली. शेवटची ५ मिनिटे पुकारली तेव्हा २२-१५ अशी मुंबईकडे आघाडी होती. पण याच वेळी पूर्ण डावात अपयशी ठरलेल्या सायलीने आपल्या एकाच चढाईत बोनस गुणासह ४गडी टिपत सामन्याचे चित्रच पालटून टाकले. पुण्याने नंतर लोण देत २५-२४ अशी आघाडी देखील घेतली. शेवटी पुण्याने ४गुणांनी हा सामना आपल्या नावे केला. पुण्याच्या या विजयात सायली केरीपाळेने ६चढायात ९ गुण व पकडीत १गुण घेत या विजयात महत्वाचा वाटा उचलला. स्नेहल शिंदेने १३ चढाईत ७ व मानसी रोडने ६ चढायात ४ गुण घेत तर अंकिता जगतापने ३ पकडी करीत उत्कृष्ट साथ दिली. पुण्याच्या विजयात प्रशिक्षक योगेश यादवचीही महत्वाची भूमिका आहे. त्याने पुणे पिछाडीवर असून देखील मोक्याच्या क्षणी अपयशी सायलीला चढाई देत तिच्यावर विश्वास दाखविला. तिनेच सामन्याचे चित्र पलटविले. मुंबई शहरकडून पूजा यादवने १५ चढाईत ८, तर श्रद्धा कदमने ९ चढाईत ५ गुण मिळविले. मेघा कदमने पकडीत ४ गुण मिळविले. पण मुंबईच्या पराभवाची हॅट्रिक काय ते थांबवू शकले नाहीत.

दोन्ही अंतिम सामने चुरशीने खेळले गेल्याने कबड्डी रसिकांनी सामन्याचा मनमुराद आनंद घेतला. या अगोदर झालेल्या पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात धुळ्याने मुंबई उपनगरचे आव्हान ३१-२९ असे संपवित तिसरा क्रमांक मिळविला. तर महिलात मुंबई उपनगरने पालघरला ३२-२६असे नमवित तिसरे स्थान मिळविले. या स्पर्धेला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सदिच्छा भेट दिली आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे बक्षिस वितरण आयोजक श्रीधर जयवंत पाटील, जयवंत पाटील, भरत पाटील, राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष शशिकांत गाडे, सरचिटणीस आस्वाद पाटील, खजिनदार मंगल पांडे, ठाणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील, कार्याध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष योगेश पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!