ताज्या घडामोडी

दर्जेदार लेगब्रेक गोलंदाज घडवण्याचा फ्रेंडशिपचा संकल्प

Spread the love

हीरक महोत्सवी मित्रमेळाव्यात तयार केला नियोजनबद्ध आराखडा

क्रीडा प्रतिनिधी: बाळ तोरसकर

ठाणे : जलद गोलंदाजीप्रमाणे फिरकी विशेषतः लेगब्रेक गोलंदाज हे फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचा हुकमी एक्का असायचा. या अनुभवाचा फायदा युवा क्रिकेटपटूंना देऊन दर्जेदार लेगब्रेक घडवण्याचा संकल्प फ्रेंडशिप क्रिकेट क्लबच्या हीरक महोत्सवी मित्र मेळाव्यात करण्यात आला.

क्लबचे सचिव प्रल्हाद नाखवा म्हणाले, अष्टपैलू क्रिकेटपटू हे संघाचे बलस्थान असायचे. त्यात लेगब्रेक गोलंदाज संघासाठी अनेकदा तारणहार ठरले. त्यामुळे हीरक महोत्सवी मेळाव्याची तयारी करताना लेगब्रेक गोलंदाजासाठी विशेष शिबीर आयोजित करण्याचा निर्णय झाला. करोनानंतर आता क्लबचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करताना क्लबचे संस्थापक क्रिकेटपटू मोहंन नाखवा (सौ भारती), कमलाकर कोळी (सौ प्रगती) , जगदीश कोळी (सौ रेखा ) आणि सुरेश ठाणेकर (सौ सस्मिता) या वैवाहिक जीवनाचे अर्धशतक पूर्ण करणाऱ्या दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात आला. याशिवाय क्लबच्या या साठ वर्षातील संस्मरणीय क्षणांच्या कृष्णधवल, रंगीत छायाचित्रांचा समावेश असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन क्लबचे ८८ वर्षीय जेष्ठ क्रिकेटपटू मदन नाखवा यांच्या हस्ते करण्यात आले.

या हीरक महोत्सवी मित्र मेळाव्यासाठी ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर शरद कोळी, मुंबई क्रिकेट संघटनेचे माजी उपाध्यक्ष विनोद देशपांडे, मैदानकमिटीचे उल्हास बाबरेकर, माजी नगरसेवक गिरीश राजे, स्पोर्टिंग क्लब कमिटीचे किशोर ओवळेकर, सुशिल म्हापुसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
चेंदणी कोळीवाड्यातील कुंभारवाडा (कोनबाळा ) मैदानावर टेनिसबॉल क्रिकेटप्रेमी युवकांनी एकत्र येत १९६० साली फ्रेंडशिप क्रिकेट क्लबची स्थापना केली. ठाण्यात आणि ठाणे जिल्ह्याच्या बाहेर होणाऱ्या अनेक क्रिकेट स्पर्धातून क्लबने स्पृहणीय यश संपादन केले. १९७२ साली सिझन बॉल क्रिकेटला सुरुवात केल्यावर १९७६ साली कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित २२ व्या बाळकृष्ण बापट ढाल उपनगरीय क्रिकेट स्पर्धेत क्लबने उपविजेतेपद मिळवले होते. त्याशिवाय ठाण्यात सपोर्टींग क्लब कमिटीतर्फे खेळवण्यात येणाऱ्या शामराव ठोसर ढाल क्रिकेट स्पर्धा, श्रीधर देशपांडे स्मृती वासंतिक क्रिकेट स्पर्धेत क्लबने आपली चांगली छाप पडली होती. पण नंतरच्या काळात कोनबाळा मैदानावर ठाणे महापालीकेच्या हरिचंद्र राऊत शाळा क्रमांक ९ आणि क्रमांक २७ ची उभारणी झाल्यावर क्रिकेट बंद पडले. त्यानंतर अकरा वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन साजरा करण्याचा उपक्रम क्लबने सुरु केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!