ताज्या घडामोडी

प्रतिभा परमेश्वर देतो तर समाज प्रतिष्ठा देतो, उद्योजक डी. के. राऊत यांचे प्रतिपादन, सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातीहितवर्धक मंडळाचे १०८ वे अधिवेशन संपन्न

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी ता.१३
सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातीहितवर्धक मंडळाची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि अधिवेशन डहाणू गटातील वाढवण येथील श्री क्षेत्र शंखोदर येथील स्व. केशव अर्जुन राऊत व्यासपीठ येथे रविवारी (ता.१३) पार पडले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या उद्योजक डी. के. राऊत यांनी सांगितले की, शिक्षण क्षेत्रात केलेली गुंतवणूक ही सर्वात मोठी गुंतवणूक असून प्रसंगी कर्ज काढा पण मुलांना शिक्षण द्या. शिक्षण घेऊन यू. पी. एस. सी. सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना उतरवा. मोठे अधिकारी व्हा, संरक्षण सारख्या क्षेत्रात उतरा. व्यवसाय सुरु करा. फक्त नोकरीच्या मागे लागू नका. नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा,असे सांगून आजचा शेतकरी कोणत्या समस्यांना तोंड देतोय हे सांगतांना काही वर्षांपूर्वी १५/२० खंडी भात पिकवणाऱ्या शेतकऱ्याला सध्या एकखंडी भात पिकविताना नाकातून दम येतो. ज्या समाजात आपण जन्मलो आहोत त्या समाजाचे आपण देणे लागत असून प्रतिभा परमेश्वर देतो तर समाज प्रतिष्ठा देतो असे सांगितले.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष संतोष पावडे होते. डहाणू गटाचे गटाध्यक्ष रवींद्र राऊत यांनी प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्ष प्रकाश राऊत यांनी डहाणू गटाचा परिचय करून दिला. या प्रसंगी मंडळाचे आजी- माजी पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अधिवेशनला कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली.

यावेळी केंद्र सरकारच्या वाढवण येथे येऊ घातलेल्या प्रकल्पाला विरोध दर्शवणारी प्रतिकृती निर्माण करण्यात आली होती. एकच जिद्द- वाढवण बंदर रद्द, असे बॅनर झळकले होते. तसेच नवीन पिढीला पुरातन वस्तूंचे स्मरण रहावे म्हणून कुणबी समाजात वापरत असलेल्या विविध जुन्यावस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.

यावेळी विविध विषयांवर विधायक चर्चा व निर्णय घेण्यात आले. तसेच मंडळातर्फे पूज्य रामचंद्र गोपाळ राऊळ स्मरणार्थ राज्यस्तरीय समाज रत्न सुवर्ण पुरस्कार वाढवण येथील दिनकर राऊत यांना तर, कै. लक्ष्मण महादेव राऊत स्मरणार्थ समाज भूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र राऊळ यांना, कै. दादोबा काशिनाथ ठाकूर स्मरणार्थ उद्योगरत्न पुरस्कार विनोद पाटील यांना तर लोकशाहीर आत्माराम पाटील जीवन गौरव पुरस्कार चंडीगाव येथील सुरेंद्र पाटील यांना आणि कै. महादेव नथुराम पाटील समाजमित्र पुरस्कार प्रफुल्ल साने यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी मंडळातर्फे दिले जाणारे अन्य पुरस्कार आणि पारितोषिके वितरित करण्यात आले. त्याच प्रमाणे समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या बंधू-भगिनीचा गौरव करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!