ताज्या घडामोडी

शिक्षण प्रक्रिया गतिमान होण्यासाठी गावाचा सहभाग मोलाचा, आगरी सेनेचे कार्याध्यक्ष चंदुलाल घरत यांचे प्रतिपादन कांद्रेभुरे दुर्गम भागातील आदर्शवत शाळा

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी
गावाच्या विकासासाठी जितके शिक्षण आवश्यक आहे तितकेच शिक्षण प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी गावाचा शिक्षणासाठी सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन आगरी सेनेचे कार्याध्यक्ष चंदुलाल घरत यांनी केले.

सफाळे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे असलेल्या दुर्गम भागातील कांद्रेभुरे येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या नवीन बांधण्यात आलेल्या शेड, तसेच नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रयोगशाळा, कार्यालय आणि पारचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (दि.२५) पार पडला. यावेळी बोलताना घरत यांनी सांगितले की, कांद्रेभुरे सारख्या दुर्गम भागातील जंगलात लायन्स क्लबच्या सिंहाने शिक्षणाचे केलेले नंदनवन हे निश्चितच कौतुकास्पद असून एक बोलकी शाळा म्हणून ही शाळा जिल्ह्यात ओळखली जाते असे सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ गोकुळधाम यशोधाम चे अध्यक्ष बलबीर सिंग बल्ला होते. बल्ला यांनी सांगितले की, ग्रामीण आणि अतिशय दुर्गम अशा भागामध्ये काम करत असताना शिक्षकांचे लाभलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे असून या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी लायन्स क्लब कटिबद्ध असेल. या भागातील केंद्रप्रमुख दीपिका नाईक यांनी गरजवंत शाळांना मदत करण्यासाठी शासनाने विद्यांजली पोर्टल सुरू केले असून या पोर्टलवर सामाजिक संस्था नोंदणी करून शाळांना विविध प्रकारची मदत करू शकतात असे सांगून कांद्रेभुरे येथील शिक्षकांनी शाळेचा केलेला कायापालट हा निश्चितच गौरवास्पद आहे असे सांगितले.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये कांद्रेभुरे गावचे उपसरपंच दुर्गेश भोईर यांनी सांगितले की, एक पडकी शाळा ते आयएसओ दर्जा प्राप्त असलेली शाळा हा कांद्रेभुरे शाळेचा प्रवास अत्यंत खडतर असा प्रवास आहे. आज कांद्रेभुरे शाळा ही राज्यात उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जात आहे. शाळेमध्ये परसबाग, बोलक्या भिंती, विज्ञान प्रयोगशाळा आणि कृतीतून शिक्षण हे प्रयोग आदर्शवत आहेत.

याप्रसंगी कांद्रेभुरे गावच्या सरपंच शिल्पा म्हसकर, लायन्स क्लब चे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर जे. व्ही. राव, लायन्स क्लब ऑफ सफाळ्याचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, लायन्स क्लब ऑफ गोकुळधाम यशोधाम चे उमेश जोशी, एस.एम.पाटील, किशोर मुसळे ट्रस्टचे विवेकानंद सामंत, कांद्रेभुरे शाळेच्या शिक्षिका जागृती चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते लायन्स क्लब ऑफ गोकुळधाम यशोधाम व विविध दात्यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या शेड, प्रयोगशाळा, कार्यालय आणि झाडांना बांधण्यात आलेल्या तीन पारांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच लायन्स क्लब तर्फे गरजू विद्यार्थ्यांना सायकल, शैक्षणिक साहित्य, प्लास्टिक मॅट आणि गावातील महिलांना ब्लॅंकेट्स आणि कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात आल्या. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आजी-माजी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

याप्रसंगी कांद्रेभुरे गावच्या सरपंच शिल्पा म्हसकर, उपसरपंच दुर्गेश भोईर, पोलीस पाटील अनिषा पाटील, आगरी सेनेचे कार्याध्यक्ष चंदुलाल घरत, पंचायत समिती सदस्य तुकाराम सुमडा, लायन्स क्लब ऑफ सफाळ्याचे खजिनदार राजय चौधरी, सुधीर पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे विष्णू पाटील,ॲड. नवीन घरत, लायन्स क्लब चे पदाधिकारी व सदस्य आणि ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!