ताज्या घडामोडी

हा खेळ पैशांचा @डॉ. डी .एस .काटे

Spread the love

बेगडी श्रीमंती -फाजील फुगीरपणा- पोकळ दिखाऊपणा आणि
एक हात लाकूड नऊ हात धलपी* काढण्याची वृत्ती आर्थिक व्यवहारांमध्ये कधीही यशस्वी होत नाही..

स्थापत्य अभियंता पदविका पुणे येथे मी पास केल्यानंतर फक्त आणि फक्त सरकारी नोकरी असावी हीच इच्छा.
पण काय करावे? नोकरीसाठी जिकडे तिकडे अर्ज केले..
सरकारी नोकरी त्यावेळेस लागलेल्या झिरो बजेटमुळे कुठेच लागली नाही…

मग खाजगीच नोकरी करण्याचा मार्ग निवडला. तब्बल सहाशे रुपये प्रति महिना एक वर्षभर साईट इंजिनियर म्हणून नोकरी केली..

आपण स्वतः काही तरी शिक्षणाच्या अनुषंगाने व्यवसाय करावा असे वाटत होते. पण एक वर्षाच्या अनुभवावर असे काही निर्णय घेणे म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.. असेही दुसरे मन सांगत असे …

मी खंबीरपणे निर्णय घेतला आणि शेवगाव येथे तालुक्याच्या ठिकाणी स्थापत्य अभियंता सल्लागार व छोटी मोठी ठेकेदारीचे कामे करण्यास सुरुवात केली.

व्यवसाय चालू केला खरा. पण काय करणार भांडवलाची कमतरता??

घरी अठरा विश्व दारिद्र्य आणि पैशाशिवाय तर काही चालत नाही हे आपल्याला माहीतच आहे…
काय करावे कळेना?
एक तर चालू असणारी नोकरी ही सोडली आणि दुसरीकडे व्यवसायामध्ये उतरल्यानंतर तेथील संघर्ष, त्याचबरोबर स्पर्धा आणि सत्य व प्रामाणिकपणा कधी कधी व्यवसाय आडवा यायचा..

अशा हलाखीच्या परिस्थितीमध्ये कधी कधी जीव नकोसा वाटायचा !

कारण त्या अगोदर अनेक नातेवाईक यांना पैसे मागितले असता कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही.
काहिनी माझ्याशी बोलणे सुद्धा सोडून दिले..
मनाचा निश्चय पक्का केला. चल पुढे..??????

गावातील एक आमचे जवळचे भानुदास पालवे यांच्याकडे गप्पा मारता- मारता …

माझ्याकडे पैसा नाही मी काय करू ..
इंजिनियर झाल्यानंतर भांडवला अभावी व्यवसाय व नोकरी सोडून देऊन शेती करू का?

मला भांडवलासाठी कोणी मदत करेल का?
अशी विचारणा केली !

तर काय त्या भल्या माणसाने मला आपण कुठून तरी पैसे आणून देऊ याचे आश्वासन दिले.
आश्वासनावर मी एवढा जाम खुश झालो…

एक दिवस ते त्यांच्या पाहुण्याकडे छोट्या खेड्यात घेऊन गेले.. पाहूण्याचे साधी भोळी राहणीमान: मळके कपडे आणि पत्र्याच्या दोन-तीन पेट्या घरात होत्या ..
ही परिस्थिती पाहता
मी विचार केला की हा मनुष्य काय पैसा देईल??

भानुदास पालवे यांचे पाहुणे असल्यामुळे त्यांनी त्यास विनंती केली मुलगा चांगला आहे ..
घरी जमीन थोडीफार आहे …
आणि त्याला पैशाची आवश्यकता आहे…
तर आपण मदत करावी !

त्यांनी उत्तर दिले की गरज असल्यानंतर सर्वच गोड बोलतात !
सर्वच प्रामाणिकपणाचा आव आणतात.
पण दिलेला हातावरील पैसा हा परत येईल की नाही याची खात्री नसते…
मला या जगामध्ये बरेचसे वाईट अनुभव आलेले आहेत….

पण मी ऊसतोड कामगार असल्यामुळे मला ऊस तोडीसाठी बाहेरगावी जायचे आहे. पेटीत पैसे ठेवणे हेही धोकादायक आहे. त्यामुळे आज मी तुम्हाला पैसे देतो..
मग पत्र्याची पेटी उघडली आणि त्यातून काही चिल्लर; दोन रुपये पासून ते शंभर पर्यंत नोटा काढून तब्बल एक तासात पाच हजार रुपये मोजून माझ्याकडे दिले.
मी माझ्या खिशात असणाऱ्या भाकरीच्या फडक्यामध्ये ते बांधून एका पोतड्यामध्ये घालून गावी आलो …

होय! पाच हजार रुपयांवर व्यवसायाला सुरुवात केली …
पुढे छोटी छोटी कामं मिळाली विहिरीचा गाळ काढणे, रस्त्यावर मुरूम टाकने ..
कोणाचे घराचे नकाशा बनवणे, त्याचबरोबर कर्ज प्रकरणावर लागणारी अंदाजपत्रक बनवून देणे..

शेतकऱ्यांना विहीर, पाईप लाईन याचे आराखडे बनवून देणे …
अशी व्यवसायाला सुरुवात केली..
तेच खरे त्यावेळचे माझे स्टार्टअप!!
फक्त एकच ध्येय काम आणि व्यवसाय करून नेकीने पैसा कमावणे आणि उसने घेतलेले भांडवल परत करणे हाच उद्देश..

तब्बल सहा महिन्यातच माझे दहा-वीस हजाराचे भांडवल तयार झाले.. सहा सात महिन्यांनी माझी पाच हजार रुपये देण्याची इच्छा निर्माण झाली ..
मी त्यांच्याकडे जाण्याचे ठरवले…
ते इसम ऊसतोडीला गेलेले आहेत असे समजले..
ते परत येण्याचा आराखडा व दिवस ठरवून आम्ही त्यांच्या गावी गेलो. दोन दिवस मुक्काम केला तरी पाहुणे आले नाही …
तिसऱ्या दिवशी बैलगाडी घेऊन घेऊन ते घरी परतले..
आम्ही त्यांच्या हातावर ते पाच हजार पाचशे रुपये ठेवले.. आणि हात जोडून आभार मानले.
त्या देव माणसाच्या तोंडातून शब्द बाहेर पडले…

मी कधीमधी छोटी मोठी
ज्यांना पैशांची खरच गरज आहे त्यांनाच मदत करतो..
मी कधी मौज मजा करणाऱ्याला पैसे देत नाही.
काही जण व्याजाप्रमाणे पैसे वाढवून देतात.. पण माझा व्यवसाय नाही. मदत करण्याची वृत्ती आहे आणि तुझा प्रामाणिक पाहून तू हे जे पाचशे रुपये जास्त दिलेले आहेत मी तुला माफ करतो. तुझ्याकडून कुठलेही जादा पैसे घेत नाही …
आणि खरंच मला पक्की मिठी मारून त्यांनी आशीर्वाद दिला
की
तुझा हा प्रामाणिकपणा! व्यवसाय करण्याची वृत्ती आयुष्यभर तुला साथ देईल आणि तुझी एवढी भरभराट होईल की पैसा तुझ्या मागे पळत राहील आणि व्यवसायामध्ये तू यशस्वी होऊन एक वेगळं नाव कमावशील..

त्या आशीर्वादाच्या बळावर आज मी व्यवसायामध्ये यशस्वीरित्या
प्रामाणिकपणे आणि समर्पित कष्ट करुन टिकाव धरून आहे..
आजही व्यवसायासाठी बँकेकडून कोट्यावधीची कर्जरूपी मदत घेतली; तरी त्या पाच हजाराच्या मदती एवढा आनंद होत नाही.

अर्थसाक्षरता याला सुद्धा व्यवसायात महत्त्व आहे. यासाठी मनुष्यास शिक्षणच लागते असं नाही!! अशा छोट्या छोट्या व्यवहारातून घटनेतून प्रसंगातून ती वर्धित करावे लागते..
पैसा मिळवला तरी
काहींना तो टिकवता येत नाही..

योग्य मार्गाने त्याचं विनिमय व गुंतवणूक करता येत नाही.
नुसताच अवास्तव गर्विष्ठपणा दाखवणे;
यामुळे पैशाच्या वाटा वेगळ्या मार्गाने जातात…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!