ताज्या घडामोडी

कवठेवाडी शाळेत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न.

Spread the love

रत्नागिरी: १२ मार्च

महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई यांचे कडून राबविण्यात येणाऱ्या कॉमन मिनिमम प्रोग्राम २०२३ या उपक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांचे मार्फत जि. प. मराठी शाळा कवठेवाडी वाटद खंडाळा या ठिकाणी कायदेविषयक जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.
रविवार दिनांक १२ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजता जि. प. मराठी शाळा कवठेवाडी या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘राईट टू फुड ॲन्ड एज्युकेशन’ या विषयावरती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कायदेविषयक स्वयंसेवक श्री अरुण मोर्ये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाकरिता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास बारगुडे, जि.प. कवठेवाडी शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे सर, सहशिक्षक डुमनारसर, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वाटद अप्पा धनावडे त्याचप्रमाणे वाटद गावातील ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे जि. प. मराठी शाळा कवठेवाडी या शाळेतील विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा व शिक्षणाचा मूलभूत अधिकार यावर बोलताना अरुण मोर्ये
म्हणाले की, आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी भांडताना आपल्याला आपल्या कर्तव्यांचा विसर पडता कामा नये, हक्क, अधिकार आणि कर्तव्य हे हातात हात घालून येत असतात. त्याचप्रमाणे आजचा ज्वलंत प्रश्न असलेला रत्नागिरी जिल्ह्यातील जि. प. मराठी शाळेतील विद्यार्थी शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहण्याची वेळ नजिकच्या काळात येऊ शकते कारण आधीच शिक्षकांची रिक्त असलेली ८०० पदं आणि आत्ता जिल्हा बदलीने जाणारे ७०० शिक्षक याच्यामुळे एकूण दीड हजार शिक्षकांची पदे रिक्त होत आहेत, सबब भरती केल्याशिवाय कुठलीही बदली होऊ नये, असं केल्यास अनेक शाळा एक शिक्षक होऊ शकतात आणि आणि जि. प. मराठी शाळेतील मुलं ही शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहू शकतात म्हणून याकडे शासनाने वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन अरुण मोर्ये यांनी केले.याकरिता पालकांकडून सहकार्य झाल्यास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन यावेळी बोलताना अरुण मोर्ये यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!