आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

पुन्हा लॉकडाऊन तर होणार नाही ना?

Spread the love

लेखक : हर्षल आल्पे


तळेगाव : सध्या एकच प्रश्न प्रत्येकजण एकमेकांना विचारतोय ,की , पुन्हा लॉक डाउन तर होणार नाही ना ? पत्रकार , पोलिस , राजकीय नेते , कार्यकर्ते आणि सामाजिक तसेच सरकारी क्षेत्रात काम करणारी इतर मंडळी यांना सर्व सामान्य माणूस हाच प्रश्न विचारतोय ,आणि त्यावर उत्तर एकच येते आहे ,फिरून फिरून , की , तूर्त तरी नाही .

सध्या पुन्हा एकदा कोरोंनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळते आहे . त्यात ओमिक्रोनही दाखल झाला आहे . जगभर पुन्हा एकदा कोविड चीच चर्चा सुरू आहे , रोज जागतिक बातम्यांमध्ये आज कुठला देश लॉकडाउन झाला, अमुक देशांमध्ये किती रुग्ण संख्या आहे , ती कशी वाढतीये , याच बातम्यांचा ऊहापोह केला जातोय , ज्या देशांबद्दल नेहमी आपण फारसे बोलताना दिसत नाही त्या देशांच्या आकडेवारीचा अभ्यास सुद्धा आपण करताना दिसतोय. नाहीतर साऊथ आफ्रिकेमध्ये मध्यंतरी रुग्ण संख्या वाढत होती आणि आता ती कमी होतीये याची विस्तृत माहिती आपल्याला एखाद्या चहाच्या ठेल्यावरही कळू लागलीये . एखाद्या पानटपरीवर रशियाची , अमेरिकेची , युगांडाची , बांग्लादेशची ताजी आकडेवारीही आपल्याला अगदी विस्तृत कळते आहे .

नेहमी आपण कुठे आपला भाग सोडून इतर भागांबद्दल उगाच चर्चा करू ना ! हल्ली कसा आहेस ? यावर मी इकडे आहे यातच मी बरा आहे , असे समज असे उत्तर ही मिळू शकते . एका मित्राला विचारले की कसा आहेस तर तो म्हणाला की आहे जीवंत आहे . त्याच्या उत्तरात तिरसटपणा वाटत असेल ही पण ? सध्याच्या परिस्थितीतच याचे उत्तर लपलेले आहे . गेली दोन वर्ष आपण तसे लॉकडाउनच होतो , काम कुठे आत्ता आत्ता त्याला गती मिळत होती , अर्थव्यवस्था ही आता बर्या पैकी जोर धरण्याची खात्री वाटायला लागली होती , पण आता पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढायला लागली आहे . त्यात ओमिक्रोन नावाचा कोविड चाच कुणी तरी भाऊबंद आलाय , आणि तो ही धुमाकूळ घालतोय .

काही तज्ञांच्या मते तो काही फारसा डेंजरस नसला तरी डब्ल्यूएचओ च्या मते त्याला कमी लेखून चालणार नाही . अशा परिस्थितीमध्ये या गोष्टींना हलक्यात घेऊन चालणार नाही , किंवा फार बेसावध होऊनही चालणार नाही . जसे काही लोक आजही समाजात “कोविड वैगेरे सगळे बकवास आहे , उगाचच नसते थोतांड माजवले जात आहे , आणि यात खूप मोठा भ्रष्टाचार आहे” असे छातीठोकपणे म्हणतात .तेव्हा हसावे की रडावे काही कळत नाही . बर ही लोक एवढेच म्हणून थांबत नाहीत .तर आरोपांची राळ उडवून देत म्हणतात की “एखाद्याला शिंका जरी आली तरी देतात ठोकून की झाला कोरोंना” अशी लोक म्हणणारे हे कोरोंनाचे , सरकार , प्रशासन यांनी घालून दिलेले नियम ही पाळत नाहीत . जिथे गर्दी करू नका असे सांगितले तरी गर्दी करतात . मास्क चा वापरही काही लोक करत नाहीत , लशीबाबत ही शंका उपस्थित करून त्याबाबतीत नसते गैरसमज पसरवत असतात . हे राजकारण कुठे तरी थांबले पाहिजे .
आपणच काळजी नाही घेतली तर प्रशासनाने काय करायचे ? नागरिकांची काळजी कशी घ्यायची हा ही यक्ष प्रश्न आहे , आणि यात केंद्र , राज्य वेगवेगळे करू नका , त्यात पुन्हा राजकारण आणू नका . प्रशासनात बसलेले लोक हे जनतेचा विचार करण्यासाठीच तिथे बसलेले असतात . एवढा साधा सिद्धांत तरी आपण सर्वांनीच लोकशाहीला मानले पाहिजे . प्रशासन , सरकार यांच्या चुका दाखविण्याचा आणि त्या दुरुस्त करवून घेण्याचा अधिकार ही आपल्याला सविधानाने दिला आहे . आणि लोकशाही मार्गाने आपले मत सरकारपर्यंत मांडले जाऊ शकते . यावर विश्वास दाखविला पाहिजे .


जसे की , हा लेख मांडू पाहतोय , की आज सगळेजण आम्ही थोडेसे भयभीत आणि थोडेसे गोंधळलेले आहोत , की मागील 2020 आणि 2021 मधील काही वेळ जसा भयंकर लॉकडाउन होता तसा पुन्हा होणार तर नाही ना ? कारण घरात बसणे , बाहेर न जाता , हे आता थोडेसे न परवडण्यासारखे आहे . अर्थार्जनासाठी समाजातील घटकांना या न त्या कारणासाठी बाहेर पडावेच लागते . किती ही नाही म्हंटले तरी . एक आयटी आणि अजून काही क्षेत्रे जर सोडली तर बहुतांश क्षेत्रे ही घराबाहेर जाऊनच काम करावे लागते . कारखान्यांमध्ये म्हणा किंवा इतर ज्या सेवा आणि कामे आहेत , जसे की सुतारकाम , गवंडीकाम या आणि अशा अनेक कामांसाठी आम्हाला बाहेर पडावे लागणारच आहे , त्याचा ही विचार व्हायला हवा , आरोग्य असेल तर सर्व काही येते मान्य , पण या सगळ्यात पोटाचा प्रश्न ही असतोच . आणि त्यात कुटुंब तुमच्यावर अवलंबून असेल तर हा लॉक डाउन निश्चितच न परवडण्यासारखा आहे .

काळजी आपण प्रत्येकानेच घेतली पाहिजे , सरकार , प्रशासन यांनी जनतेची काळजी घेतली पाहिजे , जसे की ते घेतीलच एखाद्या आदर्श पित्याप्रमाणे तर जनतेने ही माय बनून आपल्या कर्त्यासवर्त्या लेकराचे प्रेमपूर्ण भल्याचे मागणे ऐकून तशी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे . म्हणजे मग दोघे ही खुश असले की कुठलाच रोग आपले काहीच वाकडे करू शकणार नाही इतकेच …

आपण सर्वांनीच काळजी घेतली की मग हा प्रश्न की पुन्हा लॉकडाउन तर होणार नाही ना ? हा निर्माणच होणार नाही , आणि सगळेच समाधानी आयुष्य जगू शकतील . चला तर मग आपापली काळजी घेत मारूया आपण गगनभरारी !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!