आरोग्य व शिक्षण

विज्ञानाच्या मदतीमुळेच प्रगती साधता येईल – डॉ. राजेंद्र कांकरीया

Spread the love

चिंचवड : चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलच्या प्रतिभा महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान सप्ताह साजरा करण्यात आला.

महाविद्यालयातील विद्यार्थी तनय सुतार, तेजस जोगदंड यांनी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा यांनी केलेल्या भरीव आर्थिक मदत व प्रोत्साहनामुळे बनविलेल्या टेलिस्कोपचे उद्घाटन मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया यांच्या हस्ते करण्यात आले. इलेक्ट्रो फेस्टचे उद्घाटन प्रा. पंचशिल कांबळे यांच्या हस्ते तर, प्रतिभा शिक्षणशास्त्र विभागात आयोजित व्याख्यानाचे उद्घाटन व्याख्यात्या नंदिनी जाधव यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पालक ही उपस्थित होते.


यावेळी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी सुमारे तीसहून अधिक वेगवेगळ्या विषयावर संशोधन करून सामुहिक, वैयक्तिक प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्याची पाहणी कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी विज्ञान विभाग प्रमुख प्रा. नीता गटकळ, डॉ. राजश्री ननावरे, डॉ. जयश्री मुळे, प्रा. अब्रा रे, प्रा. तुलिका चटर्जी, डॉ. निशा चौधरी, प्रा. गितांजली ढोरे, प्रा. ज्योती इंगळे, प्रा. दिनेश आदी उपस्थित राहून पाहून प्रतिकृतीची पाहणी केली.

डॉ. राजेंद्र कांकरीया विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, वैज्ञानिक दृष्टीकोन ही विचार व कृती करण्याची पद्धती आहे. आपल्याकडे विज्ञानाची दृष्टी येण्यासाठी आवश्यक संधी आणि योग्य प्रकारचे शिक्षण मिळण्याची आवश्यकता आहे. मार्गदर्शन यापासून सर्व सामान्य वंचित राहिला आहे. अनेक बाबतीत अंधश्रद्धेचा पगडा राहीला आहे. लक्षात ठेवा आज विज्ञान युगातही अंधश्रद्धेला बळी पडतात. जगात चमत्कार नसतो, त्यामागे हातचलाखी विज्ञानच असते. कारण आपण प्रश्न विचारत नाही. तपासून पहात नाही. यासाठी शास्त्रीय दृष्टीकोनाचा शोध घेतला पाहिजे. संशोधन वृत्ती वाढविली पाहिजे. मनातील संकल्पना विज्ञानाच्या दृष्टीकोनातून तपासून घेतले पाहिजे. विज्ञानाच्या तथ्यांची लोकांना माहिती देवून जनजागृती केली पाहिजे.

यावेळी टेलिस्कोप बनविणारे विद्यार्थी तनय सुतार व तेजस जोगदंड यांचा स्मृतिचिन्ह देवून करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना दोघे म्हणाले. प्रथम कुतूहल व उत्सुकतेपोटी चंद्राकडे पहात होतो. त्यातून आवड निर्माण होत गेली. सुरवातीला घरच्या घरीच छोटे टेलिस्कोप बनविले त्याचे निष्कर्ष चांगले आले. पुढे महाविद्यालयातील विज्ञान विभागाच्या प्राध्यापकांनी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा यांची भेट घेवून सर्व माहिती सांगितल्यावर त्यांनी तात्काळ भरीव आर्थिक मदत प्रोत्साहन दिले. त्यांनी केलेल्या मदतीमुळेच भव्य टेलिस्कोप तयार करता आला. आकाशातील चंद्र, ग्रह, तारे यांचे जवळून निरीक्षण करता येणार आहे. याचा आस्वाद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दाखविण्यात येणार आहे.

व्याख्यात्या नंदिनी जाधव बी.एड. विभागात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थीनी व उपस्थित प्राध्यापकांना म्हणाल्या, अंधश्रद्धानिर्मुलन समितीत आल्यानंतर माझा विकास झाला. आम्ही संविधानाच्या चौकटीत राहूनच काम करतो. आपण सर्वजण भावीकाळात शिक्षिका होणार आहात. आजही समाजात अडाणीपणा आहे. पण समजावून सांगणार कोण हा प्रश्न आहे. लक्षात ठेवा माणुसकी एकच धर्म आहे. शिकलेले लोक देखील आज विज्ञान अनेकजण बळी पडत आहे. चमत्कार करणारे लबाड, पाखंडी असतात. हातचलाखी करत असतात. विज्ञान शिकता तसे, आत्मसात करणे महत्वाचे आहे. भूत असणे, जादूटोणा, कुंकू, यज्ञ, दिव्यामधून अग्नी निघणे, नारळ फोडणे आदीची प्रात्यक्षिके दाखवून त्यामागची शास्त्रीय कारणांची सखोल माहिती दिली. यासाठी प्रबोधन होणे महत्वाचे आहे. शिक्षक झाल्यानंतर मुलांवर वैज्ञानिक दृष्टीकोन शिकवून येणार्‍या पिढीवर चांगले संस्कार करून वैचारिक बदल घडवून आणण्याचे आवाहन केले. यावेळी बी.एड. विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनींनी अंधश्रद्धा निर्मुलन गीत व नाटीका सादर केली.

प्रास्ताविक डॉ. सुवर्णा गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन वृक्षाली पोतदार, गुलअफरोज शेख यांनी तर, आभार डॉ. संतोष उमाटे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!