क्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

अंबरनाथ येथे बैलगाडा शर्यतीवरून वाद आणि गोळीबार. 

Spread the love

अंबरनाथ येथे बैलगाडा शर्यतीवरून वाद आणि गोळीबार.     

आवाज न्यूज: प्रतिनिधी  अंबरनाथ १४ नोव्हेंबर.

अनेक वर्षाचा संघर्ष आणि आंदोलनानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार देशात बैलगाडा शर्यत सुरू झाली.  कोर्टाच्या आदेशानुसार बैलगाडा शर्यत सुरू होताच; देशातील आणि राज्यातील सर्व बैलगाडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले व राज्यात बैलगाडा शर्यत भरवण्यसा सुरू झाल्या. परंतु आता या शर्यतील राज्यात गालबोट लागत असून, या शर्यतीदरम्यान अनेक गंभीर गुन्हे देखील घडताना पाहायला मिळत आहेत. तर अंबरनाथ येथे बैलगाडा शर्यतीतून वादातून झाला व यावेळी अंधाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पनवेलच्या पंढरीशेठ फडके गटाने कल्याणच्या राहुल पाटील गटावर हा गोळीबार केला असून, गोळीबाराच्या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे.

तसेच गोळीबारीनंतर फडके गटाने राहुल पाटील यांना व्हॉईस मेसेज पाठवत पुन्हा धमक्या दिल्याचं समोर आलं आहे.  तर २४ तासात पोलिसांनी आरोपी न पकडल्यास ठाणे आणि रायगड जिल्हा बंद करण्याचा इशारा राहुल पाटील यांनी दिला आहे. 

सविस्तर माहितीनुसार; पनवेलचे पंढरीशेठ फडके हे महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष असून, राहुल पाटील हे कल्याणच्या आडीवली गावात राहणारे बैलगाडा मालक आहेत. या दोघांमध्ये मागील वर्षभरापासून बैलगाडा शर्यतीत जिंकण्या-हरण्यावरून सातत्याने वाद सुरू होते. दोन्ही गटाकडून अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांना आव्हानं दिली जात होती. त्यामुळेच कधीतरी हे दोन गट समोरासमोर येण्याची आणि त्यातून अनर्थ घडण्याची भीती बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांना देखील होती. त्यामुळेच अंबरनाथमधील बोहोनोली गावात आज या दोघांनाही समोरासमोर बसवून त्यांच्यात समेट घडवण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीपूर्वीच अंबरनाथ एमआयडीसीत हे दोन गट समोरासमोर आले आणि त्यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली.

अंबरनाथ एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ राहुल पाटील आणि पंढरीशेठ फडके हे समोरासमोर आले. यानंतर त्यांच्यात वाद होऊन पंढरीशेठ फडके समर्थकांनी राहुल पाटील आणि त्यांच्या समर्थकांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी तब्बल १५ ते २० गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती राहुल पाटील यांनी दिली. सोबतच राहुल पाटील यांच्या समर्थकांची गाडी सुद्धा फोडण्यात आली. सुदैवानं या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही. या घटनेनंतर दोन्ही गटांनी तिथून काढता पाय घेतला. मात्र, काही वेळातच राहुल पाटील यांचे शेकडो समर्थक घटनास्थळी जमले. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली. तर गोळीबाराच्या घटनेनंतर पंढरीशेठ फडके गटाने पुन्हा एकदा व्हॉईस मेसेज पाठवत राहुल पाटील यांना धमकी दिली. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. या प्रकरणात आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी ८ ते १० टीम रवाना करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलीसठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर राहुल पाटील यांनी संताप व्यक्त केला. मला बैठकीसाठी बोलवत आधीच कट रचून मला मारण्यासाठी फिल्डिंग लावण्यात आली आणि माझ्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची माहिती राहुल पाटील यांनी दिली. सोबतच पोलिसांनी २४ तासात आरोपींना न पकडल्यास ठाणे आणि रायगड जिल्हा बंद करण्याचा इशाराही राहुल पाटील यांनी दिला आहे. या घटनेमुळे बैलगाडा शर्यतीतले वाद अतिशय टोकाला गेल्याचं पाहायला मिळत असून, दोन्ही गटातील वैर भविष्यात आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे आता या सगळ्यात पोलिसांच्या कारवाईकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तर अनेक वर्षानंतर सुरू झालेल्या या शर्यतीला गंभीर गुन्ह्याचं गालबोट लागलं आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!