आपला जिल्हाऐतिहासिकमहाराष्ट्र

लोहगड विसापूर विकास मंचाचा सन्मान..

Spread the love

लोहगड विसापूर विकास मंचाचा सन्मान..Honored by Lohgad Visapur Development Forum..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ९ एप्रिल.

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाला राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संघटना सेवारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुणे येथे पार पडलेल्या गुणिजन गौरव महासंमेलन २०२३ पुरस्कार वितरण सोहळ्यात मंचाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंचाच्या वतीने संस्थापक सचिन टेकवडे, संदीप गाडे, विश्वास दौंडकर, सचिन निंबाळकर, अनिकेत आंबेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार प्रेरणा देतात; प्रेरणेने राष्ट्र मोठे होते या ब्रीदवाक्यानुसार कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, शेती आदी क्षेत्रात कार्यरत व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात येतो. यावेळी लोहगड विसापूर विकास मंचाच्या दुर्गसंवर्धन कार्याची दखल यावेळी घेण्यात आली.

मावळ तालुक्यातील लोहगड व विसापूर या किल्ल्याच्या संवर्धनासाठी मंच गेली २३ वर्षे कार्यरत आहे. “संघटन मावळ्यांचे, संवर्धन गड-किल्ल्यांचे” या प्रेरणेने लोहगड किल्ल्याचा कायापालट झाला. मंच, लोहगड घेरेवाडी ग्रामस्थ व भारतीय पुरातत्व विभाग यांच्या संघटित प्रयत्नातून आज दिमाखात पुन्हा कात टाकून उभा राहिलेला लोहगड आपणास पहायला मिळतो. मुख्य द्वाराला बसविलेला भक्कम सागवानी दरवाजा हा महाराष्ट्रातील पहिला किल्ला म्हणून हा मान लोहगडाला जातो. पुढे मंचाच्या मागणीला आणि पाठपुराव्याला यश आले आणि शिवकालीन प्रथेनुसार गडाचे दरवाजे दररोज संध्याकाळी बंद झाल्यामुळे गडावरील अनुचित प्रकारांना आळा बसला. मंच आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. लोहगडाच्या पायथ्याला भव्य शिवस्मारक उभे राहिले. मंचाच्या पाठपुराव्यामुळे लोहगडाचे तटबंदी, बुरुज, पायऱ्या, दिशादर्शक फलक इत्यादी दुर्गसंवर्धनाची कामे भारतीय पुरातत्व विभागामार्फत पूर्ण करण्यात आली. “ऐतिहासिक किल्ल्यांचे पावित्र्य व संघटित मावळा निर्माण करणारा उपक्रम” म्हणजे मंचाच्या पुढाकाराने दरवर्षी साजरा होणारा लोहगड महाशिवरात्र उत्सव. तसेच, विसापूर किल्ल्यावरील शिवमंदीराचा देखील जीर्णोद्धार करण्यात आला. मंचाच्या वतीने गड स्वच्छता मोहीम, पाण्याच्या टाक्यांची सफाई, श्रावणी सोमवारचे अभिषेक, त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव, शिवजयंती उत्सव, शिवपुण्यतिथीला रायगडावरील दिपवंदना अशा विविध उपक्रमांद्वारे असंख्य शिवभक्त शिवकार्याची प्रेरणा घेतात.

लोहगड विसापूर विकास मंच हा श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहे. आजचा पुरस्कार म्हणजे मंचाच्या असंख्य निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अविरत शिवकार्याची पावती आहे. तसेच, लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी प्रेरणादायी शिवसृष्टी उभारण्याचा मनोदय यावेळी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!