क्रीडा व मनोरंजन

३७ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा उस्मानाबादला किशोरांचे व सांगलीला किशोरींचे अजिंक्यपद

Spread the love

किशोरांचे उपविजेतेपद सांगलीला तर किशोरींचे उपविजेतेपद ठाण्याला

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार – उस्मानाबादच्या हारदया वसावेला राणाप्रताप तर सांगलीच्या धनश्री तामखाडेला हिरकणी पुरस्कार

क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर

रत्नागिरी १९, ऑक्टोबर (क्री. प्र.) : भारतीय खो खो महासंघाच्या व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व रत्नागिरी जिल्हा हौशी खो-खो असोसिएशनच्या अधिपत्याखाली ३७ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर संपन्न झाली. आज झालेल्या अंतिम सामन्यामध्ये किशोरांमध्ये उस्मानाबादच्या मुलांच्या संघाने सांगलीला तर किशोरींमध्ये सांगलीने ठाण्याला पराभूत करत अजिंक्यपदला गवसणी घातली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या राणाप्रताप पुरस्कारावर उस्मानाबादच्या हारदया वसावेने तर हिरकणी पुरस्कार सांगलीच्या धनश्री तामखाडेने नाव कोरताना सर्वांची शाब्बासकी मिळवली. या स्पर्धेत किशोरांचे उपविजेतेपद सांगलीला तर किशोरींचे उपविजेतेपद ठाण्याला मिळाले.

 

तर किशोरांचा तृतीय क्रमांक ठाणे व पुणे आणि किशोरींचा तृतीय क्रमांक यजमान रत्नागिरीने व पुणे यांना मिळाला.

किशोर गटाचा अंतिम सामना उस्मानाबाद विरुध्द सांगली यांच्यात झाला. उस्मानाबादच्या जितेंद्र वसावे (४.४० मि.), हाराघ्या वसावे (१.३०, १.१० मि. व २ गुण), राज जाधव (२.३० मि.) यांनी केलेल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर उस्मानाबाद संघाने अंतिम सामना १ डाव ४ गुणांनी (१०-६) खिशात घातला. पराभूत सांगलीतर्फे रोहित तामखडे (१.१० मि व १ गुण) व पार्थ देवकाते यांनी चमकदार कामगिरी केली.

किशोरी गटातील अंतिम सामनाही एकतर्फी झाला. सांगलीने ठाण्यावर ६:१० मि. राखून ७-५ असा २ गुणांनी विजय मिळवला. सांगलीतर्फे स्वप्नाली तामखडे (४.१० मि.), विद्या तामखडे (०.५०, ३.५० मि. आणि २ गुण), धनश्री तामखडे (१.४०, २.४० मि) यांनी चांगला खेळ केला. ठाण्यातर्फे प्राची वांगडे (२.१० मि. व १ गुण), धनश्री कंक (१.३० मि. व २ गुण) यांनी चांगला खेळ केला.

स्पर्धेतील विजयी, उपविजयी संघातील खेळाडूंचा चषक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविजय मुळे, प्रांताधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य औदुंबर जाधव, शिर्के प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गायत्री गुळवणी, अ‍ॅड. विलास पाटणे, खो-खो फेडरेशनचे डॉ. चंद्रजित जाधव, राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, अ‍ॅड. अरुण देशमुख जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय साळवी, संदिप तावडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यांच्या हस्ते विजयी, उपविजयी संघाचा सन्मान करण्यात आला.


चौकट
* उत्कृष्ट संरक्षक: विद्या तामखडे (सांगली), जितेंद्र वसावे (उस्मानाबाद)

* उत्कृष्ट आक्रमक: धनश्री कंक (ठाणे), पार्थ देवकाते (सांगली)

* सर्वोत्कृष्ट खेळाडू (हिरकणी पुरस्कार): धनश्री मातखडे (सांगली) व (राणाप्रताप पुरस्कार): हाराध्या वसावे (उस्मानाबाद)

* उदयान्मुख खेळाडू: स्वरांजली कर्लेकर (रत्नागिरी), अधिराज जाधव (सातारा)

* किशोर गट: उस्मानाबाद (विजयी), सांगली (उपविजयी), ठाणे (तृतीय), पुणे (तृतीय)
* किशोरी गट: सांगली (विजयी), ठाणे (उपविजयी), पुणे (तृतीय), रत्नागिरी (तृतीय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!