क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

सृजन नृत्य विद्यालय तळेगाव तर्फे अजिंठा वेरूळ येथे अभ्यास सहल.

Spread the love

सृजन नृत्य विद्यालय तळेगाव तर्फे अजिंठा वेरूळ येथे अभ्यास सहल.Study trip to Ajantha Verul by Srijan Nritya Vidyalaya Talegaon.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २१ ऑक्टोबर.

आजच्या धकाधकीच्या युगात पुस्तकातील वर्णनं प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवायला मिळाली तर विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढायला मदत होते व ती त्यांच्या शब्दातून व्यक्त करण्याची क्षमता वाढते आणि म्हणूनच सृजन नृत्यालय मागच्या २८ वर्षांपासून वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन नेहमीच करत असते. या उपक्रमा अंतर्गत मागच्या आठवड्यात सृजन विद्यालय तळेगाव दाभाडे यांची अभ्यास सहल अजिंठा वेरूळ लेणी पाहण्यासाठी गेली होती.

तळेगाव हून ही अभ्यास सहल सहा ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता निघाली. महाराष्ट्राला लाभलेली वैभवशाली लेण्यांची परंपरा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक समृद्धीत भर घालत असते, त्या लेण्यांचे सौंदर्य आपल्याला जितकं आकर्षित करत असते तितकच त्या जागेचं रहस्य आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यास भाग पाडते. सहलीचे नियोजन ,त्याची योजनाबद्ध आखणी हे सहलीच्या पहिल्या टप्प्यापासून जाणवत होती. डॉक्टर सौ मीनल कुलकर्णी, श्री दिनेश कुलकर्णी ,सौ कामिनी जोशी व श्री मंदार थिटे यांनी यासाठीचे व्यवस्थापन केले होते. सात ऑक्टोबर रोजी सकाळी अजिंठा येथे पोहोचल्यावर अल्पोपहारानंतर अजिंठा ची लेणी पाहण्यास सुरुवात केली. नृत्याची प्राचीनता ही काही दशके नव्हे तर ती काही शतके पुरातन आहे हे अजिंठा येथील चित्रे पाहून आम्हाला निदर्शनास आले. बौद्धकालीन लेण्यांमधील चित्रांमध्ये नृत्याचे अनेक संदर्भ पाहायला मिळाले. त्याचबरोबर अभिनयातील अनेक बारकाव्यांचीही प्रचिती आली. मजबूत दगडावर केलेले कोरीव काम हे आमच्या डोळ्यांसाठी जणू अद्भुत नजराणाच होता. दुपारी भोजनानंतर श्री छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान करण्यात आले. सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत डॉक्टर श्री जयंत शेवतेकर यांचे अभ्यास पूर्ण मार्गदर्शन ठेवण्यात आले होते डॉक्टर शेवतेकरांनी वेरूळ लेण्यांवर शोधनिबंध सादर केला असल्यामुळे त्यांनी भरतनाट्यम् च्या मुलींना पदन्यास, पादभेद हस्तमुद्रा, दृष्टीभेद ,ग्रीवा भेद (मानेच्या हालचाली )आणि शिरोभेद ह्या लेण्यांमध्ये कसे शिल्पीत केले आहे व त्यांना आपण कसे पहावे याची जणू नवी दृष्टीच आम्हाला दिली.

8 ऑक्टोबर रोजी सकाळी वेरूळ लेणी पाहण्यास सुरुवात केली. बौद्ध शैव जैन लेण्यांमध्ये कैलास लेणं हे संपूर्ण जगाला पडलेलं एक कोडेच आहे. एकसंघ खडकातून कोरलेलं हे मंदिर स्थापत्य शास्त्रातील एक दिव्य अनुभूती आहे. वेरूळची लेणी पाहताना तेथे कोरलेल्या शिल्पांमधून अभिनयाचे नवरस, अनेक पौराणिक कथांची शिल्पं, हस्तमुद्रा, अंगिक आणि आहार्य अभिनय, तांडव आणि लास्य नृत्य यांचा प्रत्यय आला. तांडव हे भगवान शिवांनी केलेले जगातील पहिले नृत्य. हे पुरुषप्रधान नृत्य जोरकस आणि वेगवान हालचालींनी वैशिष्ट्यपूर्ण असते. वीर रस ,रौद्र रस भयानक रस, अद्भुत रस याचा समावेश तांडवात असतो. हस्त मुद्रांबरोबरच अभंग, त्रिभंग, समभंग, अतिभंग या कटिमुद्रांचाही प्रभावी वापर यात केलेला असतो. यामधील आनंद तांडव व लोलीत तांडव पाहताना यातून गुढता अद्भुतता भयानकता यांचा संमिश्र प्रत्ययही आला.
विष्णू ने धारण केलेल्या अवतारांचे शिल्पही आम्ही पाहिले. पार्वतीने केलेले सुकुमार नृत्य म्हणजे लास्य होय. यात नाजूक, डौलदार , हळुवार हालचाली आम्हाला समजल्या. यात शृंगार रस, हास्यरस या रसांचा समावेश असून यात विविध अंग उपांग व प्रत्यांग वापरलेले आहेत हे अभ्यासता आले.

अजिंठा व वेरूळ लेणी पाहताना या ऐतिहासिक, भौगोलिक, पुरातत्वीय, कला सौंदर्यात्मक वैशिष्ट्यं तसेच अन्य महत्त्वाची माहिती डॉक्टर सौ मीनल कुलकर्णी यांनी आपल्या रंगतदार निवेदन शैलीतून प्रस्तुत केली .वेरूळ येथील पवित्र वातावरणात सृजन नृत्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर मीनल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अडवू, अलारिपू, नटेश कौत्वम् जतीस्वरम्, लक्ष्मी नृसिंह पदम् या रचनांचे सादरीकरण केले .शेवटी घृष्णेश्वराच्या दर्शनाने सहलीची सांगता झाली.

या अभ्यास सहलीमुळे मुख्यत्वे विद्यार्थिनींना नृत्य व नाट्याच्या सादरीकरणात अभिनय भावांचा वापर करता येईल आणि या नृत्य शैलीच्या तंत्राच्या सादरीकरण व सूचक मुद्रा अभिनय यांचा अचूक मिलाफ साधता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!