आपला जिल्हा

अन्य शहरांकडे जाणार्‍या अवजड वाहनांना पुणे शहरात प्रवेशबंदी

शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी निर्णय

Spread the love

पुणे : पुणे शहरात होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पिंपरी चिंचवडसह, मुंबई, सातारा, सोलापूर येथून ये जा करणार्‍या अवजड वाहनांना बंदी करण्याचा निर्णय पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने घेतला आहे. याची अंमलबजावणी ४ मार्चपासून होणार आहे. या विषयीचे आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी काढले आहेत.

पुण्यात सध्या अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे नगर मार्गावर वाघोलीपासून पुढे पुण्याकडे अवजड वाहनांना २४ तास प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांना आता शिक्रापूर येथून उजवीकडे वळण घेऊन चाकण मार्गे पिंपरी चिंचवड व तळेगाव दाभाडे मार्गे मुंबईकडे ये जा करावी लागणार आहे.

पुणे सोलापूर व पुणे सासवड रस्त्याने येणाऱ्या वाहनांना हडपसर नोबल हॉस्पिटल चौक खराडी बायपास चौकाकडे २४ तास प्रवेश बंद करण्यात आला आहे.

या वाहनांना थेऊर फाटा येथून उजवीकडे वळण घेऊन थेऊर, लोणीकंद, शिक्रापूर मार्गे जावे लागणार आहे.

पुणे सासवड रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना हडपसर येथे ‘यू टर्न’ घेऊन थेऊर फाटा येथून डावीकडे वळण घेऊन थेऊर, लोणीकंद, शिक्रापूर मार्गे जाण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

पुणे सोलापूर रस्ता येथून सातारा, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर येथून डावीकडे वळण घेऊन सासवड रस्त्यावरून मंतरवाडी फाटा उजवीकडे वळण घेऊन खडी मशीन चौक ते कात्रज चौक येथून सातारा कडे किंवा नवलेपूल मार्गे मुंबईकडे जावे.सासवडकडून येणाऱ्या वाहनांनी मंतरवाडी चौकामधून डावीकडे वळण घेऊन वरील मार्गाचा वापर करावा.

मुंबईकडून येणार्‍या येणार्‍या वाहनांनी नवलेपूल डावीकडे वळण घेऊन कात्रज चौक तसेच साताराकडून येणारी वाहने कात्रज चौक येथून खडी मशीन चौक, मंतरवाडी चौक डावीकडे वळण घेऊन हडपसर मार्गे सोलापूरकडे व मंतरवाडी चौकामधून उजवीकडे वळण घेऊन सासवडकडे जावे.

सोलापूर रस्ता नोबल हॉस्पिटल चौक, अहमदनगर रस्ता केसनंद फाटा वाघोली, मुंबई पुणे रस्ता हॅरीस ब्रीज, औंध रस्ता राजीव गांधी पूल,
बाणेर रस्ता हॉटेल राधा चौक, पाषाण रस्ता रामनगर जंक्शन, पौड रस्ता चांदणी चौक, सिंहगड रोड वडगाव पूल चौक, सातारा रस्ता कात्रज चौक, सासवड रस्ता (बोपदेव घाट मार्ग) खडी मशीन चौक,
कात्रज मंतरवाडी बायपास रस्ता उंड्री चौक,
आळंदी रस्ता बोपखेल फाटा या मार्गांवरून पुणे शहरात अवजड वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!