आरोग्य व शिक्षण

तळेगाव नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांनी आठ दिवसांत विकासकामे सुरू करावीत, नाही तर पदांचे राजीनामे द्यावेत – आमदार शेळके

Spread the love

तळेगाव : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांनी तसेच सत्ताधारी भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी येत्या आठ दिवसांत शहरातील प्रलंबित विकासकामांना सुरूवात करावी, अन्यथा पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. या मागणीला सत्ताधारी भाजपने प्रतिसाद दिला नाही तर नाईलाजास्तव नगरपरिषदेचे कामकाज बंद पाडण्यात येईल, असा इशाराही शेळके यांनी यावेळी दिला.

पत्रकार परिषदेच्या निमित्ताने तळेगावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.पत्रकार परिषदेला आमदार सुनिल शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, नगरसेवक गणेश खांडगे, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक अरूण माने, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, नगरसेविका हेमलता खळदे, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, संगीता शेळके, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष खांडगे आदी उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेत सत्ताधारी भाजपने गलथान, मनमानी व भ्रष्टाचारी कारभार चालविला असल्याचा आरोप आमदार शेळके यांनी केला. आमदारांनी आणलेल्या किंवा शासनाच्या निधीतून कामे नकोत म्हणून नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांनी शासनाचा निधी उपलब्ध असलेली विकासकामे सुरू करण्याबाबत आठ दिवसांच्या आत आवश्यक ते ठराव करून कामाचे आदेश काढावेत, अन्यथा आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत,अशी मागणी शेळके यांनी केली. नगराध्यक्ष व सत्ताधाऱ्यांच्या वाटाघाटीसाठी जनतेला वेठीस धरू नका. विकासकामे करायची नसतील, तर तुम्हाला खुर्ची अडवून ठेवण्याचा कोणताही अधिकार नाही, तुम्हाला कामे करणे शक्य नसेल तर बाजूला व्हा,आम्ही उपलब्ध यंत्रणेत सर्व कामे मार्गी लावून दाखवू, असेही त्यांनी सुनावले.

शहरातील अनेक कामांसाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे, मात्र सत्ताधारी भाजपला शहरात कोणतीही विकासकामे होऊ द्यायची नाहीत. निधी उपलब्ध असताना, निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असताना देखील अनेक कामांचे आदेश काढले जात नाहीत. अनेक कामांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले जात नाहीत. यात सर्वसामान्य जनता भरडली जात आहे, असा आरोप आमदार शेळके यांनी केला. नगरपरिषदेत पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही, ही सबब पुढे करणारे भाजपच्या पदाधिकारी मुख्याधिकारी नसताना ठेकेदारांचे धनादेश कसे काढू शकतात, असा चिमटाही शेळके यांनी यावेळी काढला.

आमदार शेळके म्हणाले की, ही पत्रकार परिषद आपण शहरातील विकासकामांना गती मिळावी म्हणून घेतली आहे. या मागे कोणताही राजकीय हेतू नाही. नगर परिषदेत होत असलेल्या चुकीच्या कामांना राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने वाचा फोडण्याचे काम केले आहे. शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. पाठपुरावा केला आहे. विकासकामांना मात्र राष्ट्रवादीने कायम पाठिंबा दिला आहे. सत्ताधाऱ्यांच्या कोणत्याही विकासकामाला आम्ही विरोध केलेला नाही आणि यापुढेही करणार नाही.

नगराध्यक्षा व भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ उरलेला नाही. नगराध्यक्ष काय निर्णय घेतात, हे पक्षनेत्यांना माहीत नसते. त्यामुळे नगराध्यक्ष व भाजपचे अन्य नगरसेवक यांच्यात दरी निर्माण झाली आहे. चुकीच्या व मनमानी पद्धतीने पाणी योजनेचे, भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. मैलाजलशुद्धीकरण केंद्राचे काम न करताच आधी शहरातील सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत. खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. त्याबद्दल सत्ताधाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

शहरातील सुमारे 120 किलोमीटर लांबीचे रस्ते खोदले असून त्यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 60 ते 70 कोटी रुपयांची गरज आहे. शासनाने अंतर्गत रस्त्यांसाठी साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला असताना ठेकेदारांना कामाचे आदेश का दिले जात नाहीत, असा सवाल त्यांनी केला. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत. दिवाळीपूर्वी रस्त्याची कामे पूर्ण होणे शक्य आहे. त्यासाठी येत्या आठ दिवसांत संबंधित कामाचे आदेश सत्ताधाऱ्यांनी काढावेत, अशी सूचना आमदार शेळके यांनी केली.

तळेगाव नगर परिषदेच्या इमारतीसाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे, मात्र सत्ताधाऱ्यांना सध्याच्या इमारतीतून कार्यालयाचे स्थलांतर करणेही जमलेले नाही. विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध आहे, मात्र सत्ताधाऱ्यांना प्रस्ताव सादर करणेही जमलेले नाही. मुख्याधिकारी नाही, हेच पालुपद लावून त्यावर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न ही मंडळी करीत आहेत. मोठ्या अपेक्षेने तळेगावकरांनी भाजपला संधी दिली होती. प्रत्यक्षात त्यांनी अपेक्षाभंग केला. त्याचे फळ येत्या निवडणुकीत त्यांना मिळेल. भाजपचे 3-4 नगरसेवकही निवडून येणार नाहीत, असे भाकित शेळके यांनी केले.

तळ्यातील गाळ काढणे, कचरा डेपो, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अशा सर्वच कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून वस्तुस्थिती लवकरच नागरिकांसमोर येईल, असे आमदार शेळके म्हणाले.

गलथान कारभारामुळे तळेगावातील पाण्याचा प्रश्न गंभीर –

सत्ताधारी भाजपला कोणतेही ‘व्हिजन’ नसल्याचा आरोप बापूसाहेब भेगडे यांनी केला. नगरपरिषदेत दडपशाहीचे राजकारण करण्यात येत आहे. नगरसेवकांनी मागणी करूनही पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला चर्चेला न बोलवता परस्पर साडेतीन कोटींचा धनादेश कसा काय दिला जातो, असा सवाल त्यांनी केला. अशा गलथान कारभारामुळे तळेगावातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. आर्थिक तरतूद असताना कामाचे आदेश दिले जात नाहीत, या उलट तरतूद नसलेल्या कामांची टेंडर काढली जातात. करवाढीत मोठ्या प्रमाणात आफरातफर झाली आहे. व्यापारी संकुलातील गाळेवाटपात घोटाळा झाला आहे. राष्ट्रवादीची सत्ता असताना नगरपरिषदेच्या बँकेत मुदत ठेवी होत्या, आता पगार करायलाही पुरेसे पैसे नाहीत. टक्केवारी देणाऱ्यांची बिले मात्र लगेच निघतात, असा आरोप भेगडे यांनी केला.

तळेगावातील रस्त्यांच्या दुरवस्थेला नगराध्यक्ष आणि सत्ताधारी भाजप जबाबदार –

तळेगावातील रस्त्यांच्या दुरवस्थेला नगराध्यक्ष आणि सत्ताधारी भाजप जबाबदार आहे, असे गणेश काकडे म्हणाले. नगराध्यक्ष मनमानी कारभार करीत असून त्याला उपनगराध्यक्षांसह सत्तारूढ पक्षाच्या नगरसेवकांचाही विरोध आहे, याकडेही त्यांनी लक्ष द्यावे.

निवडणूक घड्याळाच्या चिन्हावर लढविण्यासाठी आग्रही –

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढविली जावी, यासाठी आपण पहिल्यापासून आग्रही आहोत, अशी भूमिका पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक गणेश खांडगे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती किंवा जनसेवा विकास समिती अशा पर्यायांचा वापर करण्याऐवजी थेट पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली गेली तर शहराच्या अनेक समस्या दूर होतील,असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!