ताज्या घडामोडी

पत्रकारांनी सत्तेशी भागीदारी न करता सत्तेला प्रश्न विचारणे आवश्यक आहे, यासाठी तत्त्वाशी त्यांनी कधीही तडजोड करू नये- दै.दिव्य मराठी चे संपादक संजय आवटे

Spread the love

पत्रकारांनी सत्तेशी भागीदारी न करता सत्तेला प्रश्न विचारणे आवश्यक आहे, यासाठी तत्त्वाशी त्यांनी कधीही तडजोड करू नये असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत व दै.दिव्य मराठी चे संपादक संजय आवटे यांनी केले. वारणा महाविद्यालय ऐतवडे खुर्द येथे वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान सोहळा व साहित्य प्राज्ञ स्व.बाजीराव बाळाजी पाटील सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वृत्तपत्रविद्या विभाग शिवाजी विद्यापीठाच्या प्रमुख डॉ. निशा मुडे या होत्या तर प्रमुख उपस्थिती इस्लामपूर पोलीस उपविभागीय अधीक्षक कृष्णात पिंगळे हे होते.
पत्रकारांचा सन्मान सोहळ्यामध्ये पुढे बोलताना श्री आवटे म्हणाले, समाजातील सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून पत्रकारिता करणे गरजेचे आहे. ग्लोबल सिटी ऐवजी ग्लोबल विलेज होण्याचा ध्यास जगाने एवढ्यासाठीच धरला आहे की ज्यांना गाव समजला त्यांना जग समजलं ही संकल्पना जगात निश्चित होत आहे. त्यामुळे ग्रामीण पत्रकारिता हाच खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहातील पत्रकारितेचा कणा आहे. आपल्या परिसरात जे जे घडतं त्यातील नाविन्य शोधणे आजच्या पत्रकारांसमोर आव्हान आहे. पत्रकारितेमध्ये घटनेपेक्षा त्या घटनेतील माणूस महत्त्वाचा असतो त्याच्या प्राधान्यानं बातम्या लिहिणे आवश्यक आहे. भले कितीही गोदी मीडियाचा बोलबाला होत असेल तरीसुद्धा आजही रविष कुमार च्या पत्रकारितेला पाठबळ देणारी सामान्य जनता भारतात आहे, यामुळे पत्रकारिता हा चौथा आधारस्तंभ निश्चितच बळकट असल्याचा आशावाद ही यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना कृष्णात पिंगळे म्हणाले की, पत्रकारिता हा समाजाचा आरसा आहे.सामान्य माणूस या पत्रकारितेतील मुख्य घटक आहे. पोलीस प्रशासन आणि पत्रकारिता यांचा संवाद ही सकारात्मक असणे आवश्यक आहे.या वेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.निशा मुडे म्हणाल्या, समाजातील विविध स्तरातील घटक आज या पत्रकारितेबद्दल मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. ही अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी पत्रकारांची आणि पत्रकारितेची आहे, याबाबत आपण सक्षमपणे उभे राहणे आवश्यक आहे.
पत्रकार सन्मान सोहळ्या बद्दल बोलताना वारणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. प्रताप पाटील म्हणाले गेल्या वीस वर्षात पत्रकारितेचा सन्मान प्रामुख्यानं ग्रामीण भागातील पत्रकारितेचा सन्मान केला जात असून वारणा महाविद्यालय हे पत्रकारितेचे शिवाजी विद्यापीठातील प्रमुख केंद्र बनत आहे. इथे नेहमीच ग्रामीण पत्रकारितेचा सन्मान होतो.
यावेळी साहित्य प्राज्ञ स्व. बाजीराव बाळाजी पाटील सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने दै. तरुण भारतचे इस्लामपूर तालुका प्रतिनिधी युवराज निकम यांना व शाहूवाडी तालुक्यातून दै. तरुण भारतचे बाबासाहेब कदम यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी युवराज निकम, बाबासाहेब कदम, आबासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रताप पाटील यांनी केले तर आभार डॉ. प्रदीप कांबळे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सूरज चौगुले व सौ. सुवर्णा आवटे यांनी केले. कार्यक्रमासाठी वारणा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष बाबासो पाटील, विश्वस्त आप्पासाहेब खराडे अमरदीप गोरेगावकर, युवा नेते जयदत्त पाटील, बाबासो सावर्डेकर, डॉ.सुमेधा साळुंखे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी वाळवा, शिराळा, शाहुवाडी, पन्हाळा, हातकणंगले या परिसरातील एकशे पन्नासहून अधिक पत्रकार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!