क्रीडा व मनोरंजन

प्राईमच्या विजयात काशीफ, यतार्थ चमकले

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

ठाणे : सलामीला आलेला काशीफ आक्रम आणि यतार्थ गुप्ताने तिसऱ्या विकेट्साठी केलेल्या ९४ धावांच्या भागीदारीच्या जोरावर प्राईम ग्रुप क्रिकेट अकादमीने भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशन संघाचा ६ विकेट्सनी पराभव करत स्पोर्टिंग क्लब कमिटी आयोजित ६५ व्या शामराव ठोसर स्मृती क्रिकेट स्पर्धेत दुसरा विजय नोंदवला.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विवेक यादवच्या १०७ धावांच्या शतकी खेळीमुळे भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशन संघाने ३९ षटकात १८५ धावापर्यत मजल मारली. सुरेश मथाईने २४ धावा केल्या. तर त्यांच्या इतर फलंदाजांना दोन आकडी धावाही करता आल्या नाहीत. अजय जयस्वालने २८ धावांत ३ आणि मनीष भोईर, प्रशित पाटील, आकाश वरखाडे, रोहित कारंडेने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

या आव्हानाचा पाठलाग करताना प्राईम ग्रुप क्रिकेट अकादमीची सुरुवात अडखळत झाली.पण काशीफ अक्रम आणि यतार्थ गुप्ताने आक्रमक फलंदाजी करत तिसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची बहुमोल अशी भागीदारी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. यतार्थने नाबाद ७९ धावांची खेळी करताना ५८ चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकार ठोकले. तर काशीफने ४४ चेंडूत १० चौकार मारत ६० धावा केल्या. प्राईम ग्रुप क्रिकेट क्लबने २७ व्या षटकात ४ बाद १९५ धावा करत विजय निश्चित केला. विवेक यादव आणि सम्राट मित्राने प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केले.

संक्षिप्त धावफलक – भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशन : ३८.१ षटकात सर्वबाद १८५ ( विवेक यादव १०७, सुरेश मथाई २४, अजय जयस्वाल ८-१-२८-३) ६ विकेट्सनी पराभूत विरुद्ध प्राईम ग्रुप क्रिकेट क्लब : २६.४ षटकात ४ बाद १९१ ( काशीफ अक्रम ६०, यतार्थ गुप्ता नाबाद ७९, विवेक यादव ४-१६-२, सम्राट मित्रा ६-४४-२).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!