आरोग्य व शिक्षण

तू अमुक मारलेस , म्हणून मी तमुक मारले – लेखक : हर्षल आल्पे

Spread the love

तळेगाव : सध्या बातम्यांमध्ये हेच तर चालू असते , प्रत्येकवेळी एक नेता कुठे कुठे दिसतो , कुठल्या कार्यालयात जातो , आणि तिथून कुणाकुणाच्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर बोलू लागतो . त्याच नेत्याच्या बोलण्यावरून आपल्याला समजते , की  कुणा कुणाविरुद्ध कारवाई होणार आहे आणि कोण जेल मध्ये जाणार आहे .

खरतर सूडाचे राजकारण हे आदर्श लोकशाहीला लागलेला डाग मानला जातो . मुळात सूड हीच एक हिंस्त्र भावना असते . विकृतीचा जेव्हा परमोत्च्च बिंदु गाठला जातो , तिथून सूडाचे राजकारण आपले पंख पसरायला लागते . आणि जिथे आजवर खूप खेळीमेळी चे राजकारण होते तिथे ज्यावेळी हे असले राजकारण जन्म घेते , समजून जा , की तो भाग लयाला जात आहे . कारण या असल्या राजकारणात विकासाला कुठे ही जागा नसते , त्यामुळे त्यावर चर्चा ही जन्माला येऊच शकत नाही .

आरोप प्रत्यारोपांच्या खेळात जनता मात्र उपाशी आहे , हे विस्मरणात गेले आहे . कोण कोण कोणाकोणावर आरोप काय करतो ? त्याच्यावर काय कारवाई होते , तो जेल मध्ये जातो , याने न्याय होत असेल ही कदाचित , पण जनतेच्या प्रश्नांचे काय ? तो प्रश्न तिथल्या तिथेच आहे .

आज सामान्य जनता अजून ही तुमच्या लॉक डाउन मधून हळूहळू सावरतीये , 2020 आणि 21 च्या त्या लॉक डाउन ने काही मूलभूत गोष्टींवर नव्याने चर्चा करून मार्ग काढण्याची गरज निर्माण झालीये , अनेक उद्योगधंदे निर्माण करू शकतील अशी क्षेत्रे पार झोपलीयेत . दैनंदिन खर्च कसे भागवावेत हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे . त्यात महागाई रोजचं वाढतीये . अशात सामान्य माणूस दिवसभर मरमर करून घरी येतो , टीव्ही लावतो ,तर पाहतो तर काय ? एक नेता दुसर्यान नेत्याचा भ्रष्टाचार काढत , कागदे दाखवत जेल मध्ये पाठवण्याची गोष्ट करतो , मग पर्यायाने ज्याच्या विरोधात तो बोललेला असतो त्याचे उत्तर मग तो हयाच्यावर आरोप करतो , याला जेल मध्ये आधी टाकण्याची मागणी करतो . खरच या सगळ्यातून आपल्याला सामान्य जनता म्हणून काय मिळते ? काहीच नाही …

काही वेळा तर समाजातल्या काही लोकांचा फायदा काही नेत्यांनी करून दिलेला असतो . त्यांच्यासाठी खूप मोठे उपकार ही केलेले असतात , रोजगाराच्या संधी ही वाट वाकडी करून मिळवून दिलेल्या असतात . आता जर कोणी ती वाट वाकडी करणे याला सुद्धा भ्रष्टाचार म्हणून कारवाई करवत असेल तर समाजाने कुणाच्या बाजूने कौल द्यायचा हा ही प्रश्नच आहे . आणि सध्या होतय काय ? तर टीव्ही वर हे असले दोन नेत्यांमधले वाकयुद्ध आणि हा भ्रष्ट को तो जास्ती भ्रष्ट या वादात एकच उत्तर मिळते की “ सब चोर है” हा होणारा समज लोकशाहीला घातक आहे . कारण अशाने मतदानाविषयी ची आस्था कमी होते , परिचयात अशी खूप लोक आहेत , जी आत्तापासून च म्हणत आहेत , की पुढच्या वेळेला आम्ही मतदानाला जाणारच नाही , सगळेच भ्रष्ट आहेत ,तर मग आम्ही मतदान तरी का करायचे ?

या प्रश्नाचे उत्तर सकारात्मकरीतीने द्यायचे असेल ,तर आधी माध्यम म्हणून आम्हाला सकारात्मकतेकडे जावे लागेल . आणि समाजात भ्रष्ट जसे नेते आहेत , तसे कसलाही स्वार्थ नसणारे जनतेशी प्रामाणिक आणि तत्पर असणारे नेते ही आम्हाला पुढे आणावेच लागतील . त्यांची सकारात्मक कामे आम्हाला विशेषत्वाने उजेडात आणावी लागतील . त्यातून इतरांना प्रेरणा मिळेल . आणि इतर जण ही आपापले मार्ग बदलतील . भूतकाळात एखाद्या नेत्याने काय केले , यापेक्षा तो आज काय करतोय , हे जास्त म्हहत्वाचे आहे . शेवटी वाल्याला ही वाल्मिकी होण्याची संधी व्यवस्थेने दिली पाहिजे . आणि त्यांनी ही ती संधी घेऊन वाल्मिकी होण्याचा प्रवास केला पाहिजे , आता काही जण म्हणतील की हा आदर्शवाद झाला , पण आदर्शवाद ही आपल्या संस्कृतीत आहे , आणि त्याचे आचरण म्हणजे काही वाईट तर नव्हे ना !

नेत्यांना आम्ही चांगली कामे करण्यासाठी प्रोत्साहित नाही करू शकत आहोत , हे आमचे अपयश नाही का ? एक साधा नियम आहे , जर लोकशाही विषयी अनास्था वाढते तिथे भ्रष्ट नेत्यांची संख्या वाढणारच , आणि ती सगळ्या पक्षात असणार , हे ही लक्षात घेतले पाहिजे , कुठला ही पक्ष आज असा दावा करू शकत नाही दुर्दैवाने की आमच्या पक्षात एकही भ्रष्ट नेता नाही . कारण काय ? तर हेच , की लोकशाही बद्दल ची आमची अनास्था . यामुळेच आज निवडणुकीत उमेदवार म्हणून अमाप खर्च करावा लागतो . आणि त्या खर्चा साठी पैसा कुठून आणणार ? तर मग झटपट पैसा मिळवण्यासाठी मार्ग शोधले जातात , आणि ते बरोबर की चूक हे विचार करण्यासाठी तेवढा वेळ च नसतो . शेवटी निवडून आलो तर जनतेसाठी काहीतरी करू ना , हाच विचार होतो . आणि जनता तरी काय ? आपण काय भ्रष्टाचार करत नाही की काय ? आपण तर रोजचं छोटे छोटे भ्रष्टाचार करत असू ही , ते कुणी काढायला गेला , की आम्ही त्याच्या भ्रष्टाचारावर बोलणार , लिहिणार . हेच चालत . हे सगळे गमतीशीर आहे , पण हेच खरे आहे , ती एक वृत्ती आहे , जो पर्यन्त तुम्ही माझ्या वाकड्यात जात नाही तो पर्यन्त अगदी तोपर्यन्तच तुम्ही चांगले , ज्यावेळी तुम्ही माझ्या वाकड्यात शिराल , माझी रेषा ओलांडाल त्या क्षणी मी तुमची ही रेषा ओलांडेन . हेच तर असते . शेवटी राजकीय नेते सुद्धा याच समाजातून आलेले असतात . आणि ते ही याच समाजाच्या नियमाप्रमाणे चालत असतात .

त्यामुळे ही वृत्ती बदलली पाहिजे , तर आणि तरच एक दिवस ही लोकशाही सुदृढ होईल ही आशा ….
(ता . क : तूर्तास हे लिहीत असताना टीव्हीवर एक नेता दुसर्या नेत्याच्याच भ्रष्टाचारावर जोरजोरात बोलतोय ,आणि मजकूर ,अन त्याचे बोलणे ऐकून मला हसायला ही येते आहे )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!