ताज्या घडामोडी

पालघर जिल्ह्यातील शाळांसाठी सुमारे दोन ते अडीच कोटी निधी खर्च, शिक्षक आमदार बाळाराम पाटील समस्या जाणून घेण्यासाठी साधणार शिक्षकांशी संवाद

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी ता.19
शिक्षण विभाग हा लोकांना संस्कार देणारा घटक असून या कार्यालयांमधील कामकाजा बरोबरच कार्यालयात येणाऱ्यांना सौजन्याने वागवणे अपेक्षित आहे. तसे जर होत नसेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे असे मत शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले.

पालघर जिल्हा संवाद दौरा नियोजन बैठक वाघोटे येथील आजी आजोबा रिसॉर्ट येथे नुकताच पार पडली. यावेळी मार्गदर्शन करतांना आमदार बाळाराम पाटील यांनी कोरोनाच्या अत्यंत बिकट अवस्थेत सुद्धा राज्य शासनाने शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर दिले आहे. शिक्षकांच्या वेतन आणि पेन्शन वर सुमारे 18 हजार कोटी खर्च होत असून गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल असा आशावाद व्यक्त करून पालघर जिल्ह्यात विविध शाळांसाठी सुमारे दोन ते अडीच कोटी निधी खर्च केला असून जिल्ह्यातील विविध शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतः जाऊन तेथील प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्यासाठी उपसंचालक, शिक्षणाधिकारी, पे युनिटचे अधीक्षक आणि लेखाधिकारी यांची लवकरच संयुक्त बैठक आयोजित केली जाईल असे सांगितले. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यातील विविध अनुभव कथन केले.
या बैठकीच्या प्रास्ताविकामध्ये प्रमोद पाटील यांनी कोरोनाच्या आपत्तीनंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्याचा संवाद दौरा झाला असून येत्या 3 मार्च पासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पालघर जिल्ह्याचा संवाद दौरा आयोजित करावयाचा आहे. पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये आमदार शिक्षकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
या बैठकीला संस्थाचालक चिंतामण ठाकूर यांनी पालघर जिल्ह्यातील 28 शाळांचे वेतनेतर अनुदान प्रलंबित असून त्यासाठी शिक्षण विभागाने काही अटी घातल्या आहेत त्या शिथिल कराव्यात अशी मागणी केली. पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष डेरेल डिमेलो यांनी पालघर जिल्ह्यातील 12 शाळांमध्ये एकही लिपिक नाही. तसेच चतुर्थ कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने अनेक शाळांमध्ये त्या जागा रिक्त आहेत. शासनाने सुरू केलेले पवित्र पोर्टल रद्द करावे. अघोषित शाळांसाठी वेळेत प्रस्ताव सादर करून सुद्धा शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. याबाबत आमदारांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. पालघर- ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश प्रधान यांनी पालघर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे पे युनिट आणि लेखाधिकारी कार्यालय लवकरात लवकर पालघर येथे सुरू करण्यात यावे. तसेच नॉन प्लॅन मधील गेले चार महिने शिक्षकांचे पगार नाहीत. त्यांचे नियमित वेतन सुरू करावे अशी मागणी केली. तर पालघर- ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढीच्या संचालिका प्रगती पाटील यांनी पालघर जिल्ह्यामध्ये 29 अर्धवेळ ग्रंथपाल कार्यरत आहेत. शाळा तिथे ग्रंथालय आणि ग्रंथालय तिथे ग्रंथपाल या धोरणानुसार विद्यार्थ्यांची अट न ठेवता अर्धवेळ ग्रंथपालांना त्वरित पूर्णवेळ करावे तसेच महिला शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाची देय्य असलेली बाल संगोपन रजा मिळावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अहर्ता प्राप्त केल्यानंतर शिक्षक पदी पदोन्नती मिळावी अशी मागणी केली. पतपेढीचे अध्यक्ष संतोष पावडे यांनी गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी आदी रिक्त असलेली पदे भरण्यासाठी नेट-सेट किंवा राज्य- राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी केली.
यावेळी शाळांना विनाअट वेतनेतर अनुदान मिळावे, आश्रमशाळांमधील बदल्या सामोपचाराने व्हाव्यात, शाळांना ग्रंथालयासाठी विशेष निधी मिळावा, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या वेळेवर मिळाव्यात, पालघर जिल्हा परिषदेमध्ये प्रलंबित असलेले मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक पदोन्नती प्रकरणे, तसेच वैद्यकीय बिले, वैयक्तिक मान्यता प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढावीत अशी मागणी करण्यात आली.
या बैठकीला पालघर जिल्ह्यातील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या नियोजन बैठकीचे सूत्रसंचालन सुचित्रा पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!