ताज्या घडामोडी

काळजी नाही पण… हुरहूर वाटते…!

Spread the love

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपाने योग्य प्रचाराचे नियोजन केले आहे. पण दोन्ही उमेदवारांना काळजी नाही पण… हुरहुर वाटते… अशीच परिस्थिती पहायला मिळत आहे. एकीकडे काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रचाराची धुरा आपल्याकडे घेतल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील मातब्बर नेते प्रचाराचा रणधुमाळी उतरणार आहेत. तसे पाहिले तर जिल्ह्यात काँग्रेसला प्रचारासाठी अनेक नेते आहेत. पण भाजपाची धुरा प्रदेश अध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या खांद्यावर आहे.नामदार सतेज पाटील यांनी ही निवडणूक आपल्या खांद्यावर घेतली आहे. नामदार हसन मुश्रीफ, राजेंद्र पाटील-यड्रावकर, राजेश क्षीरसागर, संभाजी राजे अशा दिग्गज जिल्ह्यातील नेत्यांची फौजी काँग्रेसच्या प्रचारात उतरली आहे. योग्य नियोजन व शिस्तबद्ध प्रचार करण्यात काँग्रेस व भाजपा हे दोन्ही पक्ष आघाडीवर आहेत. काँग्रेसने आघाडीचे मतदार एकत्र बांधण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तर दुसरीकडे ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा वापर भाजपाने सुरू केला आहे. भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांनी महापालिकेतील केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटच्या टप्प्यात अनेक राजकीय डावपेच खेळले जाणार आहेत. भाजपाने छोट्या छोट्या पक्षाकडे लक्ष केंद्रित केली आहे. जी मते भाजपाला मिळू शकणार नाहीत, अशा मातांचे विभाजन कसे करायचे? हा डावपेच भाजपाने खेळला आहे. तर दुसरी काँग्रेसने एका, एका मताची गोळाबेरीज सुरू केली आहे. एकूणच या मतदारसंघातून काटा लढत होता आहे. या काटा लढतीत विजयाचे पारडे कोणाच्या बाजूने झुकू शकेल हे सांगता येत नाही. यामुळे दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना काळजी नाही पण… हुरहूर वाटते…. अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसने भावनिक मुद्द्याला हात घातला आहे. चंद्रकांत जाधव यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी जयश्री जाधव यांना विजय करण्याचे आव्हान काँग्रेसच्या नेत्यांनी केले आहे. हाच भावनिक मुद्दा घेऊन घरा घरात प्रचार यंत्रणा राबवण्यावर काँग्रेसने भर दिला आहे. भाजपाने विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक जिंकण्याचा निश्चय केला आहे. भाजपाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. काँग्रेस सरकारने पन्नास वर्षात जिल्ह्यासाठी काय केले? असा प्रश्न भाजपाचे नेते करू लागले आहेत. काँग्रेसने पन्नास वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले आणि आम्ही पाच वर्षात जिल्ह्याच्या विकासात कशी भर घातली आहे, हे पटवून देण्यात भाजपाचे नेते दंग आहेत. भाजपाचे नेते मार्केटिंग करण्यात आघाडीवर दिसून येत आहे. याउलट काँग्रेसने सावध पवित्रा घेऊन संयमाने प्रचार यंत्रणा राबविल्याचे दिसून येत आहे. शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नामदार जयंत पाटील अशा दिग्गज नेत्यांची फौज काँग्रेसच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसर्‍या बाजूला भाजपातर्फे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे नेते कोल्हापुरचे मैदान मारण्यासाठी प्रचाराच्या रणधुमाळीत उतरणार आहेत. एकूणच दोन्ही पक्षांचा आपली ताकद पणाला लावली आहे. यामुळे येते घासाघास होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपाने पंढरपूरच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी चंग बांधला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, एसटीचे प्रश्न असे विविध मुद्द्याच्या माध्यमातून भाजपाने काँग्रेसला घेण्याचा डाव टाकला आहे. ही निवडणूक कोल्हापूरची नसून राज्यात परिवर्तनाची लाट आणण्याची असेल असे भाकीत भाजपाचे नेते करू लागले आहेत. तर काँग्रेसने कोल्हापूर आमचेच आहे, हे सिद्ध करण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. विजयाचे पारडे कोणाच्या बाजूने झुकेल हे आताच कोणी काही सांगू शकत नाही. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा सामना रंगतदार होईल, असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!