ताज्या घडामोडी

महिलांमध्ये सरस्वती तर पुरुषांमध्ये महात्मा गांधी विजेते अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमरहिंद चषक पुरुष-महिला निमंत्रित जोडजिल्हा खो खो स्पर्धा

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई, (क्री. प्र.), महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व मुंबई खो-खो संघटनेच्या सहकार्याने अमरहिंद मंडळाने पुरुष महिला निमंत्रित जोडजिल्हा (मुंबई व मुंबई उपनगर) खो खो स्पर्धा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त कै. रमेश वरळीकर क्रीडानगरी, अमरहिंद मंडळ, अमर वाडी, गोखले रोड, दादर (प.) मुंबई येथे आयोजित केली होती. या स्पर्धेत महिलांमध्ये सरस्वती तर पुरुषांमध्ये शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी विजेते ठरले. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रमुख पाहुणे अॅड. अरुण देशमुख (खजिनदार म.खो.खो असो.) यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी अमरहिंद मंडळाचे भास्कर सावंत, अरुण देशपांडे, दीपक पडते, प्रफुल्ल पाटील (कार्योपाध्यक्ष – मुंबई खो-खो), जतिन टाकळे (खजिनदार – मुंबई खो-खो), निरीक्षक कमलाकर कोळी, विजय राणे, विलास कारेकर व मुंबई खो-खो संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या सरस्वती स्पोर्ट्स क्लबने मुंबईच्याच शिवनेरी सेवा मंडळावर अतिशय अटीतटीच्या लढतीत ९-९ (४-५, ४-३, १-१) असा लघुत्तम आक्रमणात १० सेकंदांनी विजय मिळवत अमरहिंद चषकावर नाव कोरले. संपूर्ण खेळात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट कामगिरीची नोंद केल्याने प्रेक्षकांना अतिशय चांगल्या दर्जाचा सामना पहायला मिळाला. या सामन्यात सरस्वतीच्या नम्रता यादव (२:००, २:२० मि. संरक्षण व ३ गुण), खुशबू सुतार (१:३०, ३:०० मि. संरक्षण), सेजल यादव (२:५०, २:३० मि. संरक्षण व २ गुण), संस्कृती भुजबळ (१:३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी विजयात मोलाची कामगिरी केली तर पराभूत शिवनेरीच्या दर्शना सपकाळ (२:५०, २:०० मिनिटे संरक्षण व १ गुण), ऐश्वर्या पिल्ले (२:३०, ३:०० मि. संरक्षण), मयुरी लोटणकर (१:५०, मि. संरक्षण व १ गुण), शिवानी गुप्ता (नाबाद १:३० मि. संरक्षण व १ गुण), अक्षया गावडे (२:३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी दिलेली लढत अपयशी ठरली. शिवानी गुप्ताला झालेल्या दुखापतीमुळे शिवनेरीला हा सामना गमवावा लागला याचीच चर्चा मैदनवर रंगली होती.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीने उपनगरच्याच श्री सह्याद्री संघावर १०-९ (८-४, २-५) असा ४:०० मिनिटे राखून १ गुणाने सहज विजय मिळवला. या सामन्यात शिर्सेकर्सच्या दिपेश मोरे (३:२०, ३:०० मि. संरक्षण व १ गुण), नितेश रुके (२:१०, १:५० मि. संरक्षण), ओंकार सोनावणे (१:४०, २:४० मि. संरक्षण) व अनिकेत पोटे (नाबाद १:१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी सहज विजयात मोलाची कामगिरी बजावली तर पराभूत अनिकेत चेंदवनकर (१:३०, २:५० मि. संरक्षण व १ गुण), अक्षय साळुंखे (१:४०, १:३० मि. संरक्षण), अक्षय भांगरे (१:५० मि. संरक्षण व ३ गुण) व तेजस सावंत (३ गुण) यांनी सामन्यात उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली.

तृतीय क्रमांकाच्या सामन्यात पुरुषांमध्ये विद्यार्थी क्रीडा केंद्राने सरस्वती स्पो. क्लबवर तर महिलांमध्ये शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीने दत्तसेवा क्रीडा मंडळावर विजय मिळवला. या स्पर्धेसाठी दिनेश घाडीगांवकर यांनी छायांकन व चित्रीकरण केले.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुढील प्रमाणे.

संरक्षक -ओंकार सोनावणे (शिर्सेकर्स महात्मा गांधी) व दर्शना सकपाळ (शिवनेरी)

आक्रमक-अक्षय भांगरे (श्री सह्याद्री) व नम्रता यादव (सरस्वती)

अष्टपैलू – दिपेश मोरे (शिर्सेकर्स महात्मा गांधी) व खुशबू सुतार (सरस्वती)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!