ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या शेतात कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यात ड्रोनचे योगदान मोलाचे ठरणार आहे- युवा नेते प्रतिकदादा पाटील

Spread the love

इस्लामपूर दि.२५ (प्रतिनिधी)
चातक इनोव्हेशन्सने एका वर्षात भारतीय बनावटीचे २ ड्रोन बनवून मोठे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या दारात ट्रॅक्टर आला आणि शेतीस मोठी गती मिळाली,त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतात कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यात ड्रोनचे योगदान मोलाचे ठरणार आहे,असा विश्वास युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी व्यक्त केला. आपण देशात सर्वप्रथम ७ हजार ३०० एकर क्षेत्रावर ड्रोनने फवारणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजारामनगर येथील गायत्री हॉलमध्ये चातक इनोव्हेशन्सच्या प्रथम वर्धापनदिना निमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. प्रगतशील शेतकरी,माजी उपसभापती नेताजीराव पाटील,चातक इनोव्हेशन्सचे कार्यकारी संचालक सुभाषराव जमदाडे, सुधाकर भोसले (पुणे),मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील,ऊस विकास अधिकारी सुजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते नवीन ड्रोनचे उदघाटन केले.
प्रतिकदादा पाटील म्हणाले,शेतकऱ्यांना नव-नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. एका बाजूला महागाई वाढत असताना,दुसऱ्या बाजूला कमी खर्चात,कमी वेळेत शेतकऱ्यां च्या शेतातील उत्पादन वाढायला हवे,ही आमची भूमिका आहे. ड्रोनमुळे शेत जमिनीची मोजणी करणे,औषध फवारणी करणे, पिकांचे फोटो घेवून पिकांना कोणत्या अन्नद्रव्यांची गरज आहे? याची माहिती मिळविणे सोपे होणार आहे. चातक इनोव्हेशन्स केवळ महाराष्ट्र नव्हे,तर देशात ड्रोन पुरवठा करणारी संस्था ठरेल.
चातक इनोव्हेन्शनचे कार्यकारी संचालक सुभाषराव जमदाडे म्हणाले,राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ड्रोन निर्मिती व वापर यावर काम करीत आहोत. आपण आतापर्यंत ५ ड्रोनच्या माध्यमातून ७ हजार ३०० एकर क्षेत्रावर फवारणी केली आहे. यातील काही क्षेत्र क्रांती साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील आहे. आपण भारत सरकारच्या धोरणाप्रमाणे ड्रोन निर्मिती व वापर यावर काम करीत आहोत.
ऊस विकास अधिकारी सुजय पाटील म्हणाले,ज्या शेतकऱ्यांना ड्रोनने फवारणी करायची आहे,त्यांनी आमच्या कारखान्याच्या गट ऑफिसमध्ये नांवे नोंद करावीत. एकरी ६०० प्रमाणे आम्ही आपल्या शेतात फवारणी करू शकतो.
पहिला ड्रोन खरेदी केलेले बहेचे शेतकरी अमर देशमुख म्हणाले,आम्ही ८ महिन्यात १७०० एकर फवारणी केली आहे. याप्रसंगी माजी उपसभापती नेताजीराव पाटील, शेतकरी सुदर्शन पाटील,अदित्य जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. चातक इनोव्हेशनचे मुकुल तिवारी,बाजीराव नांगरे-पाटील यांनी ड्रोन व त्याच्या उपयोगाबद्दल माहिती दिली.
याप्रसंगी क्रांतीचे ऊस विकास अधिकारी विलास जाधव,संग्राम पाटील,महेश कदम,अभिजित कुंभार,अजित जाधव,रोहित साळुंखे,अवधुत झरे,नंदकुमार मेमाने,संदीप बारपटे,वैभव कणसे,जयकर मुळीक,अजय पाटील,हर्षल पाटील,संजय पडळकर,रमेश गायकवाड,अनिल पाटील,लोकेश पाटील, सुनील पाटील उपस्थित होते.
अवधूत पाटील यांनी सूत्रसंचलन केले. चातक इनोव्हेशनचे संजीव धानोरकर यांनी आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!