आरोग्य व शिक्षण

भर चौकातील बस थांब्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ ; प्रवासी व व्यावसायिक त्रस्त

Spread the love

तळेगाव : तळेगाव दाभाडे शहरातील स्टेशन चौकातील वाहतूक कोंडी नित्याचीच बाब आहे. त्यातच आता भर पडली आहे पीएमपीएलच्या अनाधिकृत बस थांब्याची. तळेगाव – चाकण महामार्गावरील या चौकात रोजच वाहतूक कोंडी होते. त्यातच पीएमपीएल प्रवासी घेण्यासाठी व उतरवण्यासाठी भर चौकातच बस थांबवतात. सदर ठिकाणी अधिकृत बस थांबा नाही. तरीही कामशेट ,वडगाव, चाकण, लोणावळा व निगडी या मार्गावरील बस स्टेशन चौकातच थांबवत असल्याने तळेगाव – चाकण महामार्गावर नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

पीएमपीएल बस ड्रायव्हर भर चौकात बस थांबवत असल्याने येथील आसपासच्या व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बससाठी उभ्या असलेल्या प्रवाशांच्या गर्दीमुळे दुकानात येणार्‍या ग्राहकांना पार्किंगसाठी जागा मिळत नाही. त्यामुळे व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. तर काही व्यावसायिकांनी दुकानासमोरील जागेत सामान ठेवत केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

अधिकृत बस थांबा नसतानाही बस थांबवण्यात येत असल्याने प्रवाशांना  नाहक ताटकळत उभे राहावे लागत आहे. अनेकदा एका पाठोपाठ आलेल्या बसेस मुळे त्यांच्या मागील वाहने काही काळासाठी थांबून जातात. यामुळे कोंडी वाढते. कधीकधी रुग्णवाहिकानाही वाहतूक कोंडीचा फटका बसतो. रेल्वेप्रवास सर्वांसाठी खुला नाही, त्यामुळे व लोकलच्या फेऱ्या कमी असल्यामुळे पीएमपीएल ने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याचा फायदा घेत खासगी बसही या चौकात प्रवासी घेण्यासाठी राजरोसपणे थांबतात.

यामुळे भर चौकातील हा बस थांबा एकूणच प्रवासी, आसपासचे व्यावसायिक व वाहतूक पोलिस यांच्यासाठी डोकेदुखी ठरत असून वाहतूक कोंडीत त्यामुळे भर पडत आहे. त्यामुळे अधिकृत बस थांब्यावर बस थांबवाव्यात व प्रवाशांसाठी निवारा शेड उभारावे अशी मागणी प्रवासी व व्यावसायिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!