आरोग्य व शिक्षण

जैसी ज्याची दृष्टी तैसा प्रगटे नारायण..लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी..

दृष्टी बदलली की दृष्टिकोन बदलेल! दृष्टीकोन बदलला की स्वभाव बदलेल! आणि स्वभाव बदलला की व्यक्तिमत्व बदलेल ! कारण---स्वभाव –ओळख व्यक्तिमत्त्वाची..

Spread the love

जैसी ज्याची दृष्टी तैसा प्रगटे नारायण— दृष्टी बदलली की दृष्टिकोन बदलेल! दृष्टीकोन बदलला की स्वभाव बदलेल! आणि स्वभाव बदलला की व्यक्तिमत्व बदलेल ! कारण—स्वभाव –ओळख व्यक्तिमत्त्वाची..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, १ फेब्रुवारी.

मी जरी डॉक्टर असलो तरी ‘स्वभावाला ‘औषध नसतं,असे माझ्या कानावर सतत यायचं, अजूनही येत राहत ,
खरच हा ‘स्वभाव’ म्हणजे काय हो ?
कुतूहलाने या प्रश्‍नाने माझ्या मनात अनेक विचारांचे तरंग उमटले आणि मग मी या ‘स्वभावाच्या ‘शोधात निघालो.
त्याची अनेक रूप मला दिसायला लागली, अनुभवाची प्रचीती यायला लागली.
साधारणपणे स्व+भाव= स्वभाव अशी या शब्दाची फोड आपल्याला करता येईल *म्हणजेच आपल्या मनात जे भाव उमटतील, त्याचे प्रतिबिंब आपल्या कृतीमध्ये जस–जस उमटेल तस–तसा माणसाचा स्वभाव प्रगट होतो* ,व्यक्त होतो, मग आपण म्हणतो हा कपटी आहे ,हा श्रद्धाळू आहे ,हा दयाळू आहे ,हा संवेदनशील आहे ,हा प्रेमळ आहे ,अशी त्याची अनेक रूप प्रत्येक जण अनुभवत असतो .
परिस्थितीने माणसाचा स्वभाव निश्चितपणे चांगला किंवा वाईट होऊ शकतो यात वादच नाही.
पण .

मी कपटी ,शीघ्रकोपी, स्वार्थी ,बेपरवा असा स्वभावाचा बनलेला मला तरी चालेल का?
मग इतरांचं काय ?
निश्चितच असा स्वभावाचा माणूस कोणाला आवडणार नाही ,हवाहवासा वाटणार नाही .
मग जर माझा स्वभाव परिस्थितीमुळे बनलेला असेल तर तो मी बदलू शकेल का?
होय ! कारण या *स्वभावाची जाणीव हीच पहिली परिवर्तनाची सुरुवात आहे.
अत्यंत खेळकर, श्रद्धालु, संवेदनशील ,आनंदी, समजूतदार अशा स्वभावाची व्यक्ती कोणाला आवडणार नाही ?
होय ! ती सर्वांनाच हवीहवीशी वाटेल ,तिचा सहवास घडावा यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील राहील, मग हा बदल जर माझी कुटुंबातील ,समाजातील प्रतिमा बदलण्यास कारणीभूत असेल तर प्रयत्नांनी मी त्यात बदल करू शकेन हे ‘सूर्यप्रकाशा ‘ इतकेस्वच्छ आहे .
मग मूळ प्रश्न येतो स्वभावाला औषध असते काय?
*त्याचे उत्तर निश्चितपणे आपल्या जवळच आहे ,ते बाहेर कुठेही विकत मिळत नाही, शोधून सापडत नाही ,ते आपल्यातच सामावलेला आहे* .
फक्त त्याची जाणीव पूर्वक दखल घेणे आणि स्वतः बदल करणे हे आपल्या हातात आहे.
आपण अनेक पौराणिक, ऐतिहासिक ,सामाजिक ,राजकीय व्यक्तींची चरित्रे वाचतो.
त्यात विविध व्यक्तींच्या स्वभावाचं दर्शन आपल्याला घडत…
उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर महाभारतातील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्यांच्या कृतीतून आपल्याला जाणवतो .
कृष्ण म्हटला की अत्यंत मिस्कील विश्व पराक्रमी पण स्थितप्रज्ञ ,रावण दुष्ट प्रवृत्तीच साक्षात दर्शन.
दुर्योधन, दुशासन दृष्ट स्वभावाचे व्यक्तिमत्व ,शकुनीमामा कपटी,भीष्म पराक्रमी पण स्थितप्रज्ञ ,तसेच रामायणातील प्रभुरामचंद्र म्हणजे आदर्श स्वभावाचा मूर्तिमंत पुतळा.
पौराणिक उदाहरणाप्रमाणे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढणारे राष्ट्रपुरुष आपल्याला भारताच्या इतिहासात जागोजागी भेटतात.

त्यांच्या कणखर , पोलादी, अविचल स्वभावाचे दर्शन त्यांची चरित्र वाचताना अनुभवायला मिळते.
डोळसपणे आपण अनेक ग्रंथांचे वाचन केलं ,आपल्या जवळच्या नातेवाईकांचा वागणं पाहिलं त्यांचे स्वभाव मित्र-मैत्रिणींच्या कृती, हे जर पाहिले तर त्यातला चांगला भाग आत्मसात करून आपल्या स्वभावातही आपण जाणीवपूर्वक बदल करू शकतो आणि एकदा का आपल्याला ती गुरुकिल्ली हाताशी लागली की, मग पहा आपले संपूर्ण जीवनच बदलून जाईल ,यात मला तिळमात्र शंका नाही.
आजकाल स्पर्धेच्या, धकाधकीच्या युगात चांगल्या स्वभावाची माणसं मिळणं हे वाळवंटातील ओयासिस सारख आहे.
या पार्श्वभूमीवर आपण आपल्या स्वभावात प्रयत्नपूर्वक चांगला अमूलाग्र बदल घडवला तर निश्चितपणे आपण स्वतःला आणि इतरांना ही आपल्या सहवासाच्या माध्यमातून आनंद देऊ शकतो .

!!भले तरी देऊ कासेची लंगोटी,
नाठाळाच्या माथी देउ काठी !!
हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी स्वभाव कसा असावा हे आपल्या अभंगातून पटवून दिले आहे , प्रसंगी मेनाहुनी मऊ आम्ही विष्णुदास ,पण वेळ पडली तर वज्रास सुद्धा भेदण्याची क्षमता आमच्या स्वभावात आम्ही धारण करू शकतो .वरील सर्व निरीक्षणाचा मूळ उद्देश म्हणजे आपल्या आंतरिक भावनेवर नियंत्रण ठेवून परिस्थितीनुसार आपल्या स्वभावात बदल करणे आणि आपलं व्यक्तिमत्त्व आपल्या कृतीतून आदर्श बनवणे हे आपल्या हाती आहे .
हे सर्व विचार वाचल्यानंतर निश्चितच आपल्या स्वभावात चांगला बदल घडेल आणि आपले स्वतःचे जीवन आनंदाने भरेल याची मला खात्री आहे.

सर्वे सुखिनः सन्तु सर्वेसन्तु निरामय.
पश्यन्तु मा कश्चित दुःखमापनयात
हि त्या निरामय प्रभू चरणी प्रार्थना !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!