आरोग्य व शिक्षण

अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगकडे पालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

Spread the love

तळेगाव : तळेगाव शहरातील अनधिकृत फ्लेक्स आणि होर्डिंग यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.शहराला विद्रुप करणाऱ्या होर्डिंग्ज फ्लेक्स कडे पालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. तळेगाव चाकण महामार्गालगत 30 ते 40 फुटी होर्डिंग्जची संख्या वाढतच आहे.तर काही होर्डिंग शहरातील विविध इमारतींच्या छतांवर उभारण्यात आले आहेत. यातील बहुसंख्य होर्डिंग उभारताना संबंधित प्रशासनाची परवानगी घेतली नसल्याची व ते अनधिकृतरित्या उभारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

काही होर्डिंग हे विद्युत वाहक तारांच्या लगत लावले असल्याने भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो. यापूर्वीही होर्डिंग्जवर जाहिरात फ्लेक्स लावताना अपघात झाले आहेत. परंतु अजूनही यांचे गांभीर्य कोणालाही नाही. तर काही होर्डिंग्ज अनेक वर्षापासून उभे असून जीर्ण झाले आहेत .असे होर्डिंग्ज कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का? असा प्रश्‍न शहरातील सुजाण नागरिकांना पडला आहे.

रस्त्याच्या कडेला टपरी किंवा हातगाडी लावून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब व्यावसायिकांवर कारवाई होते. मात्र अनधिकृत होर्डिंग उभारून वार्षिक लाखो रुपये भाडे घेणा-यांकडे कानाडोळा केला जातो. यात नेमके काय अर्थकारण दडले आहे हा संशोधनाचा विषय आहे.

यापूर्वी या संदर्भात बातम्या प्रसारित झाल्यानंतर कारवाई करत शहर फ्लेक्स मुक्त करण्यात आले होते. मात्र अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग मालकांना कोण अभय देत आहे? याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. शहरात फ्लेक्स लावण्यापूर्वी रीतसर शुल्क भरून पालिका प्रशासनाकडून परवानगी घेणे बंधनकारक असताना अनधिकृत फ्लेक्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नगरपरिषदेचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.

स्ट्रीटलाईटच्या प्रत्येक खांबावर, झाडावर त्याचप्रमाणे रस्त्याच्या वळणावर लावलेल्या आणि वाहतुकीला अडथळा ठरणारा फ्लेक्समुळे रोजच किरकोळ अपघात होत आहेत. मात्र त्यावर नियंत्रण मिळवण्यावर पालिका प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र समोर येत आहे.त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर ते गल्लीबोळा पर्यंत फ्लेक्सबाजीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका प्रशासन उपाययोजना करणार का? त्याच बरोबर फक्त अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई न करता धोकादायक व अनधिकृत लोखंडी होल्डिंगवर कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!