आरोग्य व शिक्षण

एका मजुराची व्यथा .. – लेखक हर्षल आल्पे

Spread the love

आवाज न्यूज : आमच्याकडे किरकोळ कामासाठी एक सुतार आले होते , सहज जुन्या आठवणींना उजाळा देता देता गोष्ट 2020 -21 च्या पहिल्या लॉक डाउन पर्यन्त येऊन ठेपली , लाकडाशी लढता लढता , त्याची कापणी करता करता ते सुतार माझ्यासमोर त्यांच्या संघर्षाचा जीवनपट मांडत होते . इकडे टीव्ही वर पंतप्रधानांचे संसदेतले भाषण सुरू होते . ज्यावेळी तिकडे पंतप्रधान त्या आठवणींना उजाळा देत होते , त्यावेळी इकडे सुतार काम करणारे काका आपल्या आठवणींशी गोळाबेरीज करत होते .

त्या पंतप्रधानांच्या आवाजावरून आम्ही थेट पहिल्या लॉक डाउन च्या घोषणेच्या भाषणाकडे पोहोचलो . की कसे ते भाषण आमच्या त्या सुतार काकांनी आणि त्यांच्या सहकार्यां्नी एका टीव्ही च्या दुकानात असेच फर्निचर चे काम करताना ऐकले . आणि लॉक डाउन च्या “सब बंद” च्या घोषणेने त्यांचे धाबे दणाणले . उद्या पासून काम बंद ? ही कल्पनाच त्यांना असह्य होत होती , आणि तरी सुद्धा ते बाहेरून “कुछ नहीं होगा , ये सिर्फ बोला है , काम बंद नहीं होगा” या दिलाशाने ते आपली मने भरत होते . थोड्या वेळाने गावावरून फोन खणखणू लागल्यावर मात्र त्यांच्या भावनांचा तोल ढळू लागला . आणि आता मिळेल त्या गाडीने गाव गाठणेच उत्तम , यासाठी ते प्रयत्न करू लागले , मात्र अचानक झालेल्या या गोष्टीमुळे स्थानके अचानक गर्दीने भरून गेली , ज्याला त्याला मिळेल त्या गाडीने गाव गाठण्याची ओढ लागली . आणि त्या गर्दीत सुतारकाकांचा अन त्यांच्या सहकार्यां्चा जीव घाबरागुबरा व्हायला लागला . ते आपल्या राहत्या घरी परत आले . झोप काही लागेना , उद्यापासून कामाचे कसे करायचे ? रोजंदारीवर काम करण्याची सवय , त्यामुळे उद्यापासून ची भाकर खुणावू लागली , तात्पुरते दिलासे लोक देत होती , पण कुटुंबाची चिंता त्यात भाकरीचा प्रश्न , असे दोन्ही प्रश्न इतर गोष्टींना डोक्यात थारा देत नव्हते . काही दिवस असेच प्रश्नात गेले, शेवटी असह्य झाले आणि या न त्या मार्गाने ते गावाला जायला निघाले , एका राजकीय पक्षाच्या नेत्याने दिलेली मोफत रेल्वे ची तिकिटे या भांडवलावर त्यांनी प्रवास सुरू केला . त्या रेल्वे मध्ये न खाण्याची सोय न ही कसली सोय . गर्दीत जीव मुठीत घेऊन त्यांनी कसा बसा प्रवास केला . एका ठिकाणी ती ट्रेन थांबली , तिथून अजूनही गाव लांबच होते . एक 200 ते 300 किलोमीटरचा प्रवास अजून ही होता , शिवाय राज्याच्या वेशीवरून सगळी विघ्ने पार करून जाणे हे ही एक दिव्यच होते . जाण्याची सोय तुटपुंजीच होती . मग रस्त्यावरून अखंड पायपीट सुरू झाली , मिळेल तो रस्ता अन मिळेल ते अन्न या शिदोरीवरून हा प्रवास सुरू झाला . ज्यांनी या काळात ही आपआपल्या घरात एक सुखवस्तू आयुष्य व्यतीत केलय त्यांना या प्रवासाची कल्पना ही नाही येणार . काही शे किलोमीटर नुसते चालायचे ,तहान भूक , ऊन ,पाऊस ,वारा कशा कशाची ही तमा न बाळगता चालत राहायचे , फार अवघड काम . वाटेत काय काय दिव्य बघायला अनुभवायला मिळेल याची कल्पना च न करणे बरे , बर ! मदतीची अपेक्षा तरी कुणाकडून करणार ? हा ही प्रश्न आहेच , इथे प्रत्येकालाच मर्यादा होत्या . सुतार काका जाताना अनेक लोकांना बेशुद्ध होऊन पडताना ही बघत होते , एक दोन ठिकाणी तर रस्त्यात कसे ही पडलेले मृतदेह ही त्यांनी पाहिल्याचे सांगितले . ते पाहिल्यावर तर सुतार काकांचा चालण्याचा वेग काळजीने म्हणा , भीतीने म्हणा अधिकच वाढे . शरीराला मर्यादा आहेत म्हणूनच कुठे तरी थांबावे , तर थांबण्यासाठी आडोसा मिळेलच असे ही नाही . कुटुंबाच्या संपर्कात राहण्यासाठी असलेले मोबाइल नावाचे अस्त्र ही निकामी ठरत होते . खरोखरच ती जगण्याची लढाईच होती .शेवटी  मजल दरमजल करत सुतारकाका गावाला पोहोचले खरे , पण ! त्यांना लगेच आपल्या कुटुंबीयांना भेटायला ही नाही मिळाले , नियमांनुसार त्यांना गावाच्या वेशीवरच क्वारनटाईन करण्यात आले सात दिवसांसाठी . आठव्या दिवशी आपल्या घरी गेल्यावर खरे त्यांचे जगणे सुरू झाले .

हे सगळे अनुभव सांगत असताना सुतारकाकांचे डोळे भरून येत होते . त्या अडवल्या जाणार्यास असंख्य हुंदक्यांचे विश्लेषण करता येणार नाही . सुतार काका च नाहीत तर मी बर्या्च जणांशी बोललो , जे त्या काळात नुसते धावत होते , चालत होते . एकेकाचे अनुभव मन विषण्ण करून जातात . किती ही दिलासा द्यायचा म्हंटले तरी त्याला ही मर्यादा होत्या . आपण नाही म्हणू शकत की “काय गरज होती गावाला धावत जायची , इथेच थांबायचे ना , फरक काय पडतो ? जेवणाचाच प्रश्न होता ना , सुटला असता” हा फक्त जेवणाचा प्रश्न नव्हता , काही लोकांनी यावर राजकारण सुरू केले , आपल्याकडे सर्वात स्वस्त जर काय असेल तर हे असले राजकारण , पण एकच मांडावेसे वाटते , की जगण्याच्या खेळात या राजकारणाला काहीच किम्मत नसते . जिथे जगायचे कसे ? हा प्रश्न असतो ना , तिथे कुणी ही मोठा नसतो . सगळेच आपले असतात आणि सगळेच परके ही असतात . हेच खरे . तिथे जो मदत करतो तोच आपला असतो , पक्ष कुठला ? जात कुठली , धर्म कुठला ,या फालतू गोष्टींना थारा नसतो . अजूनपर्यंत आपल्याला असे रस्त्यावरून चालताना , गावाला पोहोचताना किती जण मृत्यूमुखी पडलेत दुर्दैवाने याची आकडेवारी ही काढता येत नाहीये ,आणि ती काढता येईल याची शंका ही वाटते . आपण फक्त राजकारण न करता कोण काय करतो पेक्षा त्याचा समाजाला उपयोग होतो आहे का ? हे पाहण्याची गरज आहे .

सुतारकाकांचे सगळे अनुभव आणि कथन ऐकताना एकच ओळ सारखी मनात रुंजी घालत होती ती म्हणजे“पराधीन आहे जगती ,पुत्र मानवाचा , दोष न कुणाचा”खरच दोष न कुणाचा , हेच एका मजुराच्या व्यथेतून मनापासून जाणवले ……..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!