ताज्या घडामोडी

लोकनेते कै.फत्तेसिंगराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तन महोत्सवाची सुरुवात.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी : अनंत पुण्याईने मानव जन्म मिळतो, तो वाया जाऊ देवू नका. जिवनात खऱ्या अर्थाने सुखी व समाधानी व्हायचे असेल तर, संताची शिकवण व भक्तीमार्ग अवलंबला पाहिजे, असे प्रबोधन आपल्या किर्तनातून ह.भ.प. गणेश महाराज डांगे (विहापूर, ता. कडेगाव) यांनी केले.
येथे लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्ट चिखली व प्रचिती सांस्कृतिक मंच शिराळा मार्फत कै. लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ‘‘भव्य किर्तन महोत्सवाची’’ सुरूवात झाली. काल (ता. 22) सुप्रसिध्द किर्तनकार, ह.भ.प. गणेश महाराज डांगे यांनी पाहिले किर्तनपुष्प गुंफले.
ते म्हणाले, संतांच्या विचाराने जाल तर सुख व्हाल. जगातील पहिली कर्जमाफी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी केली. लोकांवरील अत्याचार व महिलांवरी बलात्कार हे विदारक चित्र राजमाता जिजाऊंना बघवले नाही. त्यांनी शिवाजी महाराजांसारखा पुत्र जन्माला घालून लोकांची जुलमी जोखडातून मुक्तता केली. शिवरायांनी रयतेच राज्य आणले. तुकोबाराय सांगतात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत अनुभवता तो क्षण होय. कार्य असे करा की, ज्याचा आदर्श इतर घेतील. देवाने हा जन्म व देह वापरायला दिला आहे. त्याचा योग्य वापर करावा. एक दिवस काळ खाणार आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. मानवाच्या जन्माला आलाय तर, मानवासारखे वागा. भक्तीमार्ग जिवन सुखद करेल.
प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलनाने किर्तनाची सुरूवात झाली. खडे सुर व ओघवत्या वाणीने ह.भ.प. गणेश महाराजांनी सादर केलेल्या किर्तनाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांना तबलजी आकाश पळसे व गायक मनोज तडखे तर, लादेवाडी, रेड, खेड, भाटशिरगाव, भटवाडी, मांगले व शिराळा येथील टाळकरी मंडळींनी यांनी सुंदर साथ दिली. विणेकरी सर्जेराव शिंदे होते.
विश्वासचे संचालक विश्वास कदम व पृथ्वीसिंग नाईक यांच्या हस्ते किर्तनकार गणेश महाराजांचा सत्कार होऊन किर्तनाची सांगता झाली. कार्यक्रमास आपला बझार समूहाच्या अध्यक्ष सुनीतादेवी नाईक, संपतराव शिंदे, माजी सरपंच प्रमोद नाईक, नगराध्यक्ष प्रतिभा पवार, सुनील कवठेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम, नगरसेवक मोहन जिरंगे, अजय जाधव, अर्चना कदम, वैशाली कदम, संभाजी गायकवाड, सचिन शेटे यांच्यासह इतर मान्यवर, वारकरी मंडळी, भाविक, श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘प्रचिती’चे अध्यक्ष डी. एन. मिरजकर, एस. एम. पाटील, आर. बी. शिंदे, अनंत सपकाळ व नवनाथ महाराज यांनी नेटके संयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!