आरोग्य व शिक्षण

‘त्रिपुर संध्या’ कै.जगदीश खेबुडकरांच्या अवीट गाण्यात रंगले तळेगावकर रसिक

Spread the love

तळेगाव : करोनाच्या संकटामुळे श्रीरंग कलानिकेतनचे सर्व कार्यक्रम गेले दीड वर्ष बंद होते. करोना प्रभाव कमी झाल्यामुळे करमणूक क्षेत्राला मिळालेल्या सवलतीनुसार श्रीरंग कलानिकेतनने तळेगावकर रसिकांसाठी एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होता.

सुप्रसिद्ध कवी व गीतकार कै.जगदीश खेबुडकर यांच्या सुमधूर गीतांवर आधारित ‘त्रिपुर संध्या’.या कार्यक्रमास अमृता पाडळीकर (कै.जगदीश खेबूडकर यांची ज्येष्ठ कन्या) यांची विशेष उपस्थिती होती. कांतीलाल शहा विद्यालयाच्या सभागृहात रंगलेल्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन सन्माननीय अमृता पाडळीकर, श्रीरंग कलानिकेतनच्या अध्यक्षा डॉ.नेहा कुलकर्णी आणि कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस करोना आपत्ती काळात निधन झालेल्या कै.प्रकाशराव जोशी, कै.दीपक बिचे व कै.प्रा.शिरीष अवधानी या संस्थेच्या तीन माजी अध्यक्षांना अभिवादन करून आदरांजली वाहिली गेली.देवा तुझ्या दारी आलो…..या गीतानी सम्राट काशीकर या तरुण गायकाने दमदार सुरुवात केली आणि सुरु झाली एकाहून एक सुरेल आणि अवीट गाण्यांची मालिका – ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर….(सावनी परगी), आकाशी झेप घेई …..(राजीव कुमठेकर), सख्या रे घायाळ मी हरिणी –(लीना परगी), ऐरणीच्या देवा तुला –(सावनी परगी). रसिकांनी भरभरून दाद दिली. स्वप्नात रंगले मी –(लीना, राजीव),धुंदी कळ्यांना –(सावनी, सम्राट),चंद्र आहे साक्षीला –(लीना सम्राट) ,विठू माऊली तू –(राजीव, सम्राट ) या द्वंद्व गीतांनाही रसिकांनी पसंती दिली.

रसिकांची जास्त दाद मिळाली ती सर्व कलाकारांनी गायलेल्या खेबुडकरांच्या दहा लोकप्रिय गाण्यांच्या मेडलीला…रसिकांनी विनायक वाघचौरेंच्या ढोलकीला पसंतीची टाळी दिली.

पिंजरा चित्रपटाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून त्या चित्रपटातील ग..साजणी….(सम्राट), दिसला ग बाई दिसला…(लीना) आणि छबीदार छबी ……(सावनी)ही गाणी सादर करण्यात आली.अष्ट विनायका तुझा महिमा ….या सर्व कलाकारांचा सहभाग असलेल्या गाण्याने या सुरेल मैफिलीची सांगता झाली.

आपल्या मनोगतात अमृता पाडळीकर खेबुडकर यांनी सुंदर कार्यक्रम सादर केल्याबद्दल श्रीरंग कलानिकेतनच्या सर्व कलाकारांचे कौतुक केले. आपल्या वडिलांना गीतकार म्हणून प्रसिद्धी मिळाली. त्यांचा मूळ पिंड कवीचा होता पण त्याची विशेष नोंद घेतली गेली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या दोनशे पेक्षा जास्त कविता अप्रकाशितच राहिल्याचीही खंत व्यक्त केली गेली.

या सुंदर मैफिलीला संवादिनी साथ – प्रदीप जोशी, सिंथेसायझर- राजेश झिरपे, तबला- मंदार परगी, अनिरुद्ध जोशी, ढोलकी – विनायक वाघचौरे, तालवाद्य – प्रविण ढवळे, गंधार ढवळे यांनी तितकीच पूरक व सुंदर साथ संगत केली. ध्वनी संयोजन रवी मेघावत यांचे होते.

या कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढली ती अमृता पाडळीकर खेबुडकर यांच्या मनमोकळ्या मुलाखतीमुळे, ही मुलाखत आणि अभ्यासपूर्ण निवेदन यांचे श्रेय कांचन सावंत यांचे होय.

या कार्यक्रमासाठी सुंदर रांगोळी आणि दिव्यांची मोहक सजावट श्रीमती रुपाली जव्हेरी व संस्थेच्या कार्यकर्त्यांची. कोविड संदर्भातले सर्व नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न झाला .

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विनय कशेळकर, सुहास धस, काशिनाथ निम्बळे,डॉ.राजेंद्र कुलकर्णी, श्रीकांत चेपे (छायाचित्रण) विश्वास देशपांडे आणि दिपक आपटे यांनी परिश्रम घेतले. खूप दिवसांनी छान कार्यक्रम पाहण्याचे व ऐकण्याचे समाधान रसिकांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!