आरोग्य व शिक्षण

परमेश्वराने ज्यांची आई हिरावून नेली त्यांच्यासाठी सिंधुताईची निर्मिती केली – डॉ. मिलिंद भोई

Spread the love

चिंचवड : अनाथांची माय म्हणून देशातच नव्हे जगभरामध्ये सुप्रसिद्ध सिंधुताई सपकाळ या अचानक पणे आपल्यातून निघून गेल्या .खरंतर त्या अशा अचानक एक्झिट घेतील असं कधीच वाटलं नाही. माझा आणि त्यांचा परिचय पंचवीस वर्षांपूर्वीचा .एका कार्यक्रमांमध्ये आम्ही दोघे एकत्र होतो , त्यासोबत आहेत म्हणून मी खूप टेन्शनमध्ये होतो आणि भाषणासाठी उभा राहिलो ,माइक कडे जाताना त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आशीर्वाद घेतले. माईंनी डोक्यावरून हात फिरवला, म्हणाल्या लेकरा घाबरू नकोस, बिंदास बोल ,मी आहे .आणि त्यांच्या या वाक्याने माझ्या मनातली भीती निघून गेली, मी मनसोक्तपणे भाषण केल. आईने मुलाच्या डोक्यावर हात फिरवल्याiवर जे काही वाटत अगदी तशीच संवेदना मला त्यादिवशी जाणवली ,आणि त्या दिवसापासून आमची मैत्री झाली .औपचारिकता कधीच जाणवली नाही .

त्यांच्यामध्ये एक खोडकर लहान मुल लपलेला होता .आणि त्यामुळेच त्या इतका संघर्ष करू शकल्या. त्यांचा जन्म झाल्यावर ,मुलगी झाली या रागाने त्यांचं नाव चिंधी असं ठेवण्यात आलं .म्हणजे लहानपणापासूनच त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली .नकळत वयामध्ये त्यांना या नावाने हीणवण्यात आला. चिंधी पासून सुरू झालेला हा प्रवास पद्मश्री सिंधुताई सपकाळ या पर्यंत पोहोचला .त्याच्यामध्ये फक्त संघर्ष हा एकच शब्द होता .

वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचे लग्न लावून देण्यात आले .त्यांच्या पतीचे वय तेव्हा 32 वर्षे होते .त्या गरोदर असताना त्यांना बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करण्यात आली .अंगावरचे फाटकं लुगडं ,कडेवर कन्या ,खंबीर आणि जिद्दी मन आणि प्रेमळ हृदय या भांडवलावर त्या बाहेर पडल्या. स्मशान भूमी मध्ये वास्तव्य केलं .त्या नेहमी त्यांच्या भाषेत म्हणायच्या की, लोक म्हणतात स्मशानभूमीत भूत असतं, पण खरं सांगू जिवंत माणसांपेक्षा भूत जास्त प्रेमळ असतात. मृतदेहाच्या जाळणाऱ्या चितेवर भाकऱ्या भाजून खाल्ले. त्यांच्या तान्या मुलीला गाईने दूध पाजले. या आठवणी सांगताना किती कठोर माणूस असला तरी त्याचे डोळे भरून येत असत. गाईने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून की काय त्यांनी अनाथ मुलांसोबत अनेक गाईंचे पण संगोपन केलं .ज्या नवऱ्याने त्रास दिला तोच नवरा काही दिवसांनी त्यांच्या आश्रयाला आश्रमात आला. माईंनी कोणताही राग न धरता त्याला आश्रमात घेतले आणि सांगितले की नवरा म्हणून नव्हे तर माझ्या इतर लेकरां सारखे लेकरू म्हणून तुला राहावे लागेल .हे सांगताना त्यांचे मिस्किल हास्य हे भोगलेला दुःखाला विसरून जावे याचे निदर्शक होते .

Dr

त्या नेहमी म्हणायच्या की माझ्या नवऱ्याने मला त्रास दिला नसता तर तुम्हाला सिंधुताई सपकाळ दिसली नसती. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहे. अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये विमानतळावर उतरल्यावर त्यांच्या नऊवारी कडे अमेरिकन लोक कुतुहलाने पाहत असत. याचे वर्णन करताना जगात भारी आमची नऊवारी असे त्या म्हणत. आपल्याकडे भारत देशाला माता म्हणतात पण अमेरिकेत त्यांच्या देशाला मावशी पण म्हणत नाही हे सांगताना त्यांच्यातल्या देशप्रेमाची भावना श्रोत्यांमध्ये देशभक्तीची ज्योत पेटवत असे . त्यांच्या आश्रमातील अनेक मुलांना कान नाक घसा तज्ञ म्हणून उपचार आणि ऑपरेशन करण्याचे भाग्य मला लाभले .प्रत्येक वेळेस आणि विशेषता ऑपरेशन च्या वेळेस त्या देशभरात कुठे जरी असल्या तरी तरी सतत फोन करून उपचारा संदर्भात त्या माहिती घेत असत. प्रत्यक्ष आई-वडील जितकी काळजी घेतात त्यापेक्षा काकणभर जास्तच त्यांची काळजी असायची. माझ्या एका लेकराचा ऑपरेशन माझं दुसरं लेकरू करतोय असं त्या म्हणाल्या की मला स्वतःला खूप नशीबवान असल्यासारखे वाटायचे.

संपूर्ण जगातल्या तरुणांचे आयडॉल असणाऱ्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या व्हिजन इंडिया ट्वेंटी-ट्वेंटी या उपक्रमात काम करत असताना मला ग्रामीण भागातील युवकांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यासाठी पुणे ते चेन्नई सायकल रॅलीचे आयोजन भोई प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते .याचा अहवाल तयार करताना त्यामध्ये सिंधुताईंनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ.कलाम सरांनी याचे प्रकाशन केले. यानिमित्ताने मला त्यांच्या विचारशक्तीचा आणि बुद्धिमत्तेचा वेगळा पैलू पाहायला मिळाला.
मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटाच्या निमित्ताने यांची जीवन कहाणी लोकांसमोर आली. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले पण शासकीय सन्मान त्यांना याआधीच मिळायला हवा होता .असे मला प्रामाणिकपणे वाटते. त्यांना पद्मश्री प्रदान करताना साक्षात राष्ट्रपती यांनी खाली येऊन त्यांना वाकून नमस्कार केला. हा नमस्कार केवळ सिंधुताई सपकाळ यांना नव्हता ,तर देशभरात अनाथांसाठी काम करणाऱ्या प्रत्येक आईला तो होता, स्वतःच्या मुलीला दुर ठेवून अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या माईंना तो होता, आणि चिंधी पासून सुरु झालेल्या संघर्ष यात्रेला होता .सिंधुताई मुळे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एक वेगळे स्टेटस प्राप्त झाले. एकदा त्यांना भेटायला माझ्यासोबत गोव्याचे मंत्री श्री तावडकर आले होते .त्यांनी सिंधुताई बद्दल फक्त ऐकलं होतं त्यांच्यासोबत शासकीय लवाजमा होता ,सिंधुताई ची कहाणी ऐकल्यावर मंत्र्यांपासून ते शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचे डोळे पाणावले आणि सर्वांनी माईंना दंडवत घातले. त्यानंतर या मंडळींनी सिंधुताईंना गोव्यात बोलून मोठा सत्कार केला, आणि त्यांच्या कार्याला निधी अर्पण केला. भाषण नाही तर राशन नाही हे त्यांचे नेहमीच वाक्य ,भाषण करून मिळालेले पैसे हे अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी आणि उपजीविकेसाठी वापरले जात. त्यासाठी माई पायाला भिंगरी बांधल्यासारखे वणवण फिरत. परमेश्वर प्रत्येक ठिकाणी पोचू शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली असे म्हणतात पण मला असं वाटतं की, परमेश्वराने ज्यांची आई हिरावून नेली त्यांच्यासाठी सिंधुताई ची निर्मिती केली .

आई आणि माई याच्यात फक्त एकाच अक्षराचा फरक आहे .तरीसुद्धा स्वतःच्या या लेकरावर प्रेम करणारी आई पेक्षा अनाथ मुलांवर प्रेम करणारी माई ही मला जास्त महत्त्वाची वाटते .एवढे सगळे दुःख भोगून सुद्धा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप सकारात्मक होता. त्या स्वतः गाणे शिकत होत्या. कारण सुरुवातीच्या काळात गाणे जाऊनच त्यांनी पैसे मिळवले होते. माईंच्या संस्थेमध्ये सतत देवासमोर एक दिवा तेवत आहे .आणि माई म्हणायच्या मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा माझी लेकरं तो दिवा विझू देत नाहीत .मी सुखरूप आणि लवकर परत यावे यासाठी माझी लेकरं प्रार्थना करतात. आज समाजात स्वतःच्या जन्मदात्या आईबापांना श्रीमंत आणि शिकलेली मुलं वृद्धाश्रमात सोडत आहेत. आणि रक्ताच्या कोणतंही नातं असणाऱ्या या आईसाठी ही लेकरं देवासमोर दिवा लावून प्रार्थना करत आहेत. या समाजातल्या दोन भिन्न गोष्टी आहेत. माझ्या सकट सर्व लेकरांची प्रार्थना आज बाप्पाने ऐकावी आणि तो दिवा सतत तेवत राहण्यासाठी आमच्या माई ना आमच्याकडे परत पाठवावे. अशी प्रार्थना माईंच्या सर्व लेकरांचे वतीने मी गणपती बाप्पा कडे करतोय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!