आरोग्य व शिक्षण

जातपात सोडा राव ! जमाना बदललाय ! – लेखक : हर्षल आल्पे

Spread the love

तळेगाव : सध्या सहज म्हणून जरी समाज माध्यमांवर नजर गेली असता , कुठे तरी एखादी तरी पोस्ट किंवा विचार असा दिसतोच ज्यात जातिवाचक विचार आणि त्याबद्दलची घृणा दिसते . खर तर लहानपणापासून असे संस्कार प्रत्येकावर असतातच , की सर्वजण समान आहेत , खरे तर एकच धर्म असतो की , मानव धर्म हाच श्रेष्ठ धर्म मानला गेला पाहिजे , पण ! जसजसे आम्ही रूढार्थाने मोठे होतो तसेतसे आम्ही जातीपातीत नाही म्हंटले तरी व्हावत जातो . खरतर आजच्या बदलत्या परिस्थितीत ही जात हा भाग अस्तित्वातच असला नाही पाहिजे , कारण रोजच्या या जीवनाच्या अस्थिरतेत कोण कशी आपल्याला मदत करेल , काहीही सांगता येत नाही . कधीकधी आपले जवळचेच म्हणवणारे आपला कसा केसाने गळा कापतील , ते ही स्वार्थासाठी , तर ते ही कुणीच सांगू शकत नाही . परिस्थिति अशी आहे , की “पैसा हीच श्रेष्ठ देवता” असे म्हणण्याची वेळ आता आली आहे , प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हा लागतोच लागतो , पूर्वीच्या काळी एक गोष्ट ठीक होती , की अगदी काही नाही केले तरी जगण्यासाठी लागणार्या, गोष्टी सहज उपलब्ध होत होत्या , मात्र आता तसे नाही . आता प्रत्येकच गोष्टी साठी कडक संघर्ष करावा लागतोय . आजच्या जगात फुकट मिळणार्या गोष्टींना काहीच किम्मत नाही , उलट त्याच्या गुणवत्तेबाबतच खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते . उगीचच , तत्वज्ञानाच्या पुस्तकातले अर्धेच वाक्य आपण खरतर लक्षात घेतो की पैसाच श्रेष्ठ नसतो , त्याच्या पुढचे वाक्य खर तर महत्वाचे आहे ,अन ते म्हणजे माणुसकी ही तितकीच म्हहत्वाची आहे , पण आपण ते ही लक्षात घेत नाही . दिवसभर नुसते समाज माध्यमांवर जात जात करत , एका जातीला शिव्या घालत आपण वेळ वाया घालवतोय .

हल्ली काही स्वतहाला विचारवंत वैगेरे म्हणवणारे काही लोक पूर्वी जातींवर कसा एका विशिष्ट जातीने कसा अन्याय केला , याचा इतिहासाच्या पांनांमधून कीस पाडत असतात . पण ! इतिहासाच्या प्रत्येकच घटनेला वेगवेगळे आयाम असतात , हे मात्र आपण सोयिस्कररित्या विसरतो . काही वेळा राज्य जिंकण्यासाठी सुद्धा काही हे असे जातीपातीत भांडणे लावून पुन्हा लढाऊ सैन्य उभारून विद्रोह करण्यासाठी सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न केले जायचे , हे कोण लक्षात घेतच नाही . आपल्याला ती लढाई दिसते , पण , त्यानंतर चे परिणाम , कोण खर्या् अर्थाने जिंकले , आणि त्यांनी आपल्याला कसे गुलामगिरीत ढकलले , हे आपण विसरून जातो , आणि हे विसरणेच खरतर आपल्या उगाचच्या संघर्षाला कारणीभूत आहे .
हल्ली काही अपवाद वगळता सर्वच पक्षांचे लोक या जातीपातींच्या खेळाचा अभ्यास करताना दिसतात , एवढेच नाही तर नव्याने समीकरणे मांडताना ही दिसतात . अमुक भागात अमुक जातीची एवढी एवढी मते आहेत , ती मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न ही केले जातात . अमुक भागात तमुक जातीची मते सर्वाधिक आहेत , म्हणजे त्या जातीचा उमेदवार दिला पाहिजे , मग त्याचे काम असो अथवा नसो , तो जनतेला माहीत नसला तरी चालेल , पण ती जनता तरी एक गठ्ठा मतदान करेल . गणित हेच असते . मग ही बातमी कळल्यावर सर्वच पक्ष त्याच जातीच्या उमेदवारांसाठी प्रयत्न करू लागतात . आणि प्रत्येकच पक्षातल्या चांगल्या उमेदवारावर इथूनच अन्याय सुरू होतो . अनेक चांगले खर्या्अर्थाने तळमळीचे कार्यकर्ते हे इथूनच मागे पडायला सुरुवात होते . आणि निवडणुकीच्या या खेळात फक्त डोकी मोजायचा खेळ सुरू होतो .

 

मग या सगळ्यामुळे परिपूर्ण विकास म्हणजे काय ? हे तर कळत नाहीच , पण ! जनतेच्या समस्यांवर कधी कधी मार्ग ही निघत नाही . आणि जोपर्यंत हा जात हा फॅक्टर आपल्या लोकशाहीतून जात नाही तोपर्यंत तिला आपण तरी सुदृढ म्हणू शकत नाही .

लहानपणी शाळेत दाखल करण्यासाठी शाळा एक फॉर्म द्यायच्या , ज्यात जातीचा आणि धर्माचा भाग असायचाच . मी त्या फॉर्म कडे बघायचो , मला अख्ख्या फॉर्म मधला का कुणास ठाऊक पण तो भाग मला प्रचंड खटकायचा . हे दोन भाग जर नसतील तर काय होईल ? हा कागद या दोन गोष्टींशिवाय कसा दिसेल ? बाबा त्यावर काहीतरी लिहायचे , पण त्या लिहीलेल्या शब्दांचा अर्थ मला आजवर कधीच कळला नाही , विशेषता जातीचा तर बिलकुल नाही . मी अमुक जातीचा आहे , म्हणजे नक्की काय ? माझ्या जातीचा माझ्यावर काही फरक पडतो ? मला तरी असा फरक काही वाटलाच नाहीये . जे अन्न दूसरा खातो तेच मी ही चवीचवीने खातो . ज्या चालीरीती दुसर्यां च्या घरात असतात , ज्या प्रथा परंपरा दुसर्यां च्या असतात त्याचा सन्मान ठेवण्याचे संस्कार हे लहानपणापासूनच झालेत . माझ्या अथवा घरावर संकट आले तरी धावत येणारा माझ्याच जातीतला असेल असे ही नाही . उलट “तो आपल्या जातीतला नाही” असे ज्याच्या बाबतीत बोलले जायचे तोच प्रसंगी मोठा त्याग करून धावत आलाय संकटात , मग ही जात म्हणजे काय ?
एका चित्रपटात एक विक्षिप्त सीन असून ही मला तो आवडला होता , एक एलियन पृथ्वीवर येतो , त्याला या जातीपातीबद्दल कळते , तो हॉस्पिटल मधल्या नर्सला एक नवजात शिशु दाखवून विचारतो “याच्या शरीरावर याच्या जातीचा शिक्का कुठे आहे ?” ती नर्स घाबरून पळूनच जाते . तो डॉक्टरला ही विचारतो ,डॉक्टर कडे ही या प्रश्नाचे उत्तर नसते .. आणि हेच मजेशीर आहे .
खरेच आपल्या प्रत्येकाकडेच आज या जात या शब्दाबद्दल उत्तर ही नाहीये , ना धड आपल्याला त्याची उकल माहितीये . आणि तरी ही आपण अंध पणे हीच जात घेऊन जगतोय , नुसते जगत नाही आहोत , तर त्याच चष्म्यातून आपण जगाकडे पाहतोय . हे वाईट आहे . जी समाजमाध्यमे ,जी तुमच्या डोक्यात काय आहे ते लिहा अशी साद घालतात , आज त्यावर आपण बजबजपुरी करून टाकली आहे . समाज घडवणार्याल शक्तीच्या असलेल्या या माध्यमांवर आपण ती बिघडवणारी कशी आहेत हेच आपण रोज सप्रमाण सिद्ध करतोय .

2020 आणि 2021 च्या या काळाने आणि निसर्गाने आपल्याला एक धडा शिकवला आहे , की या जातीपाती पेक्षा ही खूप मोठ्या गोष्टी आहेत , आपण त्याचा सन्मान राखला पाहिजे , अन्यथा या निसर्गचक्रापुढे आपण फक्त एक बारीक तुकडा आहोत , जो कधीही मिटू शकतो , जसा निर्माण होतो तसाच तो संपतो . शेवटी निर्माण केलेला संघर्ष वैगरे काहीच राहत नाही . सगळे एकाच तर पातळीवर असतात , कुणी ही उच्च किंवा निच्च असे कुणीच नसते .
तर मग कशाला ही जात आणि हा भेद , सोडून द्या राव , जमाना खूपच पुढे निघून गेलाय , आपण तर फक्त धावतोय त्याच्या मागे मागे ,या गणितात भागाकार काही ही असो , बांकी काहीही नाही … हेच खरे ……

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!