राजकीय

कोल्हापूरचे उत्तर ‘मातोश्री’ कडे

Spread the love

(वर्षाराणी दुर्गे सरूडकर)

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. अवघ्या चार-पाच दिवसावर मतदान येऊन ठेपले आहे. येथे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काय होणार याचे उत्तर मातोश्रीकडे असल्याचे दिसून येते. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आघाडीचा धर्म पाळत कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कोणताही दगाफटका झाला तर गैर नाही, अशा शब्दात त्यांनी नेत्यांना फटकारले असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी प्रचारात आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. गत निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सामना झाला होता. परंतु निकालानंतर काँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केली आहे. त्यामुळे आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून शिवसेनेचे सर्व पदाधिकारी प्रचारात ढाल म्हणून वावरतांना दिसत आहेत. शिवसेनेचे खासदार प्राध्यापक संजय मंडलिक आणि शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेची प्रचार यंत्रणा काँग्रेसचे उमेदवार जयश्री जाधव यांच्यामागे उभी केली आहे. काँग्रेसने तिनी पक्षाची ताकद एकवटून मैदान मारण्याचा विडा उचलला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील यांची ताकद स्पष्ट होणार आहे. जिल्ह्याचा नेता आपणच असल्याचे त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा संधी प्राप्त झाली आहे. ही संधी कोणत्याही परिस्थितीत दवडायची नाही, हा विडा त्यांनी उचलला आहे. जिल्ह्याचा नेता आपणच असल्याचे दाखवून देण्याची किमया ते करणार का? हे या निवडणुकीवरून स्पष्ट होणार आहे. जर काँग्रेसला फटका बसला तर संशयाची सुई शिवसेने भोवती घोंगावत राहणार आहे, हे मात्र तितकेच सत्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!