ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

एक इंच पिछे मत हटना !! चाहे इंच इंच कट जाना  !!

२६/११/२००८ ला दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्या नंतर यातील जखमींची सेवा करण्यासाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठानचे वैद्यकीय पथक मुंबईतील जे जे रुग्णालयात गेले होते.

Spread the love

एक इंच पिछे मत हटना !!
चाहे ईंच इंच कट जाना  !!

आवाज न्यूज : मुंबई , विशेष लेख. २६ नोव्हेंबर.

२६/११/२००८ ला दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्या नंतर यातील जखमींची सेवा करण्यासाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठानचे वैद्यकीय पथक मुंबईतील जे जे रुग्णालयात गेले होते. त्या आठवणींचा हा लेखाजोगा. डॉ. मिलिंद भोई.

जे जे रुग्णालय, वॉर्ड क्रमांक १८.(२९/११/२००८)
‘मुझे मेरी बच्ची चाहिये, आपने उसे कहा देखा है ,मै उसे कबसे ढूंढ रही है,भगवान के लिए मुझे उसे मिला दो ‘.
हा आक्रोष करत होती एक दुर्दैवी आई ,नफिसा कुरेशी. सीएसटीवर फुगे विकून पोट भरणाऱ्या नफीसाने त्या दिवशी झालेल्या गोळीबारात तिची सहा वर्षाची चिमुकली हीना कायमची गमावली होती. हातातलं कलेवर तिच्या लाडक्या हीना चे आहे याच्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. तिचा आक्रोश ऐकून आम्ही पण स्तब्ध झालो .तिच्या सांत्वनासाठी आमच्याकडे शब्दच नव्हते.बरोबर नेलेले शुभेच्छापत्र ,फुल आणि बिस्किटाचा पुडा तिला दिला. तिने आणखी एक फुल आणि पुडा मागितला .माझ्या डोळ्यातले प्रश्नचिन्ह पाहून ती जे बोलली ते मी कधीच विसरू शकत नाही.

मै उसे दो वक्त की रोटी नही खिला सकती, तो बिस्कुट कहा से देती, अभी उसे खिलाउंगी. उसकी कबर पे जाकर रखुंगी. जिन्हो ने इतनी सी बच्ची कि जान ली है वो इंसान नही हो सकते .

खरंतर आम्ही सारे आधार देण्यासाठी गेलो होतो पण हे ऐकून आम्ही स्वतःचे अश्रू रोखू शकलो नाही .वेगवेगळ्या वॉर्ड मधील जखमी बांधवांना भेटताना, मनोगत ऐकताना प्रत्येकाची वेगळी कहाणी उलगडत होती.
फुटाणे विकून पोट भरणारा आकाश नटवरलाल उजव्या पायात गोळी लागून अत्यवस्थ झालेला ,पण वेदना दुःख विसरून आता पुन्हा उभा राहिलाय.
पोटात गोळ्या घुसून जखमी झालेल्या अनामिका गुप्ताला २६/११ ची आठवण विचारली की म्हणाली, ‘कभी कभी डर सा लगता है ,लेकिन चलना तो पडता है, जिंदगी बेहती नदी की तरह होती है’.

हॉटेलमध्ये जेवण करताना समोरच्या टेबलावरच्या चार तरुणांनी अचानक गोळीबार सुरू केला आणि काही कळायच्या आतच गोळ्या लागल्या. मदतीसाठी ती धावतच जवळच्या पोलीस चौकीत गेली पण तिथून तिला हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला .ती परत फिरली, रक्त बंबाळ अवस्थेत तिला पळताना पाहून फ्रान्सिस नावाचे व्यक्तीने नव्हे तर देवदूतानेच तिला उचलून हॉस्पिटलमध्ये नेले आणि तिचे प्राण वाचले .
तिला पुनर्जन्म मिळवून देणारे फ्रान्सिस तिचे आणि तिच्या कुटुंबीयांचे आता चांगले मित्र झाले आहेत .
तांडेल कुटुंबीय खोट्या सरकारी आश्वासनामुळे त्रासून गेले आहे. घरातील एकमेव कर्ता पुरुष सीएसटीवरील हल्ल्यात मारला गेला , सरकारने रेल्वे प्रशासनात कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचे दिलेले आश्वासन हवेत विरले आहे . मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना मिळणाऱ्याचे मदतीची पूर्ण रक्कम अजूनही मिळालेली नाही..

२६/११ च्या निमित्ताने शासनामध्ये अनेक बदल करण्यात आले, या परिवर्तनाची ही नांदी २६/११ मधील शहिदांच्या कुटुंबीयांसाठी व संपूर्ण पोलीस दलासाठी खऱ्या अर्थाने अच्छे दिन आणू शकेल अशी आशा करायला हरकत नाही असे मला वाटते.’माझे पती पोलीस दलातील नोकरी सोडून त्यांच्या नवीन कल्पनांना वाव देणारे मल्टी नॅशनल कंपनीत नोकरी करण्याच्या विचारात होते ,जर त्यांनी २६/११ च्या पूर्वी राजीनामा दिला असता तर आज माझे आयुष्य वेगळे असते’ असे हुतात्मा पतीविषयी नितांत आदर व अभिमान बाळगणारी “श्रीमती कविता करकरे” यांच्यासारखी वीरपत्नी जेव्हा बोलते तेव्हा तरी आपण सर्वांनी भानावर यावं असं मला वाटते.

करकरे ,कामठे यांच्यासारख्या महत्त्वाच्या पदावर व्यक्तींसाठी जर चांगल्या प्रतीचे बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी करण्यासाठी आम्ही कमी पडत असू तर ते दुर्दैव आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी हक्कांची पायमल्ली होऊ नये यासाठी लाखो रुपये खर्च करणारे, अतिरेक्यांच्या शवांचे जतन करण्यासाठी धडपडणारे शासन , अतिरेक्यांच्या हल्ल्यात जखमी अवस्थेत ४० मिनिटे पडलेल्या शूरवीरांना वेळेवर वैद्यकीय मदत पोहोचू शकत नाही.

वीरपत्नी विनिता कामठे यांना सत्य समोर आणण्यासाठी स्वतःचे वैयक्तिक दुःख बाजूला सारून लेखणीचा आधार घ्यावा लागला. करकरे, कामठे, साळस्कर यांना परिस्थितीचे गांभीर्य कळलं नाही असं जावई शोध लावणारे नेते आणि राजकारणी यांना त्यांच्या ‘टू द लास्ट बुलेट’ या पुस्तकातून चांगलीच सणसणीत चपराक दिली आहे.त्यांच्या या धडपडीला माझा मनःपूर्वक सलाम. या हल्यामागे जे खरे सूत्रधार डेव्हिड हेडली, तय्यब राणा हे भारतात अनेक दिवस मोकाट फिरत होते यापेक्षा दैवदुर्विलास काय.

‘मला माझे पप्पा आणून द्या, नाहीतर एक बंदूक आणून द्या ,माझ्या पप्पांना ठार मारणारे त्या अतिरेक्याला गोळी घालून मी ठार करणार आहे’ हे सुन्न करणारे शब्द आहेत पाच वर्षाच्या धवल वाघेला चे.जीव जातो म्हणजे काय होतं हे न कळण्याच्या वयात जीव घेण्याची भाषा या लहानग्याच्या तोंडात यावी हा विचारच किती जीव घेणा आहे ? या हल्यानंतर जे जे रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी, डॉक्टरांनी दिवस-रात्र एक करून जखमींचे प्राण वाचविले त्याला तोड नाही. याने शरीरावरच्या जखमा भरून येतील पण मनावरच्या जखमांचे काय.मुंबई खरं तर सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची, सेलिब्रिटीची नगरी आहे. या सर्व मान्यवरांनी अशा प्रकारच्या दुर्दैवी बांधवांना भावनिक व मानसिक आधार देण्यासाठी जर प्रयत्न केले असते तर साऱ्याच अंधाऱ्या वाटा प्रकाशने उजळून निघाल्या असत्या.
कितीतरी जीव मनात अशी विषारी बीज पेरून पुढे काय करणार , दुःखाने होरपळलेली, सुडाने पेटलेली, द्वेषाने पोखरलेली ही मने भविष्यात समाजमन कसं स्वच्छ ठेवतील ?

रक्ताचं कोणतेही नातं नसताना पुण्याहून आपल्यासाठी आलेल्या तमाम पुणेकरांच्या शुभेच्छा स्वीकारताना, त्यांच्याकडे मन मोकळे करताना या सर्व जखमी बांधवांना गहिवरून आले होते. वॉर्डातील उदासीनता दूर करण्यासाठी माझ्यासमवेत आलेल्या सुप्रसिद्ध गायक इकबाल दरबार यांनी गाणं सुरू केलं आणि हॉस्पिटलच्या त्या वातावरणात गाण्याचे सूर पसरले.

कर चले हम फिदा जान और तन साथियो ,
अब तुम्हारे हवाले वतन साथियो,
खेच दो आपने खून से जमी पर लकीर,
इस तरफ आ ना पाये रावण कोई तोड तो हात अगर हात उठने लगे,
छू ना पाये सीता का दामन कोई.

देश प्रेमाने भरलेल्या या सूराने वातावरण बदलून गेलं .
वेदना आणि दुःख बाजूला ठेवून सर्वजण नाचू लागले .या आनंदोत्सवात थोड्यावेळापूर्वी आपल्या लाडक्या हीना साठी टाहो फोडणारी नफीसा कुरेशी सामील झाली होती .लेकीच्या विरहाने दुःखी झालेल्या तिच्या चेहऱ्यावर आम्ही काही काळासाठी का होइना आनंद निर्माण करू शकलो हा आमच्या सर्वांच्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहे .
पाहता पाहता या घटनेला अनेक वर्षे उलटून गेली आणि आम्ही नेहमीप्रमाणे सर्व विसरून जातोय असं वाटत असतानाच या हल्ल्यातील शहीद झालेल्या मेजर संदीप ऊन्नीकृष्णनच्या आई वडिलांना भेटण्याचा योग आला. स्वतःच्या एकुलता एक मुलाच्या वियोगाचे दुःख बाजूला ठेवून हे वीर मातापिता दिल्ली ते मुंबई सायकल फेरीवर निघालेत देशभरातील सर्व शहिद कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी .त्यांच्या या दुर्दम्य इच्छाशक्ती मध्येच मला उद्याच्या उज्वल भारताची आशा दिसली आणि आमचा देश इतक्या संकटांना तोंड देऊन उभा आहे तो अशा सुपुत्रांमुळेच हे मला मनोमन पटलं.

आम्ही whatsapp, facebook, instagram याच्यावर चर्चा करतानाच तरुण पिढीसमोर नको ते आदर्श उभे राहिले आहेत पण अजूनही मला असे वाटते जेव्हा संदीप चे वृद्ध मातापिता सायकलवर येऊन आम्हाला प्रेरणा देऊन जातात.
संदीप च्या आईने मला जवळ घेतले , माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली,’ आज माझा संदीप नाही पण मला विश्वास आहे की तुमच्यासारखे हजारो संदीप मला मिळालेत आणि ते संदीप बलिदान वाया जाऊ देणार नाहीत’
तेव्हा मात्र मी माझे अश्रू रोखू शकलो नाही.
प्राणाची आहुती देऊन भारतमातेची शान वाढविणाऱ्या या हुतात्म्यांना मनःपूर्वक सलाम करताना मला कवी बलबीर यांच्या ओळी आठवल्या. करकरे कामठे ,साळस्कर ,ओंबाळे, ऊन्नीक्रृष्णन यांचे सारख्या सुपुत्रांच्या वीरमातांचे मनोगत त्यातून जाणवलं.

‘ तेरे बापू लिखवाते है ,गोली नही पीठ पर खाना,एक इंच पीचे मत हटना, चाहे इंच इंच कट जाना.वीर शहीदो की विधवाए धन्य कर रही है धरती को,खुद कंधो पर ले जाती है वे अपने पतियों के अर्थी को ,मेरा माथा भी उंचा हो, ऐसा करतब र करके आना,एक इंच पीछे मत हटना ,चाहे इंच इंच कट जाना.

कसाबच्या फाशीने या हुतात्म्यांना काही प्रमाणात श्रद्धांजली मिळाली असली तरी यापुढे अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी आपण सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. केवळ २६/११ च्या निमित्ताने श्रद्धांजली वाहून देशभक्तीपर गाणी वाजवून हा प्रश्न सुटणार नाही तर सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलीस दलाचे पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सातत्याने सक्रिय राहणे ही काळाची गरज आहे.

डॉ. मिलिंद भोई
भोई प्रतिष्ठान, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!