आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

सृजन नृत्य महोत्सव २०२२….रसिकांच्या डोळ्याचं पारणे फेडणारा २ रा दिवस

मावळ विभागात पहिल्यांदाच होणाऱ्या अद्वितीय अश्या सृजन नृत्यालायाचा दुसरा दिवस गाजला तो डोळ्याचं पारणे फेडणाऱ्या नेत्रदीपक नृत्य रचनांनी आणि नृत्य गुरु डॉ.मीनल कुलकर्णी यांच्या थक्क करणाऱ्या नृत्य अविष्कारांनी.

Spread the love

सृजन नृत्य महोत्सव २०२२….रसिकांच्या डोळ्याचं पारणे फेडणारा २ रा दिवस.

आवाज न्यूज : विश्वास देशपांडे, तळेगाव दाभाडे, २६ डिसेंबर..

मावळ विभागात पहिल्यांदाच होणाऱ्या अद्वितीय अश्या सृजन नृत्यालायाचा दुसरा दिवस गाजला तो डोळ्याचं पारणे फेडणाऱ्या नेत्रदीपक नृत्य रचनांनी आणि नृत्य गुरु डॉ.मीनल कुलकर्णी यांच्या थक्क करणाऱ्या नृत्य अविष्कारांनी.

प्रमुख पाहुणे होते कै.नागेश धोपावकर ट्रस्ट चे मा.प्रशांतजी दिवेकर, मा.कौस्तुभ ओक, हेरीटेज संगीत अकादमी चे संस्थापक योगगुरु मा. हरिश्चंद्र गडसिंग, तळेगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष मा. उमाकांत कुलकर्णी, सृजनचे मा. निशिकांत पंचवाघ आणि कलापिनीचे समन्वयक मा.विनायक भालेराव.मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि डॉ.प्राची पांडे यांनी गायलेल्या सुंदर श्लोकानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली ती एका पेक्षा एक सुंदर नृत्य रचनेंच्या सादरीकरणाला.भरतनाट्यम मध्ये सादरीकरणाची सुरुवात होते ती नटराजाला वंदन, गुरूंचे स्मरण, साथीदारांना वंदन, रसिकांना वंदन करून होणाऱ्या पुष्पांजली ने, सृजनच्या पारंगत नृत्यांगनांनी आपल्या लय आणि तालबद्ध पदन्यासांनी रसिकांच्या हृदयाचा ताबा घेतला.

त्यानंतर नृत्य गुरु डॉ.मीनल कुलकर्णी यांच्या शृंगार लहरी ही लास्य प्रधान सौंदर्यपुर्ण रचना, वर्णम ही नवरागमलिकेत मीनाक्षी देवीची विविध रूपे विविध रसांमधे गुंफलेली, स्वर भाव मुद्रा पदन्यास याने सजलेली वर्णम. (ताल आदिताल. रचनाकार – विद्वान लालगुडी जयरामन.) आणि ठुमक चलत रामचंद्र – हे भक्ती पदं, संत तुलसीदास यांचे भजन… ज्यात लहानग्या बाल रामचंद्राच वर्णन केलं होते..
नृत्यगुरू डॉ.मीनल यांच्या नृत्य कौशल्याचे थक्क करणारे सर्वांग दर्शन या तिन्ही सादरीकरणातून अनुभवायला मिळाले. सव्वा तासा पेक्षा जास्त वेळ हे सादरीकरण त्याला असलेल्या सुंदर वाद्यवृंदाच्या आणि गायनाच्या साथीमुळे, डॉ.मीनल कुलकर्णींच्या अप्रतिम मुद्राअभिनय, सुंदर पदन्यास तितकाच देखणा वाद्यवृंद आणि क्षणोक्षणी मिळणारी रसिकांची उत्स्फूर्त दाद, यामूळे ईश्वरी अनुभूती मिळाल्याचा आनंद देणारे होते. कै.शं.वा.परांजपे नाट्यसंकुल रसिकांच्या गर्दीमुळे ओसंडून वाहत होते नाट्यसंकुलाचा वास्तुपुरुष नक्कीच सुखावला असणार.

मध्यंतरानंतर मान्यवरांच्या हस्ते सृजननृत्यालयाने सृजन च्या कलाकारांसाठी घेतलेल्या निबंध स्पर्धांचा
पारितोषिक वितरण समारंभ आणि वाद्यवृंदातील साथीदारांना सन्मानित करण्यात आले.
‘सध्याची पिढी मोबाईल नावाच्या इलेक्ट्रोनिक ड्रगच्या विळख्यात सापडलीय, आपल्या संस्कृतीतील्या विविध कलाच या विळ्यातून बाहेर काढू शकतात’ असे मनोगत मा.हरिश्चंद्र गडसिंग यांनी व्यक्त केले.
प्रशांत दिवेकर यांनी “कै.नागेश धोपावकर ट्रस्ट नेहमीच सृजनच्या पाठीशी आहे” अशी ग्वाही दिली.

यानंतर आनंद नर्तन गणपती हे गणपती कीर्तनम , जतिस्वरं – विविध स्वर ताल लयीत मुद्रा, आकृतीबंध, पदन्यास असलेली सरस्वती रागातील आणि रूपक तालातील अनवट, दुर्मिळ रचना नृसिंह स्तुती आणि कलिंग नर्तनं म्हणजे श्री कृष्णाच्या पराक्रमाचे अलौकिक रूप म्हणजे कालिया मर्दनाची कथा, ही सांगणारी शरयू पवनीकर यांची अप्रतिम रचना सादर करण्यात आली तिल्लाना रचनेनी कार्यक्रमाची सांगता झाली या सर्व रचनांमधून सृजनच्या शिष्यांचे कौशल्य सुखद अनुभव नेत्रानुभव देणारे होते.

कार्यक्रमाचे सुंदर सूत्र संचालन कामिनी जोशी यांनी केले तर नृत्य रचनांची सुंदर आणि सखोल माहिती देणारे निवेदन डॉ.अनुपमा रिसबूड,परांजपे यांचे होते.
या अविस्मरणीय नृत्य मैफिलाला तितकीच अप्रतिम साथ होती कर्नाटक गायिका डॉ.सौम्या कर्था, मा.व्यंकटेश (मृदुंग),श्री बालसुब्रम्हण्यम (व्हॉयोलीन), मा.कुमारकृष्णन (बासरी) आणि कृष्णम(घटम) यांची.
कलाकार, कार्यकर्ते आणि रसिकांची क्षमता आणि अभिरुची वाढविणाऱ्या या महोत्सवासाठी विराज सवाई, प्रतिक मेहता (रंगमच सजावट), गजानन वाटाणे,विनायक काळे,स्वच्छंद गंदगे (प्रकाशयोजना), रवी मेघावत, केदार अभ्यंकर (ध्वनी संयोजन), अरविंद सूर्य, केदार सोनटक्के (रंगभूषा), अनिरुद्ध जोशी (पार्श्वसंगीत), किशोर कसाबी (मंडप व्यवस्था) रामचंद्र रानडे(स्वागत कक्ष) आणि कलापिनी आणि सृजन परिवारातील सर्व कलाकार कार्यकर्ते या सगळ्यांच्या अविरत कष्टांमुळेच हा नृत्य महोत्सवाचा जगन्नाथाचा रथ मार्गक्रमण करतोय आणि या पुढेही करत राहणार आहे.
दिवसागणिक वाढणारी गर्दी, रसिकांचा प्रतिसाद कलाकार आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारा आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!