आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

मावळातील लेण्या, गडकिल्ल्यांवर भरीव संशोधनाची गरज : डॉ. प्रमोद बोराडे ..

स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला' पुष्प दुसरे..

Spread the love

मावळातील लेण्या, गडकिल्ल्यांवर भरीव संशोधनाची गरज : डॉ. प्रमोद बोराडे स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला’ पुष्प दुसरे

आवाज न्यूज :   तळेगाव दाभाडे, वार्ताहर, २५ फेब्रुवारी.

मावळातील लेण्या, गडकिल्ले, पुरातन मंदिरांचा इतिहास खूप जुना आहे. यावर अगदी अल्प संशोधन झाले आहे. मावळातील लेण्या, किल्ले, भुयारे, शिलालेख, भाषा आदींचा अभ्यास होणे गरजेचे आहे. या दृष्टीने भरीव अभ्यास झाल्यास मावळातील गड किल्ल्यांमधील रहस्यमय गोष्टींचा उलगडा होईल, अशी अपेक्षा इतिहास अभ्यासक डॉ. प्रमोद बोराडे यांनी व्यक्त केली.

तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्तपणे आयोजित ‘स्वामी विवेकानंद व्याख्यानमाले’त दुसरे पुष्प गुंफताना ‘मावळचे दुर्ग वैभव’ विषयावर डॉ. बोराडे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष मयुर राजगुरव, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, दादासाहेब उऱ्हे, विन्सेंट सालेर, अशोक काळोखे, मिलिंद शेलार, सुदाम दाभाडे, कैलास काळे, रजनीगंधा खांडगे, राहुल खळदे , शंकर हदिमणी, पांडुरंग पोटे, सोनबा गोपाळे, संदिप पानसरे, रवि  दंडगव्हाळ, दशरथ जांभूळकर, प्राचार्य सुदाम वाळुंज आदी उपस्थित होते.

डॉ.बोराडे पुढे बोलताना म्हणाले, की दुर्ग हे मावळचा खजिना आहे. मावळातील दुर्ग हे गिरीदुर्ग आहेत. त्यामुळे अभ्यासकांना या गिरिदुर्गचा अभ्यास करण्याची मोठी संधी आहे. या दुर्ग परिसरातील आपण शिलालेखांचा अभ्यास केला, तर आढळते की त्याकाळी जातीयवाद नव्हता. आज शिवचरित्रच प्रश्नमय झाले असून, याची उत्तरे भावनेपेक्षा अभ्यासाने मिळविली पाहिजेत. खरा इतिहास समजून घेऊन जातीधर्माच्या पलीकडचा इतिहास समजून घेतला पाहिजे. आपली संस्कृती जतन करण्यासाठी आपल्यात धुर्तपणा हवा. मात्र, या धूर्तपणामागे स्वार्थ नसावा. मावळातल्या गड किल्ल्यांचा बारकाईने अभ्यास केला, तर इथले गडकिल्ले हे भक्कम असून, ते राज्याचे सार आहेत.

मावळातले दुर्ग हे घाट माथ्यावरचे दुर्ग आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी सुरुवातीला मावळातले दुर्ग जिंकून घेतल्याचा इतिहास आहे. त्यांनी अनेक गडकिल्ल्यांची नावे बदलली, पण मावळातल्या लोहगडाचे नाव मात्र बदलले नाही. कारण या किल्याचे दगड वैशिष्ट्यपूर्ण असून, या दगडांना चुंबक चिकटतात. इतका हा किल्ला भक्कम आहे. ब्राहमी लिपीतील शिलालेख मावळात आढळतात. या आणि अशा अनेक ऐतिहासिक गोष्टी इतिहास अभ्यासकांसाठी महत्त्वाच्या ठरतील, असेही डॉ. बोराडे यांनी सांगितले.

 

मावळात जसे गडकिल्ल्यांत नव्याने ज्ञात होत असलेल्या गोष्टींमुळे कुतूहल वाढत चालले आहे. मावळातल्या लेण्या, गडकिल्यांत भुयारे आढळून येत आहेत. आतापर्यंत आम्ही एकोणीस भुयारांचा शोध लावला आहे. यावर मोठं काम करण्याची संधी आहे. त्यातून अभ्यासकांना नवीन गोष्टी कळून मावळच्या इतिहासात भर पडेल.
      –  डॉ. प्रमोद बोराडे, इतिहास अभ्यासक 

सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापिका कुसुम वाळुंज व लक्ष्मण मखर यांनी, तर आभार राहुल खळदे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!