अध्यात्मिकपिंपरी चिंचवडमहाराष्ट्रसामाजिक

आधी १४ वर्षे वनवास मग घडले प्रभू श्रीराम; हेच जीवनाचे सार,  संकटांचा सामना करावाच लागेल : पंडित प्रदिपजी मिश्रा

रेकॉर्ड ब्रेक गर्दीने श्री अष्टविनायक शिवमहापुराण कथेचा समारोप…

Spread the love

आधी १४ वर्षे वनवास मग घडले प्रभू श्रीराम; हेच जीवनाचे सार,  संकटांचा सामना करावाच लागेल : पंडित प्रदीप मिश्रा – रेकॉर्ड ब्रेक गर्दीने श्री अष्टविनायक शिवमहापुराण कथेचा समारोप…

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, २२ सप्टेंबर.

‘‘संसारात जन्म घेतला की, वाट्याला येणारे दु:ख तुम्हाला भोगावेच लागणार आहेत. प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या वाट्याला आलेल्या दुःखापासून ते चुकले नाहीत. दुःख पचवून पुन्हा उभे राहण्याची क्षमता असल्यानेच त्यांनी संघर्ष केला. त्यामुळेच त्यांना देवपद, संतपद प्राप्त झाले. भगवान राम यांनी १४ वर्षे वनवास भोगल्यानंतरच ते ‘प्रभू श्रीराम’ होवू शकले. कठीण प्रसंगातून गेल्याशिवाय कुणालाही देवपद, संतपद मिळत नाही, असा विचार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी दिला.

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर ‘श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा वाचन’’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. लाखो भाविकांच्या उपस्थितीत सोहळ्याची आज सांगता करण्यात आली. पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर जगताप या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक होते.

सोहळ्याच्या सांगता समारोहाच्या निमित्ताने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ व विक्रांत पाटील, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, पिंपरी-चिंचवड प्रभारी ॲड. वर्षा डहाळे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, सेवानिवृत उपजिल्हाधिकारी सुखदेव बनकर, मारुतराव साळुंखे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, पुणे मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, हभप पंकज महाराज गावडे, हभप नितीन महाराज गोरे, संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त भानुदास महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कथा श्रवण केले.

‘‘कोणाचे चांगले करू शकत नसाल, तर वाईटही करू नका. आपल्याकडून चांगले घडावे यासाठी प्रयत्नशील रहा. तो असा वागतो, म्हणून मी देखील असाच वागणार, अशा प्रकारचे वागणे टाळणे गरजेचे आहे. स्वत:ची तुलना इतराशी करण्याचा प्रयत्न टाळा, यामुळे दुसऱ्यासारखे वागण्याचा प्रयत्न करताना तुम्ही स्वत:चा देखील आनंद गमावून बसाल, असे पं. प्रदीम मिश्रा यांनी यावेळी सांगितले.

कथेचा प्रभाव दीर्घकाळ टिकणारा…
शिवकथा हे जीवनाचे सार आहे. यातून मिळणाऱ्या सकारात्मक संदेशाने आपले जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करा. शिवमहापुराण कथा पं. प्रदीपजी मिश्रा यांच्या वाणीतून ऐकताना आपण मंत्रमुग्ध होवून जातो. या कथेचा प्रभाव हा दीर्घकाळ टिकणारा आहे. शिवाला आणि शिवकथेला आपल्या मनात ठेवा आणि शिवकथेत दाखविलेल्या मार्गावर मार्गस्थ व्हा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बोलताना केले.

लक्ष्मणभाऊ जगताप यांची पुण्याई …
लोकनेते लक्ष्मण जगताप आज आपल्यात नसले तरी त्यांची पुण्याई आपल्यासोबत आहे. त्याच पुण्याईने शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यासाठी जगताप कुटुंबियांना प्रोत्साहित केले. कथा सोहळ्याचे आयोजन ही सहज शक्य गोष्ट नसली, तरी केवळ कर्मच अशा गोष्टी घडविण्यासाठी पाठबळ देते. लक्ष्मणभाऊंची पुण्याई आजही जगताप कुटुंबियांच्या पाठीशी आहे, म्हणूनच त्यांच्या वतीने आयोजित सोहळ्याचा लाभ लाखो नागरिक घेवू शकले आहेत. असे म्हणत पं. प्रदीपजी मिश्रा यांनी जगताप कुटुंबियांचे मनापासून कौतुक केले.

आपली रुची असणाऱ्या देवाचे नामस्मरण करा…
नामस्मरण कशाचे आणि कुणाचे करावे? हे ज्याने त्याने ठरवावे. तुम्ही कशा प्रकारे नामस्मरण करावे, हे कोणत्याही संत महात्म्याने सांगितलेले नाही. तुम्हाला आवडणारे नामस्मरण करा, ज्यातून तुम्हाला सर्व देवांचे स्मरण झाल्याशिवाय राहणार नाही, असा अध्यात्मिक सल्ला देखील यावेळी पं. प्रदीप मिश्रा यांनी दिला.

‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दीचा सर्वात मोठा शिव पुराण कथा सोहळा…
गेल्या ७ दिवसांपासून सुरु असलेल्या सोहळ्याच्या प्रत्येक दिवशी भाविकांनी रेकोर्डब्रेक गर्दी केली होती. प्रत्येक दिवशी सुमारे अडीच लाख भाविकांनी या कथा श्रावणाचा आस्वाद घेतला. या ७ दिवसांत सुमारे १८ लाख भाविक प्रत्यक्ष सभामंडपात कथा श्रवणासाठी उपस्थित होते.

गर्दी जमा होण्याचे श्रेय फक्त शंभो भोलेनाथ बाबां ची कृपा. प्रदीपजी मिश्रा सीहोरवाले.

याबरोबरीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून देखील कोट्यवधी नागरीकांनी या कथेचा आस्वाद घेतला. सोहळ्याचे मुख्य संयोजक शंकर जगताप यांनी सर्व भाविक, साधक आणि पंडित मिश्रा यांचे अनुयायी यांचे आभार मानले. कोणताही अनुचित प्रकार न घडता गर्दीचा उच्चांक मोडीत काढणारा हा पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिवपुराण कथा वाचन सोहळा ठरला. अत्यंत भक्तीमय वातावरणात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याबद्दल भाविकांनीही समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!