पर्यटनमहाराष्ट्रमावळ

लोणावळ्याच्या टायगर आणि लायन्स पॉईंट्ससाठी ग्लास स्कायवॉक आणि साहसी उपक्रमांचे नियोजन.

मावळ परिसरातील पर्यटनामुळे स्थानिक भूमिपुत्रांना उद्योग आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार..आमदार सुनील शेळके.

Spread the love

लोणावळ्याच्या टायगर आणि लायन्स पॉईंट्ससाठी ग्लास स्कायवॉक आणि साहसी उपक्रमांचे नियोजन ; मावळ परिसरातील पर्यटनामुळे स्थानिक भूमिपुत्रांना उद्योग आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध  होणार..आमदार सुनील शेळके.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, २२ सप्टेंबर.

टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट सारख्या लोकप्रिय ठिकाणी काचेचा स्कायवॉक उभारण्यासह लोणावळ्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी सर्वसमावेशक योजना तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या पर्यटन विभागाला दिले आहेत. या हालचालीचा उद्देश पर्यटनाला चालना देणे आणि या प्रदेशातील पर्यटकांचा अनुभव वाढवणे आहे. लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत मुंबईतील राज्य अतिथीगृहात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

अजित पवार यांनी भर दिला की लोणावळा परिसरातील नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. या अभ्यागतांची पूर्तता करण्यासाठी, उत्कृष्ट पायाभूत सुविधा उभारणे, साहसी उपक्रम आणि कुटुंबांसाठी विविध सुविधा देणे आवश्यक आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे परिसराच्या पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेत या बाबी लक्षात घेऊन सविस्तर प्रकल्प प्रस्ताव तयार करण्याचे आवाहन त्यांनी पर्यटन विभागाला केले. विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा. या पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. हे मावळच्या जनतेला अजित पवार यांनी दिलेले गिफ्ट आहे. मावळ परिसरातील पर्यटनामुळे स्थानिक भूमिपुत्रांना उद्योग आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील,असे मत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीस आमदार सुनिल शेळके,वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वन विभागाचे प्रधान सचिव बी गोपाल रेड्डी, पुणे प्रादेशिक मुख्य वन संरक्षक एन. आर. प्रवीण तर दुरदृष्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त सौरभ राव, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल रंजन महिवाल, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी. उपस्थित होते.

“मावळातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने ग्लास स्कायवॉकची उभारणी करण्यात येणार आहे.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या प्रकल्पास तत्वतः मान्यता दिल्याबद्दल मावळच्या जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो.या महत्त्वाकांक्षी पर्यटन विकास प्रकल्पामुळे निसर्ग पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होण्यास नक्कीच मदत होणार आहे.” असे आमदार सुनिल शेळके यांनी सांगीतले.

आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत तातडीने नियोजन करण्यात यावे. या परिसरात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आराखडा तयार करताना पर्यटकांची सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या जपणूकीला प्राधान्य द्यावे.पर्यटकांसाठी पाऊलवाट तयार करतांना काँक्रीट ऐवजी दगडांचा वापर करावा.पर्यटकांना सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेता येईल अशी रचना करण्यात यावी. परिसरात वाहनतळ तसेच पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेशही आराखड्यात करावा,अशी सूचनाही त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२२ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये  लोणावळा येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्याबाबत घोषणा केली होती. मावळातील पर्यटनाला चालना देण्यासाठी टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे काचेचा स्कायवॉक उभारण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रकल्प उभारण्यात येणार असून येथे झीप लाईनिंगसारखे साहसी खेळ, फुड पार्क,ॲम्फी थिएटर, खुली जीम, आणि विविध खेळ इ.सुविधा असणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!