
मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे-पाटील यांची जनरल मोटर्स कामगार संघटनेच्या साखळी उपोषणास भेट; आंदोलन स्थळी कामगारांच्या पत्नींनी माननीय मंत्री महोदयांना प्रतिनिधी स्वरूपात रक्ताने पत्र लिहून कामगार प्रश्न न सोडवल्या बद्दल तीव्र स्वरूपात केली नाराजी व्यक्त
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २१ नोव्हेंबर.
जनरल मोटर्स कामगार संघटनेचा साखळी उपोषणाचा कालचा ५० वा दिवस होता.मराठा योद्धा व मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे-पाटील यांनी भेट दिली व कामगारांची परिस्थिती जाणून घेतली.त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप भेगडे, सचिव राजेंद्र पाटील तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व थोर समाजसेवक मारुती भापकर व मराठा क्रांती मोर्चाचे मावळ तालुका समन्वयक बंटी मुर्हे उपस्थित होते.
मागील ५० दिवसापासून जनरल मोटर्सचे कामगार त्यांच्या न्याय व हक्कासाठी साखळी उपोषण करत असून याकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आज शासनाच्या निषेधार्थ जनरल मोटर्स कामगारांच्या साखळी उपोषण स्थळी कामगारांच्या वतीने रक्तदान आंदोलन करून महाराष्ट्र शासनाचा तसेच कामगार मंत्र्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी जनरल मोटर्स कामगार संघटनेचे सेक्रेटरी राजेंद्र पाटील म्हणाले की ” शासन आपलं तर रक्त शोषण करत आहे, त्यापेक्षा आपणच बेमुदत साखळी उपोषणाच्या पन्नासाव्या दिवसापासून महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त करत महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर जनरल मोटर्स १००० कामगारांचा प्रश्न सोडवण्याकरता रक्तदान आंदोलन करत आहोत”. रक्तदान आंदोलनाच्या आज पहिल्या दिवशी सरकारला कामगार प्रश्नावर जाग आणण्या करिता कामगारांच्या रक्ताची पिशवी पोस्टाद्वारे पाठवण्यात येत आहे. निदान सरकारने कामगारांच्या रक्तदानाची दखल घेऊन लवकरात लवकर प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.
आज आंदोलन स्थळी कामगारांच्या पत्नींनी माननीय मंत्री महोदयांना प्रतिनिधी स्वरूपात रक्ताने पत्र लिहून कामगार प्रश्न न सोडवल्या बद्दल तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलनाच्या ५० व्या दिवशी १०१ कामगारांनी रक्तदान केले व माननीय कामगार मंत्र्यांच्या प्रतिमेस प्रतिनिधी स्वरूपात रक्ताने अभिषेक घातला.