क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

कलापिनीच्या ‘रंगवर्धन’ ह्या प्रायोगिक नाटकांसाठीच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे पुनर्जीवन.

मौनांतर विजेते ‘सय सरी’ व ‘डार्विन, चे नितांत सुंदर सादरीकरण

Spread the love

कलापिनीच्या ‘रंगवर्धन’ ह्या प्रायोगिक नाटकांसाठीच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे पुनर्जीवन……
मौनांतर विजेते ‘सय सरी’ व ‘डार्विन, चे नितांत सुंदर सादरीकरण

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २८ डिसेंबर.

कलापिनीच्या ‘रंगवर्धन’ ह्या प्रायोगिक नाटकांसाठीच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला सोमवार दि. २५ डिसेंबर रोजी ‘अवकाश’ या समीप रंगमंचावर ज्येष्ठ रंगकर्मी विद्यानिधी वनारसे यांच्या हस्ते जोमाने सुरवात झाली. लेखनापासून सादरीकरणापर्यंत प्रत्येक गोष्टीत नवीन काही शोधू पाहणारं, आशयापासून ते मांडणीपर्यंत वेगवेगळे प्रयोग करू पाहणारं कुठलंही नाटक हे ‘प्रायोगिक नाटक’च असतं. म्हणूनच, अश्या प्रायोगिक (समांतर) नाटकांना, ते सादर करणार्‍या कलाकारांना नवनवीन प्रयोग करण्यासाठी उत्तेजन मिळावं, त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, नाट्यविषयक चर्चांमधून ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांच्या जाणीवा अधिक समृद्ध व्हाव्या, या निमित्ताने नाटकांची देवाण-घेवाण व्हावी आणि ही रंगभूमी वृद्धिंगत होत जावी हा कलापिनीच्या ‘रंगवर्धन’ चळवळीचा मुख्य उद्देश आहे.

प्रख्यात लेखक, नाट्य प्रशिक्षक आणि ज्येष्ठ नाटककार विद्यानिधी (प्रसाद) वनारसे यांनी २००१ साली या प्रायोगिक रंगमंचाची मुहूर्तमेढ रोवली होती. विद्यानिधी वनारसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या चळवळीचा पुनश्च हरिओम करताना ते म्हणाले की, “गेली चार दशकं दरवेळी मी इथे नवीन कलाकार घडताना बघत आलो आहे. याच कलाकारांच्या आणि रंगवर्धन च्या माध्यमातून तळेगावच्या प्रायोगिक नाट्य चळवळीला गती मिळेल.” म्हणूनच येत्या वर्षभरात कमीत कमी चार प्रायोगिक नाटके अत्यल्प सदस्यत्व शुल्कात अनुभवता येणार आहेत.

‘रंगवर्धन’ च्या नव्या बोधचिन्हाचे अनावरण विद्यानिधी वनारसे, मृणालिनी वनारसे, कलापिनीचे विश्वस्त डॉ अनंत परांजपे, उपाध्यक्ष अशोक बकरे, विश्वास देशपांडे, कलामंडळ प्रमुख प्रतीक मेहता यांनी केले. कार्यक्रमात सुरुवातीला कलापिनी चे मौनांतर स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम पारितोषिकासह अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य यात सर्वोत्कृष्ट पारितोषिके प्राप्त, गंधार जोशी-चेतन पंडित लिखित, सायली रौंधळ दिग्दर्शित, डॉ. विनया केसकर, संदीप मनवरे, वेदांग महाजन अभिनित असे माणसांबरोबरच निसर्गाशी असलेले नाते जपत कसे जगावे? हे सांगणारे गाजलेले मूकनाट्य ‘सय सरी’ चे सादरीकरण झाले. तसेच ‘डार्विन’ हे डार्विन च्या अवघड शास्त्रीय उत्क्रांतीवादाचं गमक सोप्या गोष्टीतून रंजकपणे उलगडणारे मृणालिनी वनारसे यांनी लिहिलेले, विद्यानिधी वनारसे यांनी दिग्दर्शित-अभिनित केलेले नाटक सादर झाले.

दोन्ही नाटकांना उपस्थित रसिकांची उत्तम दाद मिळाली. सर्व सहभागी कलाकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सादरीकरणानंतर दोन्ही नाटकांवर जाणकार प्रेक्षकांनी कलाकारांशी संवाद साधला आणि सूचना ही केल्या. सूत्रसंचालक आणि रंगवर्धन संयोजक विराज सवाई, अभिलाष भवार, प्रतिक मेहता, स्वच्छंद गंदगे, चैतन्य जोशी, सायली रौंधळ यांच्यासह राहूल देसाई, आकाश नवरे, सुमेध सोनावणे, आशुतोष गावकर यांच्या सहकार्याने पुन्हा एकदा तळेगावात एका नव्या नाट्यचळवळीचे स्वागत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!