महाराष्ट्रसामाजिक

पत्रकारांचे प्रश्न न सोडवणाऱ्या सरकारच्या विरोधात आमचा लढा सुरूच राहील, एस.एम. देशमुख यांचे प्रतिपादन.

माहूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकारांचा मेळावा उत्साहात..

Spread the love

पत्रकारांचे प्रश्न न सोडवणाऱ्या सरकारच्या विरोधात आमचा लढा सुरूच राहील, एस.एम. देशमुख यांचे प्रतिपादन ; माहूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकारांचा मेळावा उत्साहात..

आवाज न्यूज : मुंबई प्रतिनिधी श्रावणी कामत, १४ जानेवारी.

मुंबई : ‘मराठी पत्रकार परिषदेची कोणतीही राजकीय भूमिका नाही. जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवतील, आह्मी त्या सरकारच्या सोबत आहे. पण जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवणार नाही, आम्ही त्यांच्या विरोधात लढत राहू. मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी आह्मी लढा सुरूच ठेवू,’ असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले.

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार मेळावा शनिवारी, (१३ जानेवारी २०२४) नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूरगड येथे उत्साहात पार पडला.यावेळी देशमुख बोलत होते. याप्रसंगी आमदार भीमराव केराम, स्वागताध्यक्ष रामदास सुमठाणकर, माहूर नगर पंचायत नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम.देशमुख, नांदेड भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, जिल्हा परिषद नांदेड माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख ज्योतिबा खराटे, माहूर नगर परिषद माजी नगराध्यक्ष समरजी त्रिपाठी, मराठी पत्रकार परिषद विश्वस्त किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, टीव्ही असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, मराठी पत्रकार परिषद राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, डिझिटल मीडिया राज्याध्यक्ष अनिल वाघमारे, लातूर विभाग विभागीय संघटक प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ गोवर्धन बियाणी, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पांडागळे, माहूर तालुका मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी यांच्यासह राज्यभरातून आलेले पदाधिकारी, पत्रकार, मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

देशमुख यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘सरकार कुठल्याही असले तरी पत्रकारांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक असाच आहे. सरकारच्या पेन्शन योजनेबाबत नेहमी हे दिसून येते. पत्रकारांना पेन्शन देताना सरकार त्यांच्याकडे बजेट नसल्याचे नेहमीच सांगते. त्यामुळे आता पत्रकारांच्या पेन्शनसाठी सरकारने अर्थसंकल्पातच तरतूद करावी, अशी मागणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. तसेच पत्रकार संरक्षण कायदा झाला, पण तो कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आलेला नाही. कारण या कायद्याचे नोटिफिकेशनच अद्याप निघाले नाही. ही सरकारने एक प्रकारे पत्रकारांची केलेली फसवणूकच आहे. पत्रकार संरक्षण कायद्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयात जाऊ,’ असे सांगतानाच देशमुख पुढे म्हणाले,’ पत्रकारांनी समाज, सरकार तुमच्यासोबत येईल, ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा पत्रकारांनीच पत्रकारांसाठी आता काहीतरी करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण पत्रकारावर हल्ला झाला तर पत्रकार वगळता कोणी निवेदन सुद्धा देण्यासाठी पुढे येत नाही. हे आपण वारंवार पाहतो. त्यामुळे आता मराठी पत्रकार परिषद पत्रकारांना मदत करता यावी, यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून एक कोटी रुपयांचा फंड उभारण्यासाठी काम करत आहे. या फंडामधून दरवर्षी किमान २५ पत्रकारांना मदत करता आली तरीही ते खूप मोठे काम होईल.’

आमदार भीमराव केराम मेळाव्याला राज्यभरातून आलेल्या पत्रकारांचे स्वागत केले, व ते म्हणाले,’ मराठी पत्रकार परिषद राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. लेखणीच्या माध्यमातून आमच्या सारख्या राजकीय नेत्यांनी केलेली कामे पत्रकार लोकांसमोर आणतात. तसेच वेळप्रसंगी लेखणीतून आम्हाला आमच्या चुका दाखवून देण्याचे कामही पत्रकार करतात. खरंतर एखाद्या राजकीय नेत्याची ओळख ही पत्रकारांच्या लेखणीच्या माध्यमातूनच होत असते,’ असे सांगत आमदार केराम यांनी पत्रकारांच्या कामाचा गौरव केला. तसेच परिषदेचे मुख्य विश्वस्त यांच्या संघर्षाचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सीएनएन १८ न्यूज च्या ब्युरो चीफ विनया देशपांडे म्हणाल्या की, ‘ आजच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पण अनेकदा आपल्या गावातील प्रसंगी प्रश्न हे भाषेचा अडथळा असल्याने आपण मर्यादित लोकांपर्यंत पोहोचवतो. मात्र ‘एआय’ चे दारे उघडल्याने भाषेचा अडसर संपत असून या संधीचा आता ग्रामीण भागातील पत्रकारांनी फायदा घेण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या गावातील, मातीतील प्रश्न जगभरात पोहोचवण्याची ही संधी आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार न करता मोठ्या संधीचा फायदा घ्या,’ असे आवाहन देशपांडे यांनी केले. ‘ज्या लोकशाहीला स्वतःच्या त्रुटींची जाणीव असते, ती प्रबळ लोकशाही असते. अशा लोकशाहीची जाणीव प्रत्येक पत्रकाराला असणे गरजेचे आहे,’ असे सांगतानाच देशपांडे यांनी परदेशामध्ये पत्रकारिते संबंधित आलेल्या अनुभवांची माहिती यावेळी दिली.

स्वागताध्यक्ष रामदास सुमठाणकर म्हणाले, ‘आज राज्यभरातील पत्रकार येथे आल्याचा आनंद होत आहे. आज मंडपामध्ये बसण्यासाठी जागा नाही, एकही खुर्ची रिकामी नाही, हेच या कार्यक्रमाचे यश आहे. टेक्नॉलॉजी सुधारत असली तरी वर्तमानपत्रातील बातमीची विश्वासार्थता कायम आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनांचे कौतुक करतो,’ असेही ते म्हणाले.

नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनाचे कौतुक केले. ‘आजपर्यंत एवढा मोठा मेळावा मी माहूर मध्ये पाहिला नाही,’ असेही ते म्हणाले.

मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी जिल्हा व तालुका पुरस्कार विजेत्या संघानी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच माहूर तालुका पत्रकार संघ व नांदेड जिल्हा पत्रकार संघाने माहूरगड पत्रकार मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतूक केले. पाबळे यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या वाटचालीची माहिती दिली.
परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी सांगितले की,’ मराठी पत्रकार परिषदेला ८४ वर्षांची परंपरा आहे. या परंपरेला कुठेही गालबोट न लावता, व कोणासमोर न झुकता पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचे काम मराठी पत्रकार परिषदेने केले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील पत्रकारांची साथ असल्यामुळेच पत्रकारांचे प्रश्न सोडवणे शक्य होत आहे. आगामी काळातही आह्मी पत्रकारांचे प्रश्न सोडवले जातील,’असेही ते म्हणाले.
दरम्यान, लोकशाही या न्यूज चॅनलवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरफराज दोसानी यांनी केले. तर, सूत्रसंचालन श्रद्धा वरणकर व राम तरटे यांनी केले. आभार विजय जोशी यांनी मानले.

‘या’ जिल्ह्याचा करण्यात आला पुरस्कार देउन सन्मान

रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार यंदा उत्तर_नगर आणि “दक्षिण_नगर” जिल्ह्यांना विभागून देण्यात आला* दक्षिण नगर जिल्ह्याचा पुरस्कार जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनी स्वीकारला. तर, उत्तर नगर जिल्ह्याचा पुरस्कार जिल्हाध्यक्ष अमोल वैदय यांनी स्वीकारला.

वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार.

1) मराठवाडा विभाग : माजलगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा बीड
2) लातूर विभाग : माहूर तालुका पत्रकार संघ, जिल्हा नांदेड
3) नाशिक विभाग : साक्री तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा धुळे.
4) पुणे विभाग : शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ, जिल्हा पुणे
5) अमरावती विभाग : *तेल्हारा तालुका पत्रकार संघ*, जिल्हा अकोला
6) कोल्हापूर विभाग : बत्तीस शिराळा तालुका पत्रकार संघ. जिल्हा सांगली
7) नागपूर विभाग : आर्वी तालुका पत्रकार संघ. जिल्हा वर्धा
8) कोकण विभाग : *अंबरनाथ तालुका पत्रकार संघ. जिल्हा ठाणे.

अधिस्वीकृती समितीवर निवड झालेल्यांचा सन्मान.

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने राज्य व विभागीय अधिक सिक्युरिटी समितीवर निवड झालेल्या अध्यक्ष व सदस्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. राज्य समितीवर निवड झालेले एस. एम.देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, विनोद जगदाळे, शिवराज काटकर, संजय पितळे यांचा तर विभागीय समिती अध्यक्ष दीपक कैतके, हरिष पाटणे, विजय जोशी यांचा तसेच विभागीय समितीवरील सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विजयसिंह होलम, विनया देशपांडे, अविनाश भांडेकर, चंद्रसेन जाधव यांचा सन्मान करण्यात आला.

माहूर येथील ज्येष्ठ पत्रकारांना दिला जीवनगौरव

याप्रसंगी समर मुरारीलाल त्रिपाठी, नंदू उर्फ विनायक बापूराव संतान, हाजी कादर दोसानी, गोपाळराव कदम, दत्तराव लालूजी मोहिते यांचा जीवनगौरव पुरस्कार देउन सन्मान करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!