ताज्या घडामोडी

पालघर येथे सर्वोत्कृष्ट पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मान

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी ता.२६
पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्हा परिषद पालघर मुख्यालय येथील सर्वसाधारण सभागृहात सन २०२१-२२ अंतर्गत प्रकल्प स्तरावर उत्कृष्ठ काम केलेल्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा पुरस्कार सोहळा शनिवारी उत्साहात पार पडला.

जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बालकल्याण सभापती गुलाब राऊत, कृषि व पशुसंवर्धन सभापती प्रतिभा गुरोडा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जि.प.सदस्य सुरेखा थेतले,अति.मु.का.अ. चंद्रकांत वाघमारे,महिला व बाल विकास अधिकारी प्रवीण भावसार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

या पुरस्कार सोहळ्यात आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार प्रथम पारितोषिक १२ पर्यवेक्षिका यांना प्रदान करण्यात आला. तर आदर्श अंगणवाडी सेविका प्रथम प्रथम पारितोषिक १३, द्वितीय पारितोषिक १३, तर तृतीय पारितोषिक १२ सेविकांना प्रदान करण्यात आला.
तसेच आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार प्रथम पारितोषिक १३, द्वितीय पारितोषिक १३, तर तृतीय पारितोषिक १२ मदतनीस ताईंना प्रदान करण्यात आला.
ज्यांनी जिल्ह्याला राज्यस्तरावर सन्मान मिळवून दिला त्या सर्वाधिक आधार नोंदणी करणाऱ्या अंगणवाडी सेविका शीतल पाटील यांना देखील यावेळी पुरस्कार देण्यात आला.ज्या अंगणवाडी सेविकांनी आपल्या अंगणवाडीतील सॅम मॅम संख्या कमी केली आहे ३५१ सेविकांना पुरस्कार देण्यात येणार असून चार अंगणवाडी सेविकांना यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अंगणवाडी सेविकांचे आणि मदतनीस ताईंचे काम वाखाणण्याजोगी असून हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कामाची पोचपावती आहे. मानधन कमी असलं तरी प्रत्येक कामात अंगणवाडी सेविका पुढे असतात असे सांगून सर्वांनी मिळून एकत्र काम केलं तर नक्कीच कुपोषणावर मात करू असे, प्रतिपादन यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढवणे यांनी केले तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंच्या वेतन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.

महिला व बालकल्याण समिती सभापती गुलाब राऊत यांनी जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी मुख्य सेविका अंगणवाडीला भेट देतात की नाही, तसेच मुलांना योग्य प्रकारे पोषण आहार मिळतो की नाही, अंगणवाडी इमारती योग्य अवस्थेत आहेत का याची पाहणी करणे गरजेचे असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले.
कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रतिभा गुरोडा यांनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडीतील मुलांच्या आई असून त्यांच्या कामाबद्दल त्यांचे कौतुक केले.

तर जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या सुरेखा थेतले यांनी आपल्या मनोगतातून अंगणवाडी सेविकांचे आणि मदतनिसांचे प्रश्न अधोरेखित केले.

दीड वर्षापासून अंगणवाडी बंद असली तरी लहान बालके, स्तनदा माता, गर्भवती माता, यांना वेळच्या वेळी पोषण आहार पुरवणाऱ्या सर्व अंगणवाडीसेविकांचे आणि मदतनीस ताईंचे मी जाहीर आभार मानतो. कुपोषण हटवण्यासाठी आपण सर्व मिळून काम करतो याची पोचपावती म्हणजेच हा पुरस्कार आहे असे मत या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केले.
तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पौष्टिक पाककृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.या बद्दल जि.प.अध्यक्ष, मु.का.अ. आणि सर्व सभापतींनी कौतुक केले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे(सा) बांधकाम चे कार्यकारी अभियंता माधव शंकपाळे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मिलिंद चव्हाण, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका ,मदतनीस आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!